तू गेला खड्ड्यात

मुख्यमंत्री साहेबांनी केलेल्या १ नोव्हेंबर पर्यंत गोव्यातील सर्व खड्डे नाहीसे होणार या विधानाचे आदित्यच्या चष्म्यातून झालेले विश्लेषण…

Story: आदित्यचा चष्मा/ आदित्य सिनाय भांगी |
09th October 2021, 11:54 pm
तू गेला खड्ड्यात

गोव्यात १ नोव्हेंबर पर्यंत रस्त्यावर एकही खड्डा राहणार नाही ह्या मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांच्या विधानाने गोव्यातील खूप खड्डे (टक्कल पडलेले) लोक घाबरले. करोना काळात सुरुवातीला कुणी सांगितले होते की सर्व वयस्क व्यक्तींना एकत्र ठेवावे म्हणजे ते सुरक्षित राहतील. तसे हे सोपे कार्य नव्हे, कारण तुम्हाला माहीत आहेच. तसेच जणू सर्व टक्कल पडलेल्यांना वाटले. टक्कल पडलेले सर्व लोक वयस्क आहेत असे नव्हे. आजकाल युवकांना पण टक्कल पडलंय. गोव्यात खड्डे राहणार नाही हे ऐकून सर्वात अधिक खूश झाले ते तारक मेहताच्या गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे. ते म्हणे गोव्यात येणार आपले टक्कल ठीक करायला!!

गोव्यात काही दिवसांपूर्वी कुणी खड्डे शोधण्याची स्पर्धा ठेवली होती. जितके चंद्रावर खड्डे नाहीत तितके गोव्यात रस्त्यावर आहेत. गोव्यात रस्त्यांवर खड्डे शोधण्याची गरज आहे का? त्यापेक्षा जर रस्ता शोधण्याची स्पर्धा ठेवली असती तर अधिक चांगले झाले असते. अलीकडे मंत्री पाऊसकरांनी म्हटले की काही लोक खड्डे झूम करून Big आहेत असे दाखवतात. त्यांचे एकदम बरोबर आहे. गोव्यात खड्डे Big कुठे आहेत? खड्डे तर Deep आहेत! एकादी दुचाकी संपूर्ण जलस्नान घेईल असे सुद्धा खड्डे आहेत. दुचाकीच का? चारचाकीचा एखादा टायर फसला तर गाडी क्रेन आणून उचलावी लागेल अशी सुद्धा स्थिती आहे.

भविष्यात गोव्याच्या खड्ड्यांवरून फिजिक्स पेपरमध्ये प्रश्न पण विचारता येईल. अटल सेतुवरील एका खड्ड्यााचा जर रेडियस ८० से.मी. आहे व त्यात १० लीटर पाणी साचलंय. तर खड्डा किती खोल आहे ह्याचं गणित करा! जी.एम.सी. अंडरपासमध्ये खड्डे बुझवायला कुणी भन्नाट युक्ती वापरलीय. बाजूचा रस्ता खणून काढलाय व खड्ड्यांच्या खोलीइतका बरोबरीने आणला, म्हणजे खड्डा गायब! काही वेळा तर रस्त्यांवर चकाचक डांबर घातले जाते व नंतर कुठली तरी केबल टाकायला तो रस्ता फोडला जातो. असेच एका ठिकाणी संपूर्ण डांबर टाकले होते व नंतर साकव बांधायला रस्ता फोडला. तितका भाग डांबर न टाकता ठेवला असता तर वाचलं असतं ना डांबर व पैसे? पण नंतर कारण विचारले तर सांगितले की आम्हाला माहीत नव्हतं की इकडे साकव होणार. म्हणजे एका खात्याचा दुसऱ्या खात्याशी संपर्क नाही!?

खड्ड्यातून गाडी चालवताना एक भीती वाटते ती म्हणजे कुणी बरोबर असला/असली तर तिला वाटणार हा मुद्दामहून असं खड्ड्याातून चालवतोय. आता एकमेकांवर पडून रोमांस करायला कुठे तसा वेळ आहे? रोमांस करता-करता सरळ जाणार खड्ड्याात! कारण प्रेम तर आंधळं असतं ना! दुचाकीवर मागच्या सीटवर कुणाला बसवले असल्यास एक सीटबेल्ट अवश्य हवा. नाही तर मागचा माणूस कधी उसळून गेला समजणारच नाही. दुचाकी वेडी वाकडी चालवली तर असं समजू नका की समोरच्याने दो पेग मारलेय, तो बिचारा खड्डा चुकवण्यासाठी तसा जात असणार! 

