राज्यात २,३७५ अपघातांत २२३ जणांचा मृत्यू

२०२० मधील वाहतूक खात्याची आकडेवारी : अतिवेगाने वाहन चालवल्याने ७७.६८ टक्के अपघात

Story: प्रसाद शेट काणकोणकर। गोवन वार्ता |
20th September 2021, 11:02 pm
राज्यात २,३७५ अपघातांत २२३ जणांचा मृत्यू

पणजी : अपघाती मृत्यू हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनला आहे. राज्यात २०२० मध्ये २,३७५ अपघातांत २२३ जणांचा मृत्यू झाला. असे असताना राज्यात २०२० मध्ये अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे ७७.६८ टक्के अपघात तर हेल्मेट व सीट बेल्ट न घातल्यामुळे ५४.७० टक्के अपघाती मृत्यू झाले आहेत. या व्यतिरिक्त राज्यात ७५.३३ टक्के म्हणजे १६८ दुचाकी चालक आणि मागे बसलेल्यांचा मृत्यू झाला आहे, तर ५४.७० टक्के मृत्यू हे ३५ वर्षांखालील युवकांचे झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय बनला आहे. वाहतूक खात्याने जारी केलेल्या ‘गोव्यातील रस्ता अपघात २०२०’मधील आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे.
राज्यात अपघाती मृत्यू टाळण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी वाहतूक विभाग, पोलीस आणि वाहतूक खात्याने विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे राज्यातील अपघातात तसेच मृत्यू संख्येत काही प्रमाणात फरक पडला आहे.
राज्यात २०२० मध्ये २,३७५ अपघातांत २२३ जणांचा मृत्यू झाला. यात १९८ पुरुष तर २५ महिलांचा समावेश आहे. २०१९ मध्ये ३,४४० अपघातात २९७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यात अपघातात ३०.९६ टक्के तर मृत्यूत २४.९२ टक्के घट झाल्याची माहिती वाहतूक खात्याच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे.
२५ ते ३५ वयोगटातील युवकांचे सर्वाधिक मृत्यू
राज्यात २०२० मध्ये सर्वाधिक ३०.९४ टक्के म्हणजे ६९ अपघाती मृत्यू २५ ते ३५ वर्षे वयोगटातील व्यक्तीचे झाले आहेत. यात ६५ युवक व ४ युवतींचा समावेश आहे. त्यानंतर २१.९७ टक्के म्हणजे ४९ अपघाती मृत्यू ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींचे मृत्यू झाले आहेत. यात ४६ पुरुष व ३ महिलांचा समावेश आहे. त्यानंतर २०.१७ टक्के म्हणजे ४५ मृत्यू १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवक - युवतींचे अपघाती मृत्यू झाले आहेत. यात ३९ युवक व ६ युवतींचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यानंतर १३.९० टक्के म्हणजे २५ अपघाती मृत्यू ४५ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींचे झाले आहेत. यात २५ पुरुष तर ६ महिलांचा समावेश आहे. त्यानंतर ९.४१ टक्के म्हणजे २१ मृत्यू ६० वर्षे वयोगटावरील व्यक्तींचे झाले आहेत. यात १७ पुरुष व ४ महिलांचा समावेश आहे.
सर्वाधिक १४३ दुचाकी चालकांचा मृत्यू
राज्यात २०२० मध्ये २,३७५ अपघातात २२३ मृत्यू झाले आहेत. त्यात सर्वाधिक १४३ दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर २९ पादचारी, २५ दुचाकीच्या मागे बसलेले, १२ चालक, ५ प्रवासी, दोन सायकलस्वार आणि सात इतरांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त २०२ जण गंभीर तर ६७८ जणांना किरकोळ दुखापत झाली होती.
अतिवेगामुळे अपघातांत १८१ जणांचा मृत्यू
या व्यतिरिक्त २०२० मध्ये अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे १,८४५ अपघात झाले. यात १८१ जणांचा मृत्यू झाला. चुकीच्या बाजूने वाहन चालविल्यामुळे २२९ अपघात झाले. यात १८ जणांचा मृत्यू झाला. रेड लाईटचे उल्लंघन केल्यामुळे ५ अपघातात एकाचा मृत्यू झाला तर २८८ अपघात इतर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे झाले आहेत. यात २३ जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे ८ अपघात झाल्याचे वाहतूक खात्याच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
२०२० मध्ये झालेल्या अपघातात हेल्मेट परिधान न केल्यामुळे ११५ जणांचा तर सीट बेल्ट न घातल्यामुळे ७ जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त हेल्मेट न घातल्यामुळे २५९ जणांना गंभीर आणि किरकोळ दुखापत झाली आहे. सीट बेल्ट न घातल्यामुळे १०० जणांना गंभीर आणि किरकोळ दुखापत झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रीय महामार्गावर ७८७ तर राज्य महामार्गावर ३२८ मृत्यू
राज्यातील रस्त्याच्या वर्गीकरणानुसार २०२० मध्ये राष्ट्रीय महामार्गावर ७८७ अपघात झाले आहेत. त्यात ६१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर राज्य महामार्गावर ३२८ अपघातांत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त इतर रस्त्यांवर १,२६० अपघातात १३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

वर्षभरात झालेले अपघात व मृत्यू
................................
महिना :    अपघात - मृत्यू
जानेवारी : ३४४ -      ३१
फेब्रुवारी : ३१५ -      २७
मार्च :       १९६ -     २९
एप्रिल :      ८२ -      ०७
मे :          १५६ -     १०
जून :       १५६ -     १९
जुलै :       १२९ -     १०
ऑगस्ट :  १४५ -    १३
सप्टेंबर :  १५६ -     १३
ऑक्टोबर : १८३ - २१
नोव्हेंबर : २४१ - १९
डिसेंबर : २७२ - २४
.............