चमकत्या कुंद कळ्यांना पाहून असे वाटते की आकाशातल्या चांदण्या थंडीला घाबरून कुंदवेलीवर शरण घेऊन विसावल्या आहेत.
हिरव्या वेलीवरी उमलल्या
कुंदकळ्या हासऱ्या
पवित्र आणि दिव्यत्वांच्या
जणू लक्ष ज्योती पेटल्या…”
कुंदा किंवा कुंद हिवाळ्यात फुलणाऱ्या मोगऱ्याच्या जातकुळीतली एकवेल. पांढरी शुभ्र म्हणावी अशी मंद सुवास असणारी कुंदा. याचा उल्लेख करतानाही असुवासिक किंवा गन्ध नसणारी असते असा केला जातो. पण मी पाहिलेल्या कुंद फुलांना मंद वास असतोच. या फुलांचं शास्त्रीय नाव jasmine ummulti florum असे आहे. Multi florum म्हणजे खूप फुलणारी. मोगरीप्रमाणे कुंदा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या फुलामध्ये चार ते पाच जाती आहेत. काही बाराही महिने फुलतात, काही हिवाळ्यात फुलतात. बुटक्या आणि जाईसारख्या गुलाबी छटा असणाऱ्या अशा वैविध्यपूर्ण जाती भारतभर दिसतात. याचे औषधी उपयोग बरेच आहेत. त्यात जखमेवर वापरण्यासाठी, सर्दीसाठी, लिव्हरच्या रोगासाठी या झाडाचा उपयोग होतो
एते समुल्लसद्भासो रोजन्ते कुन्दकोरकाः।
शीतभीता लताकुन्दमाश्रिता इव तारकाः॥
या चमकत्या कुंद कळ्यांना पाहून असे वाटते की आकाशातल्या चांदण्या थंडीला घाबरून कुंदवेलीवर शरण घेऊन विसावल्या आहेत.
‘संस्कृत सुभाषित रत्नभांडार’ या ग्रंथात शिशिरवृत्तातवरील श्लोक सापडतो, तसेच कवी कालिदास आणि त्याकाळच्या संस्कृत सुभाषित ग्रंथात बरेच श्लोक कुंद कळ्यांवर आढळतात. कुंदकळ्या म्हणजे शुभ्रता अशी उपमा प्राचीन काळापासून दिली जाते म्हणजे पाश्चात्य देशात जशी as white as snow अशी उपमा देतात तशीच कुंदासारख्या रंगाची अशी उपमा देतात. एखाद्या स्त्रीच्या शुभ्र दन्त पंक्तीना विशेषण म्हणून कुंदकळ्या या शब्दाचा वापर होतो. कालिदासांनी ‘ऋतुसंहार’ या आपल्या ग्रंथात कुंद फुलांवर लिहिले आहे.
कुन्दैः सविभ्रमवधूहसितावदातैरुद्योतितान्युपवनानि मनोहराणि।
चित्तं मुनेरपि हरन्तिनिवृत्त रागं प्रागेव रागमलिनानि मनांसि यूनाम्॥
जमिनीवर पडलेली शुभ्र कुंदाफुले खेळण्यात गुंग असलेल्या स्त्रियांच्या हास्याप्रमाणे भासतात, ज्यांनापाहून, संन्यास घेऊन सगळ्या ऐहिक गोष्टींचा त्याग करणाऱ्यालासुद्धा भूल पडते, सामान्य माणसाची काय कथा?शिशिरऋतूत फुलणारी ही फुलं वसंताच्या आगमनावेळी उमलू लागतात, ऋतू बदलाचा हा एक महत्त्वाचा संकेत होय. कमळ फुलांच्याविरहात वेडा झालेला भुंगा कुंद फुलांशी येऊन रहातो आणि कुंदफुलांच्या जाण्याच्या ऋतूंमुळे दुःखी होतो असा काहीसा उल्लेख रामायणात येतो, ही अशी भरभरून फुलतात, झाडावरून काढल्यावर कोमेजतात म्हणून की काय मोगरी, जाई, शेवंती, अबोली यांना जेवढा भाव आहे तेवढा मिळत नाही यांना. काही भागातच यांचे गजरे मिळतात बाजारात (गावठी), बाहेरून येणाऱ्या कुंदाचे गजरे सतत उपलब्ध असल्यामुळेही ही फुलं बाजारात दिसत नाहीत कदाचित. गोव्याची सीमा ओलांडली आणि कर्नाटकात गेलं की मात्र कुंदा आणि अबोली यांचे गजरे असतात सगळीकडे, बाराही महिने देवळासमोर हे मिळणारच. बाकी फुलं मौसमी असतात पण अबोली आणि पांढऱ्या कुंदाचे गजरे अखिल दक्षिण भारताच्या स्त्रियांचा किंवा देवळांचा अविभाज्य दागिना.
