पर्येत विचित्र परिस्थिती निर्माण होण्याची संभावना

प्रतिनिधी

Story: तालुक्याचे राजकारण । वाळपई |
25th July 2021, 12:16 am
पर्येत विचित्र परिस्थिती  निर्माण होण्याची संभावना

सत्तरी तालुक्यातील यंदाची विधानसभा निवडणूक वेगळ्या पद्धतीने जाण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. कारण एकेकाळी काँग्रेस पक्षाचा पूर्ण वरचष्मा असलेल्या सत्तरी तालुक्यात  दोन मतदारसंघांपैकी वाळपई मतदार संघावर भाजपाचे उमेदवार तथा आरोग्यमंत्री विश्वाजीत राणे यांनी आपली छाप पाडलेली आहे. तर पर्ये मतदारसंघामध्ये त्यांचे वडील प्रतापसिंह राणे यांनी काँग्रेस पक्षाच्यावतीने आपली पकड आजही कायम ठेवलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तरी तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाचा वरचष्मा दिसण्याऐवजी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये दोन पक्षाचे आमदार प्रतिनिधित्व करण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही.

वाळपईत भाजप आमदार

२०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघांमधून विश्वतजित राणे यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर बाजी मारली होती. मात्र त्यानंतर लागलीच त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला .यामुळे आता वाळपई मतदारसंघावर त्यांची मजबूत पकड आहे. या मतदारसंघात येणाऱ्या सर्व पंचायती व वाळपई नगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. यामुळे वाळपई मतदारसंघावर सध्यातरी विश्वजीत राणे यांच्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध राहिलेला नाही. काँग्रेस पक्षातर्फे काही प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असले तरी त्यांची डाळ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिजणार का? याबाबत साशंकता आहे. सध्यातरी विश्वाजित राणे यांनी भाजपातर्फे वेगवेगळ्या पंचायत स्तरावर बैठकांचे आयोजन केलेले आहे. यामुळे मतदारसंघातील मतदारांशी त्यांनी संपर्क वाढवण्यावर गेल्या पंधरा दिवसांपासून भर दिला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते भाजपातर्फे या मतदारसंघातून रिंगणात उतरणार अशी दाट शक्यता आहे.

पर्येत विचित्र परिस्थिती

सत्तरी तालुक्याच्या दुसऱ्या मतदारसंघामध्ये पर्येत मात्र विचित्र अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण या मतदारसंघामधून गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेस पक्षातर्फे निवडून येणारे व सध्याचे विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे यांनी यदाकदाचित विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यास या मतदारसंघामध्ये मात्र काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे. कारण प्रतापसिंह राणे यांनी आपल्या स्वभावामुळे मतदारांशी चांगल्या प्रकारचा संपर्क ठेवलेला आहे .त्याचप्रमाणे गेल्या पन्नास वर्षांमध्ये वेगवेगळ्या विकासाच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी आपली नाळ जुळवून घेतलेली आहे .यामुळे यदाकदाचित ८२ वर्षांच्या प्रतापसिंह राणे यांनी पुन्हा एकदा रिंगणात उतरण्याचा प्रयत्न केल्यास भाजपाला अडचणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण त्यांचे चिरंजीव विश्वजीत राणे यांची सुद्धा या मतदारसंघावर चांगली पकड आहे. सध्या विश्वजीत राणे भाजपात  असल्यामुळे व आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने वेगवेगळ्या प्रकारची विकासकामे मार्गास लावण्यासाठी त्यांचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. यामुळे येणाऱ्या काळात मतदारसंघाच्या विविध विकास कामांसाठी आरोग्यमंत्र्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याने या मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराला मतदार पसंती देतील का अशा प्रकारचा सवाल आता निर्माण झालेला आहे. तसे झाल्यास भाजपाचा उमेदवार कोण याबाबतही गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे .कारण दोन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपातर्फे निवडणूक लढविणारे सालेली येथील विश्वजीत कृ. राणे हे सध्यातरी मतदारांच्या संपर्कापासून बरेच दूर राहिलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपातर्फे त्यांचा विचार होणार का याबाबत सवाल निर्माण झालेला आहे.

यदाकदाचित भाजपतर्फे विश्वजीत कृ. राणे यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास त्यांना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे पाठबळ लाभणार का याबाबत भाजप नेतृत्वासमोर मोठी कसोटी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. कारण दोनवेळा भाजपतर्फे निवडणूक लढविणारे व प्रतापसिंह राणे यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले विश्वजीत कृ. राणे हे सध्यातरी विश्वजीत प्रतापसिंग राणे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. यामुळे भाजपतर्फे विश्वजीत कृ. राणे यांना उमेदवारी दिल्यास विश्वजीत राणे यांचा पाठिंबा त्यांना सध्याच्या घडीला तरी लाभण्याची शक्यता धुसर वाटत आहे. यामुळे या मतदारसंघामध्ये भाजपाचा उमेदवार हा पूर्णपणे विश्वजीत प्रतापसिंह राणे यांच्याच पाठिंब्यावर निवडून येऊ शकतो . भाजपा संघटनेतर्फे विश्वजीत प्रतापसिंह राणे यांना विश्वासात घेऊनच या मतदारसंघातील भाजपचा उमेदवार पक्ष संघटनेला निवडावा लागणार आहे.

काँग्रेस, भाजपा हे प्रमुख दोन राजकीय पक्ष वगळता सध्यातरी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, आम आदमी पक्ष ,गोवा फॉरवर्ड ,आरजी संघटना यांच्या उमेदवारांना सध्यातरी या ठिकाणी स्थान मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. कारण मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातर्फे सुहास नाईक यांनी उमेदवारी दाखल केली होती .मात्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ते मतदारांशी संपर्क ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. यामुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला या मतदारसंघांमध्ये आपला उमेदवार द्यायचा असेल तर मगोला सुहास नाईक यांच्या व्यतिरिक्त इतर उमेदवाराची निवड करावी लागणार आहे .अन्यथा मतदारांच्या प्रश्नांच्या भडिमाराला पक्ष संघटनेला सामोरे जावे लागणार.