जिंदगी एक सफर है सुहाना!

आत्महत्या ही फार मोठी जागतिक समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दर ४० सेकंदाला एक व्यक्ती जगात कुठेतरी आत्महत्या करत असते, तर दर ३ सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करते.

Story: समुपदेशन। विभा राजीव आळगुंडगी , फोंडा |
18th September 2021, 12:20 am
जिंदगी एक सफर है सुहाना!

"जीवनातला सर्वात मोठा गौरव कधीही न पडण्यामध्ये नाही, तर प्रत्येक वेळी आपण पडल्यावर उठण्यात असतो". प्रतिष्ठित नोबेल शांतता पुरस्कार आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित कै. नेल्सन मंडेला यांचे हे शब्द किती खरे आणि प्रेरक आहेत. आयुष्यात कष्टच केले नाहीत तर ते आयुष्य कसले? आपल्याला जर दुःख आणि वेदना या भावना नसत्याच तर आपल्याभोवती घडत असलेल्या सुखद अनुभवांची किंमत आपल्याला समजली असती का? म्हणूनच दुःख हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण अडथळे, अडचणी यांमुळेच तर आपल्या सुखाचा मार्ग सुंदर आणि अर्थपूर्ण बनतो. 

तरीही अनेक कारणांमुळे बरेचसे लोक आपल्या दुःखांचा सामना प्रभावीपणे करू शकत नाहीत. प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्याचे अनुभव भिन्न असतात. त्यामुळे प्रत्येक माणूस आपल्या अडथळ्यांचा सामना वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. काही लोक त्यात सफल होतात, तर काहींना आपल्या अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी एक मदतीचा हात हवा असतो. मागच्या लेखात आपण आत्महत्येबद्दलच्या काही मिथकांचा उलगडा केला. आज आपण अशा लोकांना कशा प्रकारे आधार देऊन त्यांची मदत करू शकतो हे जाणून घेऊया. 

आत्महत्या ही फार मोठी जागतिक समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दर ४० सेकंदाला एक व्यक्ती जगात कुठेतरी आत्महत्या करत असते, तर दर ३ सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करते. अशा या गंभीर समस्येला आपण सामाजिक बांधिलकी म्हणून आळा घालण्यास मदत करू शकतो. म्हणूनच आत्महत्या का होतात? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला खोलात जावे लागेल. 

आत्महत्येच्या संदर्भात लिंगभेद लक्षणीयरित्या पहायला मिळतो. संशोधनाअंती असे दिसून आले आहे की महिलांपेक्षा पुरुषांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे, पण आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे. आयुष्याचा उत्तरार्ध हाही आत्महत्येचा एक घटक असल्याचे सिद्ध झाले आहे. 

तरुण लोक आत्महत्या करण्याबाबत जरी अतिसंवेदनशील वाटत असले, तरी आत्महत्येचा धोका वयानुसार वाढत जातो. बेरोजगारी एक महत्त्वाचा घटक मानला जातो. तरीसुद्धा कित्येक व्यावसायिक आणि प्रतिष्ठित व्यक्तीही जीवनातल्या वाढत्या शर्यतीत क्षणिक अपयशामुळे आत्महत्येचा मार्ग पत्करतात. नैराश्य हा एक मानसिक आजार असून आत्महत्येचे सर्वात मोठे कारण आहे. याव्यतिरिक्त इतर मानसिक आजार जसे द्विध्रुवीय विकार (Bipolar disorder), स्किझोफ्रेनिया, चिंता (Anxiety Disorders), दारू, तंबाखू, धूम्रपान, अंमली पदार्थांचे सेवन वगैरे गोष्टीही तितक्याच जबाबदार आहेत. याव्यतिरिक्त अनेक परिस्थितीजन्य घटक माणसाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू शकतात. उदाहरणार्थ, शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण, कुटुंबात मृत्यू किंवा आघात, प्रेम संबंधात झालेले क्लेश आणि 'break-ups', गुन्हा - अपराध संबंधीचा त्रास, शैक्षणिक अपयश, शाळेत किंवा कॉलेजमधे इतरांकडून होत असलेला मानसिक छळ, वगैरे. 

वर सांगितलेल्या विविध समस्यांनी आपण जरी त्रस्त झालेलो असलो, तरी आयुष्यातील अनेक सुखदायक गोष्टींपासून आपण सतत प्रेरणा घेत असतो. नैराश्यग्रस्त माणसाला त्याच्या समस्येतून बाहेर येण्यात हे संरक्षणात्मक घटक बर्‍यापैकी आधार देऊ शकतात. प्रत्येक माणसासाठी असे संरक्षणात्मक घटक भिन्न असू शकतात. पण साधारणतः चांगले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, रोजगार, सुखी विवाहित आणि कौटुंबिक जीवन, इतरांकडे प्रभावी संवाद, अध्यात्म आणि आध्यात्मिक विश्वास, छंद किंवा आवड, आर्थिक सुरक्षा असे घटक लक्षणीय असू शकतात. 

