पर्रा येथे घरात घुसून मोडतोड; दोघा संशयितांना अटक

|
21st September 2021, 10:25 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा :
सिल्वावाडा - पर्रा येथे वैयक्तिक कारणावरून आकाश मसूरकर यांच्या घरात बेकायदा घुसखोरी करून ५० हजारांच्या मालमत्तेची मोडतोड केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी टारझन पार्सेकर (नागवा) व संदेश कुडणेकर (साळगाव) या दोघा संशयितांना अटक केली.
हा मोडतोडीचा प्रकार रविवारी १९ रोजी पहाटे ४ च्या सुमारास घडला होता. फिर्यादी आकाश व त्याचे कुटुंबीय झोपेत असताना संशयितांनी त्यांच्या घराच्या दरवाजाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला. तसेच बाल्कनीतील काचा फोडून ५० हजारांचे नुकसान केले होते. तसेच आकाश व त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणी पोलिसांनी भा.दं.सं.च्या ४५२, ४२७, ५०४, ५०६ (२) खाली गुन्हा दाखल केला होता व मंगळवारी या गुन्ह्याखाली संशयितांना पोलिसांनी पकडून अटक केली. पुढील तपास पोलीस हवालदार केशव नाईक करीत आहेत.