फेसबुक – अर्जंट मनी

एकदा मी त्याची चांगली विचारपूस केली व नंतर विचारले, लाज नाही वाटत तुला पैशे मागायला? नाही म्हणाला! म्हणजे बघा.

Story: आदित्य सिनाय भांगी/ साहाय्यक प्राध्य� |
19th September 2021, 12:38 am
फेसबुक – अर्जंट मनी

जेसोशल मीडियावर सक्रिय आहेत (खास करून फेसबुकवर) त्यांना माहित असणारच, मागच्या काही महिन्यात किती बनावट अकाऊंट बनवून लोकांना लुटण्याचा प्रयत्न केला जात होता. बनावट अकाऊंट बघितल्यावरच लक्षात येत होते. कारण हे तर असेच होते जणू अमिताभ बच्चन स्वतः पुढून तुम्हाला फोन करतो. खूप महनीय व्यक्तींचे बनावट अकाऊंट बनविले गेले व त्यातून खूप लोकांना त्यांचे फ्रेंड रिक्वेस्ट येत होते. रिक्वेस्ट त्यांनाच येत होते जे सक्रिय आहेत. मला तर सर्व रिक्वेस्ट आल्या. हिमाचल प्रदेशचे माननीय राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (राज्यपाल बनण्याअगोदर) आला होता. त्यात एक अपघात झालेल्याचा इस्पितळात प्लास्टर घालून फोटो तर हमखास होता. आता बनावट करणाऱ्याला इतकी पण अक्कल नाही की राजेंद्र आर्लेकर सामान्य माणसाकडून कशाला पैसे मागणार? नंतर दिगंबर कामत, महादेव नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, डॉ. विनायक बुवाजी अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने रिक्वेस्ट आले. सामान्य माणसांचे पण आलेत. तसे सगळेच माणूस सामान्य व सगळेच माणूस मोठे, भेदभाव नको! खूप लोकांनी मला विचारले हे तुलाच कशाला येतात रिक्वेस्ट? मी म्हटले मलाच येतात असे नाही हो, जे सक्रिय आहेत व ज्यांची फ्रेंड लिस्ट जवळपास ५००० झालीय व ज्यांचे म्युच्युअल फंड (सॉरी, म्युचुअल फ्रँड) जास्त आहेत त्यांना येतात. तसे म्युचुअल फंडात किती पैसे आहेत त्यावरूनसुद्धा येतात वाटते.

आता बनावटवाले काय करतात, हे आधी समजून घेऊया. ते तुमचा प्रोफाईल फोटो, कवर फोटो घेतात व तो वापरून नवा अकाऊंट बनवतात. म्हणजे प्रथमदृष्ट्या असे वाटते की खरा तोच माणूस आहे. लोक नंतर स्टेटस टाकत होते की त्यांचा अकाऊंट हॅक केलाय. कुणाचाच अकाऊंट हॅक झाला नव्हता. फक्त डुप्लीकेट अकाऊंट बनविले जात होते. ते जर नीट पाहिले तर लक्षात येत होते. एक तर यू.आर.एल. वेगळे होते. एकच यू.आर.एल. दोन वेळा वापरायला मिळत नाही. ईमेल आई.डी. लपविलेली होती. एका ईमेल आई.डी. वरून दोन अकाऊंट बनवायला मिळत नाहीत. एक फेसबुक अकाऊंट डिलीट व्हायला चौदा दिवस लागतात. म्हणजे बघा किती ईमेल आई.डी. बनविल्या असणार! नंतर त्यांची पद्धत होती की जे त्यांचे मित्र आहेत त्यांना जोडायचे. जर तुम्ही 'फक्त मित्रांचे मित्र' फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतात असे सेटिंग ठेवले तर एकही म्युचुअल नसलेली व्यक्ती तुम्हाला रिक्वेस्ट पाठवू शकत नाही. पण काही लोक खरा अकाऊंट समजून स्विकारत होते व ते सेटिंग केलेले असल्यास व्यर्थ जात होते. तसे ते सेटिंग चांगले आहे व प्रोफाईल लॉक फिचर पण चांगला आहे जो तुम्हाला सुरक्षित ठेवतो.

