तंबूत विश्रांती घेणाऱ्या स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार

दुमका येथील घटना : झारखंड उच्च न्यायालयाने घेतली स्वेच्छा दखल

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
05th March, 12:18 am
तंबूत विश्रांती घेणाऱ्या स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार

पाटणा : दुमका येथे शुक्रवारी रात्री एका स्पॅनिश महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराची झारखंड उच्च न्यायालयाने सोमवारी स्वेच्छा दखल घेतली. मुख्य न्यायमूर्ती एस. चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने झारखंडचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक (डीजीपी) तसेच ही घटना घडलेल्या दुमका जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक (एसपी) यांच्याकडून अहवाल मागवला आहे. पुढील सुनावणी ७ मार्च रोजी होणार आहे.
न्यायालयाने म्हटले की, एखाद्या परदेशी नागरिकाविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याच्या घटनेचे गंभीर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिणाम देशाच्या पर्यटन अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात. परदेशी महिलेविरुद्ध लैंगिक संबंधाने गुन्हा केल्याने देशाविरुद्ध विपरित प्रसिद्धी होण्याची आणि त्यामुळे जगभरात भारताची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेत केलेल्या सुधारणा आणि बलात्काराशी संबंधित गुन्ह्यांच्या शास्त्रोक्त तपासावर भर दिल्याने, तपासाच्या प्रगतीबाबत एसपी दुमका यांच्याकडून तातडीने अहवाल मागवण्याची गरज आहे.

तंबूत विश्रांती घेत असताना घात...

पोलिसांच्या नोंदीनुसार ब्राझीलचे नागरिकत्व असलेली स्पॅनिश महिला पश्चिम बंगालहून नेपाळला जात असताना, हंसदिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. ती महिला तिच्या पतीसह भारतभर बाईक टूरवर होती आणि कुरमाहाट गावातील एका निर्जन भागात तंबूत विश्रांती घेत असताना ही घटना घडल्याचे वृत्त आहे.

पीडितेला १० लाखांचा धनादेश

दुमका उपायुक्त अंजनेयुलु दोड्डे यांनी सोमवारी पीडितेला १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. रविवारी दुमकाचे पोलीस अधीक्षक पितांबर सिंह खेरवार यांनी सांगितले की, या प्रकरणातील अन्य चार आरोपींची ओळख पटली असून त्यांना लवकरच अटक केली जाईल. या प्रकरणात सात जणांचा सहभाग असून तिघांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संशयितांना रविवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. स्पॅनिश जोडप्यावरही हल्ला करून आरोपींनी त्यांच्याकडून १०,००० रुपये लुटले.

भाजपकडून निषेध मोर्चा

या घटनेचा निषेध करत विरोधी पक्ष भाजपने सोमवारी रांचीमध्ये निषेध मोर्चा काढला आणि राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी सरकारला जबाबदार धरले. झारखंडमधील स्पॅनिश महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे राज्याची जगभरातील प्रतिमा डागाळली असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.

आणखी दोन महिलांवर बलात्कार

स्पॅनिश महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील दोन जिल्ह्यांमध्ये आणखी दोन महिलांवर बलात्कार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. रविवारी पलामू जिल्ह्यातील हुसेनबाद येथे एका ऑर्केस्ट्रा कलाकारावर अमली पदार्थ पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक करून कोठडी सुनावण्यात आली. पाटणा येथील रहिवासी असलेल्या आणखी एका महिलेवर सोमवारी गढवा जिल्ह्यात एका व्यक्तीने बलात्कार केला. आरोपीने तिला दिलेले पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते.

हेही वाचा