गर्भसंस्कार

मुल जन्माला येण्यापूर्वी त्याच्यावर गर्भसंस्कार अत्यंत गरजेचे आहेत. आई - वडिल व घरातील माणसांच्या सात्विक विचारांचाही गर्भाच्या मनावर परिणाम होतो. या सात्विक वातावरणाचे मुलाच्या पुढील शारीरिक व मानसिक वाढीवर चांगले परिणाम होतात.

Story: ललित । प्राची जयवंत नाईक, धारगळ ( ८००७२� |
18th September 2021, 12:19 am
गर्भसंस्कार

भारतीय संस्कृतीत अनेक चालीरितींचे पालन केले जाते. त्यापैकीच 'गर्भसंस्कार' ही देखील एक महत्वाची पद्धत आहे. 'गर्भसंस्कार' यामध्ये 'गर्भ' म्हणजे बाळ व 'संस्कार' म्हणजे त्या बाळावरील संस्कार असा त्याचा अर्थ आहे. गर्भसंस्कारामुळेच जन्माला येणारं बाळ हुशार आणि बुद्धीमान होते. जे संस्कार बाळाला गर्भात असताना होतात, त्याचा परिणाम अायुष्यभर त्याच्यावर होत असतो. आईने गरोदरपणाच्या काळात बाळ आणि त्याच्या भविष्याविषयी सतत चांगले विचार केल्यास त्याची चांगली फळं बाळ मोठं होताना दिसून लागतात. गर्भसंस्कारानुसार आई आणि गर्भाशयात वाढणारं बाळ प्रत्येक क्षण एकमेकांशी जोडलेले असतात. आईची भावनिक अवस्था, मानसिक स्थिती, तिची विचारसरणी, आहार इत्यादी सर्व गोष्टी गर्भावर परिणाम करतात. ते बाळ आईच्या गर्भात सर्वकाही एेकतं. आईची सवय, तिच्या इच्छासुद्धा संस्काराच्या रूपात तिच्या बाळामध्ये प्रवेश करतात.

माझी आई सांगते की, तिने तिच्या गरोदरपणाच्या काळात गणपती स्तोत्र आणि कलावती आईचे चरित्र वाचले होते. अशा पुस्तकातून बाळापर्यंत सकारात्मक उर्जा व भावना पोहोचतात. तसंच आईचं मन देखील शांत होत. म्हणूनच या काळात आईने भयकथा पाहणं किंवा वाचणं टाळलं पाहिजे.

जसं बाळाचं शरीर निरोगी व सुदृढ राहावं म्हणून त्याचे आई-वडिल प्रयत्न करतात, अगदी तसंच ते बाळावर गर्भातच संस्कार करण्यासाठीही प्रयत्न करतात. पौराणीक काळात गर्भसंस्काराची अनेक उदाहरणे आहेत. जसे - जिजामाता यांना शिवाजी महाराज पोटात असताना घोड्यावर बसण्याचे, तलावारबाजीचे, दांडपट्टा चालवण्याचे डोहाळे लागले होते. जिजामाता यांच्या या दिव्य अाणि क्रांतीकारक विचारांमधूनच शिवाजी महाराजांकडून स्वराज्याची निर्मिती झाली. दुसरी गोष्ट म्हणजे अर्जुनाने सुभद्रेला प्रसव वेदनांपासून लक्ष विचलित करण्यासाठी  अभिमन्यु गर्भात असताना सुभद्द्रेला चक्रव्युह भेदन कसे करावे हे सांगितले होते. अभिमन्युने ते गर्भात असताना ऐकले होते. महाभारतातील महायुद्धात जेव्हा अर्जुन जवळ नसताना पांडवांवर चक्रव्युह भेदन करण्याची वेळ अाली, तेव्हा तेवीस वर्षीय अभिमन्युला गर्भात असताना ऐकलेली चक्रव्यूह भेदन करण्याची गोष्ट आठवली होती आणि तिसरे उदाहरण म्हणजे, भुवनेश्वरीजी स्वामी विवेकानंद पोटात असताना ध्यानधारणा करत असत ज्यामुळे त्यांच्या विवेकानंद लहानपणापासूनच ध्यानविद्या जाणत होते.

मुल जन्माला येण्यापूर्वी त्याच्यावर गर्भसंस्कार अत्यंत गरजेचे आहेत. आई - वडिल व घरातील माणसांच्या सात्विक विचारांचाही गर्भाच्या मनावर परिणाम होतो. या सात्विक वातावरणाचे मुलाच्या पुढील शारीरिक व मानसिक वाढीवर चांगले परिणाम होतात. ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता यासारख्या पुस्तकांचे वाचन करावे. संतांची, देवांची, चरित्रे वाचावीत. मनाला त्रास होईल अश्या रहस्यकथा वाचू नयेत किंवा वाहिन्यांवरील मारामाऱ्या, खून यासारखी भीती, दुःख किंवा क्रोध निर्माण करणारी दृश्ये बघू नयेत. गरोदर स्रीला ज्या देवतेचे, संताचे किंवा वीरपुरूषांचे गुण आपल्या मुलात यावे, असे वाटत असेल, त्याची मूर्ती किंवा छायाचित्र समोर ठेवून त्यासमोर ध्यान करावे.