आयुष्यात कितीही अडचणी आल्या, तरीही हे संरक्षणात्मक घटक आपल्याला त्यातून बाहेर पडायला मदत करू शकतात. आपण जेव्हा एका दुःखी माणसाला आधार देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण हे लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येक व्यक्तीची जगण्याची प्रेरणा वेगळी असू शकते. म्हणूनच आपण जर चुकीच्या घटकांवर जोर देऊन मदत करण्याचा प्रयत्न केला तर 'पालथ्या घड्यावर पाणी' ही गत होऊ शकते. उदाहरणार्थ जर एका नास्तिक व्यक्तीला "देव तुला सांभाळून घेईल" असं म्हंटलं तर त्यातून मदत मिळायच्या ऐवजी त्याला उलट राग येऊ शकतो. 

आत्महत्या हा एक अत्यंत संवेदनशील विषय असल्यामुळे त्याच्यावर चर्चा केली जात नाही. त्यामुळे बहुतांश वेळा माणूस मदत न मागताच किंवा अपेक्षित मदत न मिळाल्यामुळेच आत्महत्येचा पर्याय निवडतो. म्हणूनच आत्महत्या करण्यास प्रवृत्त असलेल्या व्यक्तींना ओळखणे हे त्यांना मदत करण्याइतकेच महत्त्वाचे ठरते. बहुतेक वेळा आत्महत्येचा विचार मनात आलेल्या लोकांच्या वागण्यात बदल झालेला पहायला मिळतो. उदाहरणार्थ, सर्वसाधारणपणे आत्महत्येबद्दल बोलणे, प्राणघातक वस्तूंच्या शोधत असणे, मृत्युबद्दलच्या विचारांत व्यस्त असणे, जगण्यासाठी कोणतीच आशा नाही असे वाटणे, स्वतःचा तिरस्कार, परिस्थितीसाठी सतत स्वतःला दोष देणे, मालमत्तेची व्यवस्था (आपली मालमत्ता इतरांमध्ये वाटून मोकळे होणे), अचानक फोन करून / पत्र लिहून / मेसेज पाठवून सगळ्यांचा अप्रत्यक्ष निरोप घेणे, स्वतःची हानी करून घेणे, अचानक शांततेची भावना येणे वगैरे.  मृत्यू किंवा आत्महत्येबद्दल अनपेक्षित विनोद करणे हेही आत्महत्या करू पहाणाऱ्या व्यक्तीमध्ये दिसू शकते. 

अशा परिस्थितीत कुणालाही मदत करण्याच्या आधी आपल्याला आत्महत्येबद्दलचे स्वतःचे प्रतिबंध दूर करावे लागतील. एकदा आपल्याला समजले की आत्महत्या आणि आत्मघाती विचारांबद्दल मनमोकळेपणाने बोलणे हाच आत्महत्या रोखण्याचा मार्ग आहे तरच आपण इतर लोकांना प्रभावीपणे मदत करू शकतो.अशा लोकांना मदत ही शुद्ध भावनेतून केली गेली पाहिजे. आपण मन लावून त्या व्यक्तीची व्यथा ऐकू शकतो. त्यांना "मी मदतीला आहे" हा दिलासा देऊ शकतो. शक्य असेल तर त्यांच्याकडील संभावित प्राणघातक वस्तू (चाकू, ब्लेड वगैरे) आपण त्यांच्यापासून दूर ठेऊ शकतो. कोणत्याही क्षणी ते एकटे नाहीत याची खात्री करू शकतो. त्यांना मानसोपचार व समुपदेशनासाठी प्रवृत्त करून त्यांच्या उपचारांची देखरेख करू शकतो. 

याव्यतिरिक्त आपल्या राज्यात COOJ या स्वयंसेवी संस्थेच्या आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाईन क्रमांकाबद्दल (०८३२-२२५२५२५) आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. सोमवार ते शुक्रवार दुपारी १ ते संध्याकाळी ७ वाजे पर्यंत COOJ या संस्थेचे तज्ञ या हेल्पलाइनवर सतत लोकांना प्रभावीपणे मदत करत असतात. ही हेल्पलाइन जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवूनसुद्धा आपण एक जीव वाचवू शकतो. 

तर या वर्षी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन अधिक अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करूया. गरजूंना त्यांच्या भीती आणि अडचणींपासून मुक्त होण्यासाठी मदत करूया. अडचणींच्या दलदलीत न अडकता स्वतः मदत घेऊया आणि इतरांचाही आधार बनूया.