काहीजण मित्राला इस्पितळात दाखल केलाय असे प्रूफ म्हणून फोटो पण पाठवायचे व सांगायचे, argent money chahiye, शाम को 7 बजे तक रिटर्न करूँगा. आता किती वेळा मी त्याला सांगितलंय जो पर्यंत तू argent ची स्पेलिंग ठीक करत नाही तोपर्यंत तुला पैसे देणार नाही. एकदा तर मी म्हटलं की एक तर डेटा पॅक आहेच तुझ्या जवळ, गुगल करून स्पेलिंग ठीक कर किंवा मी १५० रुपये देतो, आधी एक डिक्शनरी घे. बाकीचे पैसे नंतर बघू. आम्ही काही मित्र जेव्हा फ्री होते, तेव्हा बऱ्यापैकी मनोरंजन व्हायचं आमचं.एकदा तर तो मला म्हणाला," Evening 5 AM को रिटर्न करूँगा।" मी त्याला म्हटले, संध्याकाळी PM म्हणतात, AM नव्हे. तर त्याने चुक सुधारली व म्हणाला, चुकून गेलं.

 एकदा मी त्याची चांगली विचारपूस केली व नंतर विचारले, लाज नाही वाटत तुला पैशे मागायला? नाही म्हणाला! म्हणजे बघा. असाच एकदा ए.टी.एम. फ्रॉडवाल्याचा फोन आला. आम्ही काही माणसे बोलायला तशी हुशारच. म्हणजे अनोळखी लोकांशीसुद्धा तासनतास बोलण्याची कला काही लोकांत असते. मी त्याच्याशी १५ मिनिटं गप्पा गोष्टी केल्या. कार्ड शोधतो वगैरे असे सांगितले. त्याच्या घरच्यांची चौकशी केली, कधी भेटूया आपण वगैरे विचारले. नंतर हिंदी शिव्या देऊ लागला. मी सरळ म्हटले, बघ भावा, तुझ्यापेक्षा जास्त शिव्या मला येतात त्या सुद्धा शुद्ध स्पेलिंग सकट, फक्त संस्कार मध्ये येतात म्हणून देऊ शकत नाही. मग काय? फोन ठेवला त्याने. शेरास सव्वाशेर मिळाला. माझे तर फेसबुकवर इतके मित्र झाले आहेत की एकदा कस्टमर केअर अधिकारी मला म्युचुअल मित्रामधला भेटला. लोक मला म्हणतात की कदाचित कधी अपघात झाला तर ज्या गाडीशी अपघात झाला असेल तो एक तर तुझा मित्र असणार किंवा म्युचुअल कुणी तरी असणारच.

पण काहीही म्हणा, बनावट खाते करणारे तसे फार हुशार असतात. आम्हाला इकडे एक पासवर्ड लक्षात राहत नाही व ते रोज वेगवेगळे बनवतात. गुगलमध्ये सेव्ह करत असणार. पण ती हुशारी काय कामाची? आतंकवादीसुद्धा किती शिकलेले आहेत, पण डोके कसल्या वाईट कामासाठी वापरतात ते बघा ना. सर्व बनावट फेसबुक खाते, पेज वगैरे काढल्यावर तर फेसबुकवर खात्यांची संख्या खूप कमी होईल. जितके जगात लोक नाहीत त्या पेक्षा जास्त खाती असतील!  सोशल मीडिया व आधार कार्ड लिंक केले तर कळणार की एंजल प्रिया तर आपला शेजारचा काळू आहे. म्हणून परी व हीरोंपासून सावध व्हा व आपली खाती सांभाळा - दोन्ही खाती! बँकेचे व सोशल मीडियाचे पण! कारण उद्या तुम्हाला एर्जंट मनी कुणी देणार नाही!प्रमोद सावंतचे बनावट खाते बनवून जेव्हा पैसे मागितले जाऊ लागले, तेव्हा त्यांनी पण लवकरच स्पष्ट केलेय - कितीही पैशे मागू द्या, दिवपाची गरज ना!