मनोज परब व सहकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

|
30th July 2021, 11:50 Hrs
मनोज परब व सहकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मनोज परब

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पर्सन ऑफ गोवन ओरिजिन (पोगो) विधेयकाबाबत मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर डिचोली पोलिसांनी शुक्रवारी रिव्हाॅल्युशनरी गोवन्सचे (आरजी) मनोज परब यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला प्रतिबंधक अटक करून न्याय दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले.
दरम्यान, परब यांना ताब्यात घेतल्यानंतर पर्वरी विधानसभेत प्रवेश करताना पर्वरी पोलिसांनी आरजीचे अध्यक्ष विरेश बोरकर आणि श्रीकृष्ण परब या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्या दोघांना पोलीस स्थानकावर नेऊन सोडण्यात आले. दरम्यान पोलिसांनी पोगो संबंधित आणलेले निवेदन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात नोंदणी करून त्यांच्याकडे प्रत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मनोज परब यांना डिचोली पोलीस स्थानकात संध्याकाळपर्यंत ताब्यात घेण्यात आल्यानंतर डिचोली उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर हजर केले व सोडण्यात आले. यावेळी त्यांना जामिनावर सही करण्यासाठी पोलिसांनी सांगितले असता सदर ताब्यात घेण्याची कृती बेकायदेशीर असल्याने आपण सदर जामिनावर सही केली नाही, असेही परब यांनी सांगितले.
या सरकारला गोव्यातील जनतेचे काहीच पडले नसल्याचे या प्रकरणावरून त्यांनी दाखवून दिले आहे. कारण पोगो विधेयक विधानसभेत सादर करण्यासाठी गेले असता ते साधे इनवर्डही करून घेतले गेले नाही. ही कृती अयोग्य आणि बेकायदेशीर आहे. तसेच सदर विधेयक इनवर्ड करण्यासाठी गेलेल्या आरजीच्या दोन सदस्यांना पर्वरी पोलीस स्थानकात ताब्यात घेऊन ठेवणे ही कृतीही बेकायदाच आहे, अशी ट‍ीका मनोज परब यांनी यावेळी केली.
अकारण घेतले ताब्यात !
गोवा विधानसभेत आरजीने तयार केलेले आणि गोव्यातील सुमारे २५ हजार लोकांच्या स्वाक्षऱ्या असलेले ‘पोगो’ बील मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी जाणार असल्याचे समजताच आपल्याला पोलिसांनी बेकायदेशीरपणे आपल्या घरातून ताब्यात घेऊन डिचोली पोलीस स्थानकावर आणून ठेवले. आपण साखळीत निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांनी धसका घेतला असून या प्रकारामुळे आता आपण साखळीतच निवडणूक लढविण्यास सज्ज आहे, असा निर्धार आरजीचे मनोज परब यांनी डिचोली येथे व्यक्त केले.