सुखाची सावली माझे बाबा

लेखक व. पू. काळे म्हणतात आकाशापेक्षा उंच कोण तर बाप'. खरंच आई जर मायेची माऊली असते तर बाप सुखाची सावली असतो.

Story: माझे बाबा । निकिता शिरोडकर, इब्रामपूर |
18th September 2021, 12:39 am
सुखाची सावली माझे बाबा

कधी कधी काही गोष्टी शब्दात न व्यक्त होण्यासारखा असतात. खूप कमी वेळा अस घडतं की आपण आपल्या मनातल्या गोष्टी बोलून दाखवतो, तसंच काहीसं माझंही आहे. मी सहज व्यक्त होत नाही, म्हणण्यापेक्षा मला ते जमतच नाही. काहीवेळा आपल्या मनातील खऱ्याखुऱ्या भावना बोलून दाखवणं मला तरी खूप अवघड वाटतं. अशी किती मुलं असतील जी आपल्या आईबाबंचे त्यांच्या समोर बसून गुणगान करत असतील,त्यांच्याबद्दल काय वाटतं हे शब्दात मांडत असतील माहीत नाही. मला तर या गोष्टी फक्त एखाद्या चित्रपटात किंवा मालिकेत बघायला मिळतात. कारण वास्तव्यात अश्या गोष्टी खूप कमी घडत असतात. आपण अनेकवेळा आईविषयी खूप काही बोलत असतो, पण बाबाबद्दल तेवढं व्यक्त होताना दिसत नाही. खरंतर असं म्हणतात की बाबा आपल्या मुलीच्या खूप जवळचा असतो आणि ते खरंही आहे.

माझ्या बाबांना नाटक, संगीत याविषयी अधिक वेड आहे. त्यांना नाट्यप्रेमी म्हणण्यास काहीच हरकत नाही. सतत त्यांच्या तोंडातून कुठल्या ना कुठल्या नाटकाचा संवाद आम्हाला ऐकायला मिळतो. त्यांना अभिनयाची ओढ जास्त आहे. त्यांच्यामुळेच मलाही नाटकात रस वाटू लागला. 

आमचं छोटंसं कुटुंब आई, बाबा, मी आणि माझी धाकटी बहिण. अनेकवेळा कोणीही मित्रमंडळी आली किंवा पाहुणे आले तर एक वाक्य त्यांच्या तोंडातून हमखास ऐकायला मिळतं ' दोन्हीही मुलीच, एक तरी मुलगा हवा होता ' आणि हे ऐकून ऐकून त्या वाक्याची चीड यायला लागली. पण आमच्या बाबांनी कधी आम्हाला कमी लेखलं नाही किंवा अंतर दिलं नाही. ते सतत म्हणतात, "लोकांना दाखवून द्या, मुली मुलापेक्षा कमी नाहीत. " आणि हीच गोष्ट त्यांच्याबद्दल मला खूप आवडते.

आणखीन एक गोष्ट त्यांच्याबद्दल सांगावीशी वाटते ती म्हणजे, त्यांचा माझ्यावर जो विश्वास आहे तो. कारण खूप कमी आईवडील असतात जे आपल्या मुलांवर विश्वास ठेवत असतात. आपल्यावर जेव्हा आपली जवळची व्यक्ती विश्वास ठेवत असते, तेव्हा नकळतपणे आपण त्या विश्वासाला तडा जाऊ नये याची काळजी घेत असतो. अनेकवेळा मित्रमैत्रिणींसोबत बाहेर कुठंही जायचं असेल तर त्यासाठी परवानगी मला मिळते. त्यासाठी खोटं बोलून बाहेर पडायचा प्रश्नच निर्माण होत नाही. अनेकवेळा अनेकजणांकडून कुठंही बाहेर जायचं असलं, तर घरचे पाठवणार नाही ही खंत व्यक्त होताना दिसते. मग खोट्या सबबी सुरू होतात. या बाबतीत मला मी भाग्यवान मानते. आपल्या वडिलांचा आपल्यावर विश्वास आहे हेच खूप समाधानकारक वाटतं. 

माझ्या बाबाचं नाव दिपक आहे. मी लहानपणापासून त्यांना डॅडी याच नावाने हाक मारते. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते थोडेसे कठोर, संवेदनशील, उदार हृदयाचे आहेत. आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना द्यावे असं त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे. त्याचबरोबर कलेचे ते पुजारी आहेत. कला माणसाला घडवते, कलेमुळे माणसाचं जीवन समृध्द होते असे त्यांचे विचार आहेत. त्याचबरोबर राजकारणातही विशेष रस त्यांना आहे. ते सतत सांगत असतात खूप शिका. ते सतत आम्हला प्रोत्साहन देत असतात. आम्हाला काहीही कमी पडू नये याची काळजी ते घेत असतात. पण काही चुकलं तर फटकेसुध्दा देतात.

मला एक गोष्ट प्रकर्षाने आठवते ती म्हणजे लहानपणी मला १५ ऑगस्ट , १९ डिसेंबर या दिवसाचं महत्त्व आणि साल आठवणींत राहायचं नाही आणि यमुळे मी शाळेत असताना बाबाकडून खूप मार खाल्ला. ते मध्येच केव्हातरी विचारायचे अमुक अमुक कोणता दिवस आणि जर आलं नाही, तर मार ठरलेला होता.

मी शाळेत असताना भरपूर मार खाल्ला एवढं मात्र आठवतं. तसाच एक प्रसंग म्हणजे शाळेत असताना माझं आणि माझ्या मैत्रिणीचं भांडण झालं आणि त्या रागात मी तिच्या हाताला चावले. त्यानंतर शाळेतल्या बाईंनी मला झोपडले ते झालंच, त्या नंतर बाबानेही बरेच फटके दिले. त्या दिवसापासून अशी चूक मी पुन्हा कधी केलीच नाही.

माझे बाबा थोडेसे तापट स्वभावाचे आहेत. राग त्यांना लवकर येतो आणि जातोही. कोणतीही गोष्ट मनापासून करायची ठरवली, की त्या कमासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. अनेक वेळा अनेक प्रसंगी आईला हळवी होताना मी पाहिलं आहे पण बाबांना मात्र कधीच पाहिलं नाही. कारण त्यांनी कधी आम्हला ते जाणवूच दिलं नाही. 

लेखक व. पू. काळे म्हणतात आकाशापेक्षा उंच कोण तर बाप'. खरंच आई जर मायेची माऊली असते तर बाप सुखाची सावली असतो. खरंच बाप म्हणजे संगीतातील स्वर आहे, घराचा पाठीराखा आहे.