दहशतवाद, हिंसाचारामुळे सुरक्षेला धोका

Story: वाचक पत्रे |
31st July 2021, 12:33 am
दहशतवाद, हिंसाचारामुळे सुरक्षेला धोका

मिझोराम व आसाम सीमावाद भडकला,  ही बातमी नुकतीच वाचली आणि यामुळे देशाच्या एकसंधतेच्या पर्यायाने सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत धोक्याची घंटा आहे, असाच विचार मनात आला.

सीमावादामुळे या दोन्ही राज्यांतील सीमाक्षेत्रातील   लोकांमध्ये ऑगस्ट २०२० व फेब्रुवारी २०२१  मध्ये हिंसा भडकली होती. जुलै २०२१ पासून  आसाममधील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम येथील पोलिसांनी सुरू केली. यानंतर पुन्हा दोन्ही राज्यात दंगली सुरू झाल्या. सीमावाद पुन्हा भडकल्यामुळे आसाममधील कछार क्षेत्रात मिझोराम पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सहा पोलीस ठार झाले व ५०हून जास्त पोलीस जखमी झाले. मागील अनेक वर्षांपासून सीमावादामुळे सुरू असलेल्या हिंसाचारात बरेच निरपराध लोकही बळी गेलेले आहेत. असाच सीमावाद महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांतही बेळगाव प्रश्नावरून उफाळून येतो. गेली सहा दशके नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे महाराष्ट्रातील काही राज्यांत व  छत्तीसगडमध्येही नरसंहार सुरू आहे.

काश्मीर तर देशाच्या स्वातंत्र्यापासून  धगधगत आहे. दहशतवाद, धार्मिक दंगली, १९९० मधील काश्मिरी पंडितांवरील हल्ले, त्यांचा नरसंहार, विस्थापन या सर्व गोष्टींचा विचार करता भारत देश अंतर्गत कलहामुळे पोखरून गेल्याचेच हे चित्र आहे.

यामुळे शत्रुराष्ट्रांचाच लाभ होत आहे आणि भविष्यातही भारत देशासाठी ही धोक्याची घंटा आहे हे विसरून चालणार नाही.

— गोविंद लोलयेकर, काणकोण