रोहित पवार यांना ईडीचा मोठा धक्का

ईडीकडून बारामती अ‍ॅग्रोची १६१ एकर जमीन जप्त

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
08th March, 07:36 pm
रोहित पवार यांना ईडीचा मोठा धक्का

पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने धक्का दिला आहे.  ईडीने बारामती अ‍ॅग्रोच्या प्रॉपर्टीवर जप्तीची कारवाई केली आहे.  १६१ एकर जागा ईडीने जप्त केली आहे.  जवळपास ५०.२० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यात आली आहे.  बारामती अ‍ॅग्रो ही आमदार रोहित पवार यांच्या मालकीची कंपनी आहे. 

अंमलबजावणी संचालनालयाने बारामती अॅग्रो लिमिटेड मालकीच्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची (कन्नड एसएसके) ५०.२० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग (पीएमएलए), २००२ च्या तरतुदी अंतर्गत महाराष्ट्र राज्याने साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर विक्रीशी संबंधित प्रकरणात ही कारवाई केली आहे. कन्नड (जिल्हा औरंगाबाद) येथे १६१.३० एकर जमीन, प्लांट आणि यंत्रसामग्री आणि साखर युनिटची इमारत जप्त करण्यात आली आहे. आयपीसी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला. एमएससीबीचे तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी योग्य प्रक्रियेचे पालन न करता एसएसकेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रोहित पवार यांचा पलटवार

ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांनीही त्यावर पलटवार केला आहे. “माझ्या वाढदिवसाच्या दिवशीही दुसऱ्या एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी ही कारवाई करण्यात आली. पण मी महादेवाचा भक्त आहे, अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेव्हा अनेकांचा थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही”, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. त्यावर #लडेंगे_जितेंगे असा हॅशटॅग रोहित पवार यांनी दिला आहे.

हेही वाचा