खड्ड्यात चालवून तसा पाठीच्या मणक्यांचा चांगला व्यायाम होतो. स्लिप्ड डिस्क वगैरे झालेले असल्यास ते पण परत स्लिप होईल व झालेले नसल्यास नक्कीच होईल. तशी आता आरटीओने ड्रायव्हिंग टेस्ट खड्ड्यातच घेतलेली बरी. म्हणजे सवय होणार. कधी कधी खड्डे चुकवत चुकवत आपण वाट पण चुकतो. कळतच नाही कुठे पोहोचलो ते. असं पण ऐकू आलंय की टॅस्लाची नवीन गाडी गोव्यात आणून ऑटो पायलट मोड मध्ये टाकलीय तर डिस्प्ले वर सर्वात आधी येतेय - Road not found.

विदेशात तुफान आल्यानंतर अगदी काही तासात रस्ते ठीक केले जातात. भारतात पाऊस पडल्यावर काही तासात रस्तेच गायब होतात. तसे रस्त्यावर खड्डे असले तर एक लँडमार्कसुद्धा होतो. काही वर्षांपूर्वी गोव्यातील एका इसमाने एमॅझॉनवर आपला पत्ता टाकला होता - Near Micky Mouse shaped pothole. विदेशी लोक 'बॉडमास' वापरून गणित सोडवतात व गोव्यातील लोक 'अदमास' घेऊन वाहने चालवतात. काही लोकांनी खड्ड्याात झाडेही लावली आहेत. म्हणजे त्यांनी ‘झाडाखाली नको, झाडावर प्रेम करा’ हे वाक्य मनावर घेतलंय. 'तू गेला खड्ड्याात' हे वाक्य कदाचित गोव्यातील रस्ते पाहूनच बनविले होते.

आता १ नोव्हेंबर पर्यंत खड्डे राहणार नाहीत म्हटलेय खरे, पण वर्ष कुठलं ते सांगितलंच नाही. २०२१ की २०५०?! २०१९मध्ये पावसानंतर सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करणार असे म्हटले होते. पण नंतर काय माहीत किती आला व कुठे गेला 'पाऊस'? आता खड्डे राहणार नाहीत ह्याचा अर्थ पण तसा स्पष्ट नाही. म्हणजे बुजवले जाणार, की तिकडून उचलले जाणार! खड्डे बुजवणार कसे? इतके डांबर आणणार कुठून हा पण लोकांना प्रश्न पडलाय! खड्डे डांबर घालूनच बुझवले जाणार हे ही पण स्पष्ट सांगितलेले नाही. मी तर म्हणतो डांबरामध्ये एम. सिल. व डॉक्टर फिक्सिट टाकून द्या थोडं, बघूया काही फरक पडतोय तर! अटल सेतुवरील खड्ड्यांवर शोध करायला आय.आय.टी. चेन्नईला सांगितलंय म्हणे. 

आता काही लोकांना वाटतेय की निवडणुका जवळ येत आहेत म्हणून रस्त्यांच्या डागडुजीचे काम हातात घेत आहेत. पण सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक मंत्री काही दिवस अगोदर रस्त्यावरून (माफ करा, खड्ड्याातून) जात असताना त्यांचे डोके म्हणे गाडीत जोराने आपटलंय. मग त्यांना खड्ड्यांमुळे काय होतंय हे कळून चुकलं. त्यांना डोकेदुखीचा पण त्रास होत होता. सी.टी. स्कॅन केलंय त्यात कळाले म्हणे की त्यांना डोके आहे, म्हणून दुखते!

चला तर आता आपण सर्वजण १ नोव्हेंबरची वाट बघू... नंतर प्रत्येकाला फॉर्म्युला वन प्रमाणे गाडी चालवायला मिळेल याची आशा करू! तरी सुद्धा जर कुठे खड्डा राहिला तर मग दिवाळीला नरकासुर ठेवायला, पाऊस, जमीनचक्र, बाण लावायला खास जागेची व्यवस्था करून ठेवलीय सरकारने हे लक्षात ठेवा...