तर अशीही गर्लनेक्स्टडोरसारखी असणारी कुंदफुलं पूर्व भारतात विशेषतः मणिपूर भागात फार पवित्र मानली जातात. पुराणामध्ये देवांना उपमा देण्यासाठी कुंद फुलांचा उल्लेख आढळतो, विष्णू सहसातर नामात ८७ वा श्लोक आहे त्याचा अर्थ आहे, की ज्याच अंग दागविरहीत आहे, जो भक्तांचे रक्षण करतो असा विष्णू. वगैरे वगैरे असे बरेच अर्थ महान लोकांनी काढलेले आहेत.
याच कारणामुळे मणिपूर या राज्यात मेंताई जमातीत कुंद फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या लग्नात कुंदो परंग नावाचा एक विशेष भाग असतो. यामध्ये लग्नाच्या दिवशी वधू शुचिर्भूत होऊन लुकमें नावाच्या बांबूच्या भांड्यात ताजी कुंदाची फुल तोडते. याविधीसाठी ती नवीन पारंपरिक वस्त्र नेसते. नवीन दोरा आणि सुई घेऊन अविवाहित बहिणीच्या सहाय्याने कुंदाच्या माळा तयार करते. या माळा करायची पद्धत सुद्धा विशिष्ट असते. पहिलं फुल देठापासून ओवायच, दुसरं पाकळ्यांच्या बाजूने, जेणेकरून फुले एकामेकांना तोंड करून ओवली जातील अशी माळ घातल्याने पती आणि पत्नीचा आत्मा एकरूप होण्यास मदत होते अशी समजूत आहे. पवित्र नात्याचं प्रतीक म्हणून या कुंदोपरेंगलेंगबा विधीला महत्त्व आहे. विष्णू हा त्रिदेवांपैकी रक्षणकर्ता, पालक म्हणून ओळखला जातो. ही विष्णूची आवडती फुले असल्यामुळे विष्णू देव या फुलांमधून जोडप्याला आशीर्वाद देतील आणि दोघेही सकारत्मक सृजनाच्या वाटेवर चालतील, जीवन राखून ठेवण्याच्या वाटेवर चालतील. शिवाय कुंदो ही प्रेमाचं प्रतीक असल्यामुळेही परिधान केल्यावर पतीपत्नीमध्ये अतूट बंधन तयार होते. ते सुंदर तरीही गंधहीन असल्याने पतीपत्नीचा आपापला व्यर्थ अभिमान, अहंकार, स्वाभिमान गळून पडतो आणि कुंद फुलात असलेली निस्वार्थता, पवित्रता, विकास, ज्ञान हे सगळं पती आणि पत्नींना जवळ आणतं आणि त्यांच्यात जन्माचं निस्वार्थी नात तयार करतं. किती गोड आहे ना हे सगळं, भारतीय परंपरामध्ये अशा प्रतीकात्मक गोष्टी पहायला मिळतात सगळ्याच समाजामध्ये.कुंदसारख्या फार सामान्य फुलांना मिळालेलं हे अनन्यसाधारण महत्त्व खरंच किती छान आहे. गोव्यात लग्नात बकुळीच्या माळा घालायची पद्धत आहे तिच्या मागची भावना हीच असावी. परिकथेत असणाऱ्या सगळ्या स्वर्गीय गोष्टी तो स्वर्गीय अनुभव, माझ्या बालमनीचं गुज हे सगळं जगून घेते, काही गोष्टी संपल्यातर आपल्या हातात एवढंच तर उरत,
त्या प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या कुंदोपरेंगसारखी मीही त्या माळा करून केसात माळते आणि पवित्र होते, पाटातल्या झुळूझुळू वाहणाऱ्या पाण्यासारखी ...