गजानन रायकरांच्या कवितेतील स्थानिक संदर्भ

-

Story: लोकमुद्रा/डॉ. विद्या प्रभुदेसाई |
25th July 2021, 12:35 am
गजानन रायकरांच्या कवितेतील स्थानिक संदर्भ

समाजभाषाविज्ञान या अलिकडेच उदयाला आलेल्या भाषाविज्ञानाच्या शाखेने भाषेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोण दिला. समाज घडणीत भाषेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असे समाजभाषाविज्ञान मानते. याच विचारानुसार गोमंतकीय मराठी साहित्यामधील भाषिक द्रव्य हे ख-या अर्थाने गोमंतकातील सामाजिक आणि सांस्कृतिक संचिताचे दस्ताऐवज आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटू नये. समाज, संस्कृती आणि भाषा यांचा अन्योन्य संबंध असल्यामुळेच अनुभवाच्या आविष्कारासाठी माध्यम म्हणून वापरलेली भाषा, एकाचवेळी सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भसुद्धा व्यक्त करते. त्यामुळेच साहित्यातील भाषेकडे केवळ माध्यम वा सौंदर्य निर्माण करणारा घटक म्हणून न पाहता, सामाजिक आणि सांस्कृतिक संचिताची ओळख करून देणारा घटक म्हणून पाहिले पाहिजे. भाषिक, धार्मिक तसेच एकूणच लोकजीवनातून निर्माण झालेल्या काही परंपरा वा रीतिरिवाज यांच्या मुळाशी असलेल्या प्रवृत्ती या सा-यांमधून समाजाची सांस्कृतिक घडण होत असते. या घडणीत जसा भौगोलिक वा भूमिनिष्ठतेचा भाग असतो तसाच तो इतिहास, राजकारण, समाजकारण, धर्मकारण आणि या सर्वांच्या मुळाशी असलेल्या अर्थकारणाचाही असतो. विशिष्ट श्रद्धा, आचार-विचार आणि त्यानुसार घडणा-या कृती-उक्ती या सा-यांचा संबंध त्या त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक जीवनाशी असतो. हे सांस्कृतिक जीवन त्या त्या प्रदेशातील भूमिनिष्ठतेतून निर्माण होत असल्याने अखंड भारतीय संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यात विचार करताना प्रत्येक प्रदेशाची भूमिनिष्ठता लक्षात घ्यावीच लागते. प्रामुख्याने ‘Literature is the mirror of society’ या उक्तीनुसार साहित्य आणि समाज यांचा असलेला अन्योन्य संबंध लक्षात घेवूनच प्रत्येक प्रदेशातील साहित्याचे आस्वादन, आकलन केल्यास ख-या अर्थाने साहित्यकृतीला न्याय मिळू शकतो. 

गोमंतकीय साहित्याचा विचार करताना गोमंतकात नांदलेली आदिम संस्कृती, त्यानंतर होऊन गेलेल्या सात राजवटी, त्या पार्श्वभूमीवर बदलत गेलेली गोमंतकीय संस्कृतीची बाह्य रुपे आणि त्याचबरोबर चिरंतन असलेला गोमंतकीय संस्कृतीचा आत्मा या गोष्टी निश्चितच दुर्लक्षिता येत नाहीत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अबाधित राहिलेल्या गोमंतकाच्या सांस्कृतिक मूल्यांचा शोध गोमंतकीय साहित्याच्या माध्यमातून घेता येतो. 

बोरकर, कारे, रामाणी यांच्या मागोमाग गोमंतकीय कवितेत स्वत:ची स्वतंत्र नाममुद्रा उमठविणारे कवी म्हणून गजानन रायकरांचे नाव घेता येते. गोमंतकात ‘स्वातंत्र्य शाहीर’ म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बहुतेक कवितांमधून गोमंतकाचे राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक दर्शन घडते. रायकरांचे एकूण आठ काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या काव्यसंग्रहांची नावेच त्यांच्या कवितेतील गोमंतकीयतेचा साक्षात्कार घडवितात. गोमंतकाच्या भूमीवर असलेले आत्यंतिक प्रेम आणि गोमंतकाच्या संस्कृतीची असलेली अदम्य ओढ हे त्यांच्या कवितेचे खास वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. राष्ट्रनिष्ठा आणि सांस्कृतिक प्रेम ही मूल्ये त्यांच्या बहुतांश कवितांमध्ये डोकावतात. गोमंतकातील निसर्ग, गोमंतकीय लढवय्यांचे शौर्य, मुक्तिपूर्वकालिन गोमंतकीयांची असलेली स्वातंत्र्याची आस हे विषय घेऊन त्यांच्या बहुतेक कविता येतात. गोवा स्वतंत्र झाल्याच्या आनंदात कधी मांडवी नाचल्याचा तर कधी सह्यगिरी अभिमानाने ताठ झाल्याचा अनुभव त्यांच्या कवितांत येतो. देवांनाही स्वर्ग विसरायला लावणारे निसर्ग सौंदर्य असलेल्या गोमंतकातील दूधासागराला येणारे हर्षाचे उधाण, सांस्कृतिक वैभव असलेल्या मंदिरांमधून किणकिणणा-या घंटा आणि हिरव्यागार शेतावरुन झुळझुळणा-या वायुच्या लाटा अशी सारी वर्णने त्यांच्या कवितांत येतात. गोमंतकातील सत्तरी हा प्रदेश आजही प्रादेशिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा आहे. रायकरांच्या ‘धन्यभूमी गोमंतक’ या कवितेत तर गोवा स्वतंत्र झाल्याचे समजताच ही सत्तरी झुलते आणि कुळागरे (सुपारीच्या बागा) आनंदाने डोलतात असाही उल्लेख आला आहे. 

