कलागुणांनी समरसलेली अनिष्का

'आनंद हा उद्या कधीच नसतो, तो आता आहे. पूर्वी जे काही घडले ते विसरुन सद्यस्थितीत जगा. आपल्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा. जे आपले ध्येय साध्य करण्यास आंतरिक सामर्थ्य देईल.'

Story: मार्ग नवा, ध्यास नवा/ सुश्मिता मोपकर |
25th July 2021, 12:30 am
कलागुणांनी समरसलेली अनिष्का

अभिनय, स्वयंपाक करणे, बुद्धिबळ खेळणे असे एकमेकांहून आगळे-वेगळे छंद बाळगणारी अनिष्का उल्हास राऊत ही आपल्या वयाच्या साथीदारांना प्रेरणा देते. हे छंद ती अतिशय मनापासून जोपासते. नृत्य ही तिची आवड. अभिनय असो, नृत्य असो वा बुद्धिबळाचा खेळ असो, प्रत्येक गोष्ट ती आवडीने करते आणि ह्या आवडीच्या गोष्टी करताना त्या त्या क्षेत्राचा मनसोक्त आनंद घेताना आपल्याला दिसते.

पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण तिने सारस्वत विद्यालयातून घेतले. या विद्यालयाने तिच्यावर संस्कार केले. शैक्षणिक क्षेत्रात खूप परिश्रम घेतले त्याचे सार दहावीच्या आणि बारावीच्या निकालावरून कळून येते. शाळेत असताना तिने एन.सी.सी निवडले होते. राष्ट्रीय दिनांची परेड पाहून ती प्रेरित झाली होती. एन. सी. सी कॅडेट झाल्याने तिला परिश्रम आणि समर्पित भावनेचा अधिक जवळून अनुभव घेता आला. याबरोबर इतर क्षेत्रातही खूप यश मिळविले. कथाकथन तसेच मराठी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळविली. शाळेच्या बुद्धिबळ संघात ती सहभागी झाली आणि बुद्धीबळात तिने राज्य पातळीवर शाळेचे प्रतिनिधित्व केले. याव्यतिरिक्त इयत्ता तिसरीपासून तिने वनिता ताईंकडून संवादिनी (हार्मोनियम) वाजविण्याचे धडे घेतले.  अशाप्रकारे खूपच लहान वयात संवादिनी, बुद्धिबळा आणि याबरोबर शिक्षण क्षेत्रातही यशस्वी वाटचाल अनिष्काची सुरु आहे. 

नृत्य हे तिचे आवडीचे क्षेत्र. अवघ्या सहा वर्षांची असताना तिने या क्षेत्रात पदार्पण केले. भरतनाट्यम् हा नृत्यप्रकार निवडला. सुरुवातीला फक्त गटांमधून सादरीकरण करायची पण मोठी होता होता तिचा एकटीने नृत्य सादर करण्याचा आत्मविश्वास वाढला व ती स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. प्रसंगी तिने स्वतः दुसऱ्यांना नृत्य शिकविण्यास सुरुवात केली. हळूहळू स्वतःचे व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करुन इतरांना प्रेरणा दिली. यावरून स्वतःला पारखण्यातून आणखी सराव केला तर अधिक सराईतपणे नृत्य करु शकेन ही गोष्ट तिने पारखली . या दरम्यान काही नकारात्मक गोष्टींचा सामनाही केला पण त्यात खचून न जाता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण वाटचालीत तिला तिचे गुरु कमलेश बोरकर यांचे आशीर्वाद अन् मार्गदर्शन लाभले. या वाटेवर तिला खरा आनंद तेव्हा मिळाला जेव्हा तिच्याच शाळेत नृत्य स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून बोलाविले गेले. किती अभिमानास्पद गोष्ट ही तिच्यासाठी, तिच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठीही.‌ 

