
वाळपई : सत्तरीत (Sattari) सुमारे दोन दशकांपूर्वी शेतकऱ्यांसाठी पाणीसाठा वाढविण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या सुमारे ३० बंधाऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या बंधाऱ्यांवरील लोखंडी गेट्स गंजून त्यांना छिद्रे पडली असून; त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. परिणामी पाणीसाठा घटला आहे. त्याचा शेतीला फटका बसत आहे.
जलसंपदा खात्याने (WRD) सुमारे २००५ पासून वाळवंटी (Valvanti), म्हादई (Mhadei), रगाडा (Ragada), वेळूस (Velus) या नद्यांसह तालुक्यातील इतर उपनद्यांवर हे बंधारे उभारले होते. या प्रकल्पामुळे शेती, बागायतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले. बरीच जमीन लागवडीखाली आली.
लिफ्ट सिंचन योजनेद्वारे पाणी शेती, बागायतीपर्यंत पोहोचवण्यात येते. या बंधाऱ्यांमुळे ओसाड जमिनी लागवडीखाली आल्या. काजू, नारळ, सुपारी, आंबा आणि मिरी यांसारख्या पिकांची लागवड वाढली. शेतकऱ्यांच्या मते, सत्तरीतील कृषी उत्पादनात या बंधाऱ्यांचा मोठा वाटा आहे.
२० वर्षांनंतर बंधारे दयनीय स्थितीत
आता जवळपास २० वर्षांनंतर अनेक बंधाऱ्यांच्या लोखंडी गेट्स कमकुवत झाल्या आहेत. गंजलेल्या गेट्समधील छिद्रांमधून पाणी बाहेर जात असल्याने; पुरेसा साठा राखणे कठीण झाले आहे.
गेल्या पाच वर्षांपासून एप्रिल-मे या उन्हाळ्याच्या कालावधीत अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत आहे. पाण्याची पातळी घटल्याने सिंचनावर परिणाम होत असून; शेती धोक्यात आली आहे. पाणीसाठा कमी होण्यामागे खराब गेट्स हेच मुख्य कारण असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
गेट्स बदलण्यासाठी ६ कोटींचा प्रस्ताव
दरम्यान, स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्व ३० बंधाऱ्यांवरील गेट्स बदलण्यासाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र; प्रस्तावाला अजून मंजूरी मिळालेली नाही. आता पाच किंवा दहा बंधाऱ्यांचे टप्प्याटप्प्याने प्रस्ताव सादर करण्याचा पर्याय विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.