
मडगाव : रावणफोंड येथील नव्या पुलाच्या कामाचा आढावा घेतला, हे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवा पूल पूर्ण झाल्यानंतर जुना पूल पाडून त्याठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील पुलाचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी दिली.
मडगाव येथील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रावणफोंड पुलाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. सुरुवातीला या ठिकाणी सहापदरी पुलाचे नियोजन होते, मात्र आता चारपदरी पुलाची निर्मिती केली जात आहे. गेली अनेक वर्षे हे काम प्रलंबित होते, परंतु गेल्या वर्षभरात मंत्री कामत यांच्या पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली आहे. सध्या सुरू असलेल्या दोन पदरी पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, ३१ मार्चपर्यंत हा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
पुलाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर जुन्या पुलावरील जलवाहिन्या आणि वीज वाहिन्यांचे (केबल्स) स्थलांतर केले जाईल. त्यानंतर अनेक दशकांपूर्वीचा जुना पूल पाडून उर्वरित दोन पदरी पुलाचे काम सुरू होईल. वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी या चारपदरी पुलाचे काम टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, आर्लेम येथील उड्डाणपूल मारुती मंदिराजवळ उतरणार आहे. भविष्यातील वाहतुकीची गरज आणि नुवे बायपासवरील ताण लक्षात घेता, हा उड्डाणपूल थेट रावणफोंड पुलापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठवला आहे. याशिवाय, मडगाव शहरातील वाहतूक 'विद्या विकास मंडळ' शैक्षणिक संकुलाजवळून वेस्टर्न बायपासला जोडण्याचा प्रस्तावही मंत्री कामत यांनी मांडला आहे. हा नवा रस्ता पूर्ण झाल्यावर खारेबांध आणि कोंब परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.