पॅगेससमुळ फोनच प्लास्टर केला

ममता बॅनर्जी : हेरगिरी प्रकरणावरून केंद्र सरकारवर खोचक टीका


22nd July 2021, 02:12 am
पॅगेससमुळ फोनच प्लास्टर केला

पॅगेससमुळ फोनच प्लास्टर केला
ममता बॅनर्जी : हेरगिरी प्रकरणावरून केंद्र सरकारवर खोचक टीका
नवी दिल्ली :
पॅगेससमुळे आपण आपला फोनच प्लास्टर करून टाकला आहे, अशी मल्लीनाथी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. हुतात्मा दिनाच्या निमित्ताने ७ राज्यांमधील तृणमूलच्या कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधताना त्या हे म्हणाल्या.
‘पॅगेसस’ हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे फोन ‘हॅक’प्रकरणी मंगळवारी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरला. विरोधी पक्षांच्या नेत्यांसह पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांना ‘पॅगेसस’द्वारे लक्ष्य करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे दोन्ही सदनांचे कामकाज अनेकदा तहकूब करण्यात आले.
हेरगिरी तंत्रज्ञानाच्या आधारे देशातील राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शास्त्रज्ञ अशा ३०० व्यक्तींचे फोन ‘हॅक’ करण्यात आल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर त्याचे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तीव्र पडसाद उमटले.
वृत्तवाहिनीच्या पोर्टलवरील अ‍ॅम्नेस्टीने दिलेल्या अहवालाप्रमाणे एकूण ३७ फोनमध्ये पॅगेसस असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यापैकी १० फोन भारतीय असल्याचे म्हटले आहे. तसेच या फोनची प्रत्यक्ष चिकित्सा केल्याशिवाय पॅगेससचा हल्ला झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नसल्याचे म्हटले आहे. केवळ नंबर असल्यामुळे संबंधित फोन हेरगिरीसाठी वापरण्यात आला, असे सिद्ध होत नसल्याचेही या अहवालातील बाराव्या परिच्छेदाच्या पहिल्या ओळीत म्हटले आहे.
२०१९साली जेव्हा हे प्रकरण प्रसिद्ध झाले होते तेव्हा तत्कालीन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आणि विद्यमान मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही पॅगेसस भारत सरकारने खरेदी केले की, नाही याचे स्पष्ट उत्तर दिले नाही.
----------------
पॅगेससची पार्श्वभूमी
पॅगेसस हे ग्रीक पुराणातील पंख असलेल्या अश्वदेवतेचे नाव आहे. इस्रायली गुप्तचर विभागात काम केलेल्या नीव्ह कार्मी, शॅलेव्ह हुलिओ आणि ओम्री लॅव्ही यांच्या नावाच्या अद्याक्षरांनी सुरू केलेल्या एनएसओ या कंपनीचे हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर म्हणजे पॅगेसस.
---------------
---------------
पॅगेसस कसे काम करते?
पॅगेससचे प्रारंभीचे संस्करण लिंक क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाइलमध्ये दाखल व्हायचे. २०१९साली पॅगेसस स्वत:च त्याला दिलेल्या मोबाइलवर फोन करते आणि जरी आपण फोन उचलला नाही, तरीही पॅगेसस फोनमध्ये दाखल होते. या प्रकाराला ‘झीरो क्लिक इन्सर्शन’ म्हणतात. त्यानंतर दाखल झालेले पॅगेसस आपल्या फोनचा माइक व कॅमेरे यासकट  फोनमधील सर्व सुविधांचा वापर करून आपल्या नकळत सर्व व्यवहार रॅकॉर्ड करते. आता आयोएस १४ व अँड्रॉइड ११ ही नवी संस्करणे आल्यापासून अशी हेरगिरी पॅगेससला करता येत नाही.
-------------
------------
लक्ष देण्यासारखी ‘क्रोनोलॉजी’
* २०११साली पॅगेससचे पहिले संस्करण जोएक्वीन गुझमानविरुद्ध मेक्सिकन सरकारने वापरले.
* २०१७साली एनएसओने अँड्रॉइडसाठी ख्रिसाओर (ग्रीक पुराणातील पॅगेससच्या भावाचे नाव) तयार केले आहे.
* जून २०१८ इस्रायली न्यायालयाकडून एनएसओला सरकारव्यतिरिक्त कुणालाही सॉफ्टवेअर विकण्यास बंदी
* २०१९साली फेसबुकने एनएसओवर खटला दाखल केला.
* २०१९साली अँड्रॉइड, आयोएस, व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुककडून पॅगेससला रोखणारा पॅच जारी.
* नोव्हेंबर २०१९ विरोधी पक्ष, पत्रकार यांच्या फोनमध्ये पॅगसेसच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचा आरोप.
* २०२०साली भारत सरकारने अ‍ॅम्नेस्टीची संपत्ती गोठवली आणि अ‍ॅम्नेस्टीने भारतातील कार्यालय सरकारने ‘सूड’ घेतल्याचे सांगत बंद केले.
* जुलै २०२१ अ‍ॅम्नेस्टीने भारत सरकार पॅगेससच्या साहाय्याने हेरगिरी करत असल्याच्या नोव्हेंबर २०१९सालच्या घटनेला एका वृत्तपत्र पोर्टलच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली.
 --------------------

हेही वाचा