
कुडचडे : गोव्यातील (Goa) कुडचडे (Curchorem) येथे पदपथांची स्थिती बिकट बनली आहे. येथील पदपथांवरील (Footpath) पेव्हर्स फुटल्याने पादचाऱ्यांना चालत जाणे कठीण बनले आहे. शहरातील पेव्हर्स फुटलेल्या पदपथावरून चालत जाताना एक युवक जखमी झाला. यासंदर्भात पोलिसांना (Goa Police) माहिती मिळताच पोलीस वाहनात घालून हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
यासंदर्भात माहिती देताना येथील काही स्थानिकांनी सांगितले की, कुडचडे नगरपालिका क्षेत्रातील काही पदपथांची स्थिती बिकट बनली आहे. मात्र, नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा फटका या पदपथांवरून चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांना बसत आहे. पेव्हर्स फुटलेल्या पदपथांवर घसरून अनेकजण पडून जखमी झाले आहेत.
नगरपालिकेचे नगरसेवक, अधिकारी या पदपथांवरून फिरत असतात. त्याचबरोबर स्थानिकांनीही पदपथ दुरूस्त करण्याची मागणी कित्येक वेळा केली आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच पदपथावर पडून युवक जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. आता तरी नगरपालिकेने या पदपथांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली.