बाणावलीतील गँगरेप प्रकरण पणजी महिला पोलिसांकडे वर्ग

|
29th July 2021, 12:16 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

मडगाव : बाणावली येथील गँगरेप प्रकरण आता कोलवा पोलिसांकडून काढून घेत पणजी महिला पोलिसांकडे देण्यात आले आहे. याबाबतची सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पणजी महिला पोलिसांनी या प्रकरणातील चारही संशयितांचा ताबा घेण्यात आलेला आहे. या पुढील तपास हा पणजी महिला पोलीस करणार आहेत.                  

बाणावली किनाऱ्यावर रविवारी पहाटे चार संशयितांनी पोलीस असल्याचे भासवून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. यानंतर संशयितांनी पीडित मुलींच्या मोबाईलवर संदेश पाठवून ४० हजार रुपये न दिल्यास अत्याचार करताना काढलेले चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. यानंतर पीडित मुलींनी कोलवा पोलिसांत याबाबत तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर चौकशीअंती कोलवा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंद करत असिल हटेली, राजेश माने, गजानन चिंचणीकर, नितीन यब्बल या संशयितांना ताब्यात घेतले.

वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या दहाजणांपैकी सहाजण मध्यरात्री परतले व दोन मुलांसह दोन अल्पवयीन मुली किनाऱ्यावर असताना संशयितांनी याचा फायदा घेत पोलीस असल्याचे सांगून हा प्रकार केला. या गँगरेप प्रकरणी राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पोलिसांनी हे प्रकरण स्थानिक कोलवा पोलिसांकडून काढून घेत पणजी महिला पोलिसांकडे वर्ग करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. याबाबतची कागदोपत्री प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाल्यानंतर पणजी महिला पोलिसांनी सायंकाळी कोलवा येथे येऊन संशयितांचा ताबा घेतला. सायंकाळी उशिरा या प्रकरणातील चारही संशयितांना पणजी येथे नेण्यात आले. आता या गँगरेप प्रकरणी पणजी येथील उपविभागीय पोलीस अधीक्षक इडिल्झा डिसोझा या तपासकार्य सांभाळणार आहेत.