पि. एम. एस.- Pre Menstrual Syndrome

मासिक पाळीचे चक्र हे प्रत्येक महिन्यातल्या संप्रेरकांचा खेळ असतो. पाळीपूर्वी जाणवणारे काही महिलांमधले बदल जेव्हा दैनंदिन जीवनात लुडबुड करतात तेव्हा....

Story: आरोग्य । सिमा खंडाळे |
23rd July 2021, 10:55 pm
पि. एम. एस.- Pre Menstrual Syndrome

शरीरात जी अनेक चक्रे चालू असतात त्यातले एक म्हणजे हे मासिक पाळीचे चक्र. पाळी येते महिन्यातून एकदा, परंतु त्यामागे एका महिन्याचा संप्रेरकांचा अद्भुत थक्क करणारा खेळ चालू असतो.  महिन्याच्या उत्तरार्धात जे काही बदल होतात त्यामुळे अनेकींना (जवळजवळ ७५%) आपल्या शरीरात बदल जाणवतात आणि आपल्याला साधारण कधी  पाळी येवू  शकते याची जाणीव होते. साधारणपणे स्त्रिया  महिना येण्यापूर्वी काहीतरी शारीरिक -मानसिक बदलांची अपेक्षा करतातच . परंतु जेव्हा पाळी येण्यापूर्वीचे हे बदल दैनंदिन जीवनात ढवळाढवळ निर्माण करतात, अडथळे  आणतात तेव्हा त्याला pre menstrual syndrome (PMS )असे म्हणतात  जे २० ते ३० टक्के बायकांत होवू शकते .

पि. एम.एस. मध्ये पाळीच्यापूर्वी एक आठवडा खालील त्रास  जाणवायला लागतात :

१. ओटी पोटात दुखणे,पोट गच्च झाल्यासारखे वाटणे.

२. डोके दुखणे.

३. स्तन गच्च झाल्यासारखे वाटणे . सुया टोचल्याप्रमाणे  वेदना होणे.

४. हात पाय सुजणे.

५. राग येणे,लगेच रडायला येणे.

६. उदास  वाटणे.

७. कुणाशी बोलणे, कुणात मिसळणे नकोसे वाटणे.

८. थकवा येणे .

हे असे त्रास सुरू झाले, की कामात लक्ष लागत नाही. रजा घ्यावी असे वाटते. मुलांवर आरडा-ओरडा सुरू होतो. नवऱ्याबरोबर उगाचच भांडणे सुरू होतात. (माझ्या एका पेशंटचा नवरा व मुलेच तिला सांगतात. "या दिवसात तुझा रागाचा पारा लगेच वाढतोय. तुझी पाळी जवळ आली असणार") काहींच्या डोक्यात आत्महत्येचे विचार येवू लागतात. ह्या होणाऱ्या त्रासासाठी गोळ्या, औषधे घ्याव्यात असे वाटू लागते. महिना आल्यावर हे सगळे कमी होते आणि छान वाटते. पुन्हा पाळीच्या पूर्वी चार-पाच दिवस हे त्रास होऊ लागतात.

हे असे नक्की का होते हे पूर्णपणे कळलेले नाही. Estrogen Progesterone,    Prostaglandin, Renin Angiotensin Aldosterone सारख्या संप्रेरकांमध्ये जो बदल होतो, त्याला मिळणारा शरीराचा प्रतिसाद  अबनॉर्मल  असतो. त्यामुळे  हे असे अतिरंजित त्रास होतात जे प्रत्येकाला होत नाही. पेशंट ने व्यवस्थित दोन-तीन महिने  डायरी लिहून ठेवली तर निदान करणे सोपे जाते. याची नक्की ट्रिटमेंट ठरलेली नाही. ओरल contraceptive पिल, व्हिटॅमिन, शरीरातील पाणी कमी करण्यासाठी diuretic वगैरे पेशंटच्या गरजेनुसार वापरले जाऊ शकते.

मूड बदलणे, डिप्रेशन अशा गोष्टींसाठी  Fluoxetine सारख्या गोळीचा खूप छान उपयोग होतो. परंतु ती गोळी मानसिक आजारासाठी सुद्धा  वापरली जाते म्हणून पेशंट किंवा तिचे नातेवाईक ही ट्रीटमेंट नाकारतात. एक गोळी अनेक कारणांसाठी वापरली जाऊ शकते ही गोष्ट लक्षात घेत नाही .

पि. एम. एस. मुळे त्या दिवसात डिप्रेस्ड होवून घरी रडत बसणारी, कॉलेजमध्ये जायला घाबरणारी एक मुलगी तीन महिन्यात या गोळ्यांनी सुधारून पुन्हा व्यवस्थित कॉलेजमध्ये जाऊ लागली . तेव्हा डॉक्टरच्या सल्ल्यानुसार  या गोळ्या घ्यायला  काहीच हरकत नाही.

व्यायाम, ध्यान, विश्रांती  यांचा खूप मोठा फायदा इथेही होतोच. परंतु अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे पि. एम. एस. ला अतिशय चांगला Placebo response मिळतो (म्हणजे खरेखुरे औषध न देता साधेच काहीतरी दिले, तरीही ट्रिटमेंट चालू आहे असे वाटून मिळणारा पेशंटच्या शरीराचा प्रतिसाद) आपले शरीर, त्याची जडणघडण, त्याचे कार्य  म्हणजे एक चमत्कारच! आणि ते सगळे समजून घेणारा आपला मेंदू तर चमत्काराचा परमोच्च बिंदू . या मेंदूचा एक भाग म्हणजे आपले मन..! त्याचा आपल्या शरीरावर त्याच्या कार्यावर, व्याधीवर  होणारा परिणाम तर थक्क करणारा आहे. आपल्या तक्रारी कोणीतरी ऐकून घेतय, त्यावर उपाय चालू आहेत या जाणिवेनेच पेशंट अर्धा बरा होतो. Placebo response असे न म्हणता 'Response to care' असे म्हटले तर जास्त योग्य ठरेल.  पेशंटला डॉक्टरबद्दल वाटणारा विश्वास, घरच्यांनी हिडीस फिडीस न करता समजून घेवून दिलेली माया  (tender loving care) यामुळे पेशंटचा आत्मविश्वास दुणावतो.  उत्तम संतुलित आहार (रोजच), व्यायाम आणि थोडे औषधोपचार यांच्या मदतीने यातून पेशंट बाहेर येवू शकतो.

"तू आणि तुझे हॉर्मोन्स" म्हणून वैतागून तिला वाळीत न टाकता जवळ घेतले, तर आणखी हवे तरी काय ?