रायकरांची कविता ही अस्सल गोमंतकाची कविता आहे. गोमंतकाचा भौगोलिक प्रदेश, गोमंतकाचे प्राकृतिक सौंदर्य, गोमंतकातील लोकजीवन, गोमंतकातील श्रद्धा, गोमंतकीयांची मानसिकता अशा सर्व संवेदनांना त्यांची कविता अभिव्यक्त करते. गोमंतकाच्या लोकजीवनात महापुरुषाचे स्थान महत्त्वपूर्ण असेच आहे. लोकभाषेत याचा उल्लेख ‘म्हापुर्सा’ असा केला जातो. गावागावाच्या सीमेवर गावाची राखण करणारा राखणदार म्हणून तो उभा असतो. शत्रूला सीमेच्या आंत येण्यास तो मज्जाव करतो. पारतंत्र्याच्या काळात हा महापुरुषच आडवा झाला होता म्हणून तो शक्तिहीन झाला होता अशी कल्पना करुन गोवा स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी ‘महापुरुष’ ही कविता लिहिली आहे. ही कविता रुपकात्मक असून या कवितेतून रायकर या महापुरुषाची बुद्धिमत्ता, त्याच्या हृदयातील धाडस, शौर्य, बोटांतील शिल्पचित्रे, त्याच्या पावलाचे नर्तन, गळ्यातील स्वर यांचे वर्णन करीत स्थानिक समाजव्यवस्थाच उभी करतात. या ‘महापुरुषाच्या पोट-या आणि  पिंढ-या कुळवाड्याच्या माळवाड्याच्या’ असे म्हणताना संपूर्ण देहाचा भार उचलणा-या पोट-या आणि गोमंतकातील कष्टकरी कुळवाडी यांची तुलना सार्थ अभिमानाने ते करतात. याच महापुरुषाला उद्देशून ते म्हणतात,

‘तूच ताळ तुझ्या हाताने, तू उठवलेली पूर्वे | 

तूंच बांध तू सोडलेले, दावणीचे म्हारु!

तूच बसवं वा-याची सोडलेली सूत्रे! तूच बसव तू उठवलेली ही भूतावळ

मुंजे, समंध, खवीस, सैतान, हळवत, म्हारगत, देवगत!’

अशा शब्दांमधून त्यांनी केलेला लोकदैवतांचा उल्लेख समजण्यास गोमंतकाची लोकसंस्कृतीच समजून घ्यावी लागेल. कोंकणसह गोमंतकातील बहुधा प्रत्येक देवस्थानाच्या आसपास असलेली विशिष्ट जागा ‘पूर्वा’ची जागा म्हणून ओळखली जाते. या जागी पिशाच्च योनीतील त्रास देणा-या अतृप्त आत्म्यांना स्थिर बसविले जाते अशी श्रद्धा आहे. असा एक समज आहे की कोणावर ‘करणी’(ही संकल्पनाही कोंकणपट्टीत शत्रूविषयी वाईट इच्छा करणे वा तत्सम अशा एका विशिष्ट अर्थाने वापरली जाते) करताना अशा भुतावळींना या म्हणजे पूर्वाच्या जागेवरुन उठविले जाते म्हणजे अस्थिर केले जाते.....यातून निभावण्यासाठीही पुन्हा देवाकडे गा-हाणी घालून यांना आपल्या जागी स्थिर केले जाते असा समज कोंकणसह गोमंतकातील लोकजीवनात आहे. साहित्यातील हे संदर्भ समजले नाहीत तर साहित्याचे योग्य आकलन खचितच होणार नाही. रायकरांच्या कवितेचे ख-या अर्थाने आकलन होण्यासाठी गोमंतकाच्या संस्कृतीतील हे गावगाड्याचे सर्व संदर्भ तपासून घ्यावेच लागतील. गजानन रायकरांच्या कवितेतील हे संदर्भ पुढच्या काही भागांमध्ये क्रमशः समजून घेता येतील.