शालेय जीवनात गुरु आपल्याला अनेक परीने प्रेरणा देत असतात. प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शिक्षणाच्या प्रवासात शिक्षिका स्मिता तसेच शिक्षिका अल्का  यांनी तिला तिच्या सामर्थ्याची ओळख पटविली व  पाठबळही दिले. पुढील वाटचालीत तिचे वर्गशिक्षक मर्विन यांच्याकडून शिक्षणाबरोबरच उत्कृष्ट नेतृत्वाचे गुण आत्मसात केले. तसेच शिक्षिका किर्ती, निलेश सर, मुकुंद सर यांनीही तिला योग्य मार्गावर चालण्यास खूप सहाय्य केले. उत्तम गुरु डोळ्यासमोर ठेऊन, त्यांचा हात धरुन तिने ही वाट गाठली. बारावीनंतर सेंट झेवियर्स महाविद्यालयात प्रवेश मिळविला. तिला सी. ए. व्हायचे आहे. पाओलो कोएलोने उद्धृत केल्याप्रमाणे, "जीवनाचे रहस्य म्हणजे सात वेळा पडणे आणि आठ वेळा उठणे" या मताची ही तरुणी. आपण जरी अयशस्वी झालो तरी नव्याने परिश्रम करेन पण हार मानणार नाही. अशाप्रकारे सकारात्मकतेने वावरणारी ही तरुणी सद्या द्वितीय वर्ष बी. कॉमला आहे. महाविद्यालयात तिला पूर्वी कधीही न केलेला पाश्र्चात्य नृत्यप्रकार करण्याची संधी मिळाली. मराठी नाटकांमध्ये तिने भूमिका साकारली. नाट्य क्षेत्रात मार्गदर्शन करणारे तिचे गुरु उमाकांत कोरगावकर यांनी तिला अभिनयात परिपूर्ण करण्यास परिश्रम घेतले. 

'आर्ट ऑफ लिव्हिंग' हा तिच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. गेली दहा वर्षे ती या क्षेत्राशी जोडली गेली आहे. ध्यान, योगा, प्राणायम हे आपल्याला एका शांततेच्या जगात घेऊन जातात. ज्यामुळे तिच्यातील आत्मविश्वास अधिक बळकट झाला. या संस्थेच्या दिक्षेनुसार तिला सेवा करायची आहे. योग आणि ध्यान एका उंच शिखरावर घेऊन जायचे आहे. त्यासाठी तिला योग प्रशिक्षक व्हायचे आहे जेणेकरून तिच्या हातून सेवा घडेल. त्याचप्रमाणे  आपल्या जीवनाचे एक रहस्य उलगडताना ती म्हणते, "जेव्हा मी ध्यान करते तेव्हा वेगवेगळ्या कल्पना माझ्या मनात जन्म घेतात तसेच मी माझ्या ध्येयाबद्दल विचार करु लागते." 

जानेवारी २०२१ मध्ये फ्लॅश मॉबचा ती भाग झाली असता म्हापसा रॉटरॅक्ट क्लबच्या कुटुंबाशी संबंध जुळला. क्लबने केलेल्या प्रकल्पांमध्ये ती उपस्थित होती. क्लबचे सद्याचे अध्यक्ष अमेय वरेरकर यांनी तिला या क्लबची सदस्य होण्याची संधी दिली ज्यामुळे ती विचारविनिमय करुन, शक्य त्या पद्धतीचा अवलंब करुन समाजसेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशाप्रकारे अनेक क्षेत्रात आपले ठसे अनिष्काने उमटविले. लहान असूनही एवढ्या गोष्टी करणे सहज शक्य नाही. त्यासाठी कुटुंबाच्या भक्कम आधाराची गरज लागते. आयुष्याच्या या प्रत्येक पायरीवर तिला तिची आई उन्नती, बाबा उल्हास आणि भाऊ अनिकेत यांची साथ आणि उत्तेजनही मिळाले. 

आयुष्याच्या वाटेवर प्रवास करताना अनेक प्रकारच्या संधी मिळतात. त्यांच्याकडे ती सकारात्मक नजरेने पाहते. ती खूप उच्च विचार करते, पण अयशस्वी ठरल्यास भिती बाळगणाऱ्यांपैकी ती नक्कीच नाही. जे कार्य करायचे आहे त्यासाठी परिश्रम करण्याची तिची तयारी आहे. श्री. श्री. रवी शंकर यांच्या विचारांचे समर्थन करताना ती म्हणते, 'आनंद हा उद्या कधीच नसतो, तो आता आहे. पूर्वी जे काही घडले ते विसरुन सद्यस्थितीत जगा. आपल्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा. जे आपले ध्येय साध्य करण्यास आंतरिक सामर्थ्य देईल.' असा तरुण पिढीला महत्त्वपूर्ण संदेश देते. एक गुलाब आपला सुगंध कधीच गमवत नाही, तो नेहमीच असतो पण कोणालाही ते जाणवत नाही. ते त्यास नाकारतात कारण त्यांचे जणू नाकच बंद झाले असावे. म्हणूनच आपला स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असणे खूप गरजेचे आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक विचार करा आणि आनंदित रहा.