सायलेंसर चोरीचे आंतरराज्य रॅकेट उघड

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th July 2021, 12:40 Hrs
सायलेंसर चोरीचे आंतरराज्य रॅकेट उघड

मडगाव : जून महिन्यात फातोर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडीचे सायलेंसर चोरीच्या दोन घटना घडल्या व त्याबाबत तक्रारी करण्यात आल्या. या अनुषंगाने फातोर्डा पोलिसांनी मुंबईतील कळवा पोलिसांकडून संशयित शमशुद्दीन शहा (२१), शमशुद्दीन खान (२२), सद्दाम खान (२६) या तिघांचा ताबा घेण्यात आलेला आहे. या तिघांचीही फातोर्डासह मडगाव व कुडतरीतील सायलेंसर चोरी प्रकरणीही चौकशी केली जाणार आहे.            

चंद्रावाडो - फातोर्डा येथील गुलजार बी सय्यद यांच्या मारुती इको कारचे सायलेंसर १७ जून रोजी तर आगळी - फातोर्डा येथील फ्लोरिआनो वाझ यांच्या इको कारचे सायलेंसर १४ जून रोजी चोरले गेले होते. या अनुषंगाने फातोर्डा पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशी सुरू असतानाच महाराष्ट्रातही अशाप्रकारे सायलेंसरची चोरी केली जात असल्याचे समजल्यावर फातोर्डा पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या सहकार्यातून नीलेश कासकर, सोमनाथ नायक व बबलू झोरे यांनी तपास सुरू केला व संशयितांना अटक करण्यात आली. यानंतर चौकशीवेळी संशयित आरोपींनी फातोर्डा या ठिकाणीही चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस उपनिरीक्षक सर्वेश भंडारी, नरेंद्र साळगावकर, नीलेश कासकर, संतोष जामुनी या पथकाने मुंबईत जाऊन कळवा पोलिसांकडून या संशयितांचा ताबा घेतला. मडगाव व कुडतरी परिसरातही सायलेंसर चोरीच्या घटना घडलेल्या असून या प्रकरणीही संशयितांची चौकशी केली जाणार आहे. 

फातोर्डा पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्याच्या १८ व २३ रोजी इको गाडीच्या सायलेंसर चोरीचे दोन गुन्हे नोंद केले होते. अशीच चोरी मडगाव व मायणा - कुडतरीतही झाली होती. इको गाडीच्या सायलेंसरमध्ये एक मटेरियल असते जे महाग असते. इको गाडीची उंची जास्त असल्याने खाली जाऊन सायलेंसर चोरणे शक्य होते. चौकशीवेळी हे चोर कुर्ला परिसरातील असल्याचे आढळून आले व मुंबईत कळवा पोलिसही या चोरांच्या मागावर असल्याचे समजले. कळवा पोलिसांनी या चोरट्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून २५ सायलेंसरही जप्त केले. त्यानंतर मंगळवारी पोलीस पाठवून तिघा संशयितांना ताब्यात घेतले. 

कुर्ला येथील संशयित शमशुद्दीन शहा, शमशुद्दीन खान, सद्दाम खान यांना फातोर्डा येथे आणण्यात आले आहे.