
मडगाव : रोबोटिक्स आणि एआय हे नव्या पिढीचे भविष्य आहे. त्यामुळे या क्षेत्रात जेथे चांगले काम सुरू आहे, त्या शाळांना 'एआय लॅब' किंवा इतर सुविधांसाठी आवश्यक निधी मिळणे गरजेचे आहे. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी दिले.
कोंब येथील 'समाजसेवा संघ' संचालित एआय आणि रोबोटिक्स केंद्रातील विद्यार्थ्यांच्या कल्पक आविष्कारांचे प्रदर्शन 'महिला नूतन हायस्कूल'मध्ये आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री कामत यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सुदिन नाईक, सुनील नाईक तसेच शाळेतील शिक्षक व प्राध्यापक उपस्थित होते. या प्रदर्शनात रिमोटवर चालणारी कार, ऑटोमॅटिक डोअर लॉकिंग सिस्टीम आणि प्रश्नांची उत्तरे देणारा रोबोट अशा सुमारे १४ प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी मंत्री कामत म्हणाले की, सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात रोबोटिक्स आणि एआयच्या महत्त्वावर शाळांनी भर दिला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. आजच्या मुलांना प्राथमिक स्तरापासूनच हे प्रगत ज्ञान मिळत आहे; याउलट आमच्या काळात अकरावीत गेल्यानंतरच प्रयोगशाळेत जाण्याची संधी मिळत असे. शालेय स्तरावरच अशी माहिती मिळाल्याने मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल आणि हीच मुले पुढे नासासारख्या जागतिक संस्थांमध्ये नाव कमावतील.
एआय ही एक आधुनिक संकल्पना असून देशातील सर्व शिक्षण संस्थांनी तिच्या अंमलबजावणीचा विचार करणे आवश्यक आहे. राज्य सरकारही शिक्षण प्रणालीमध्ये एआयच्या वापराबाबत गांभीर्याने चर्चा करत आहे. जेथे हे शिक्षण उत्तम रितीने दिले जाते, त्या संस्थांना विशेष अर्थसाह्य मिळणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी, सुदिन नाईक यांनी आपली मागणी मांडताना सांगितले की, एआय व रोबोटिक्स शिक्षणासाठी लागणारे किट्स अत्यंत महागडे असतात. सर्वच पालक हा खर्च पेलू शकत नाहीत आणि संस्थांना देणग्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे राज्य सरकारने अशा संस्थांना हक्काचा निधी उपलब्ध करून द्यावा. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री कामत यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.