८३ दिवसांत २,१७८ बळी; १,०६,९१८ जण बाधित

कोविडबळी तीन हजारपार; आणखी ११ बळी, ३०३ नवे रुग्ण


22nd June 2021, 11:50 pm
८३ दिवसांत २,१७८ बळी; १,०६,९१८ जण बाधित

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : १ एप्रिल ते २२ जून या ८३ दिवसांच्या कालावधीत करोनामुळे २,१७८ जणांचा मृत्यू झाला. १,०६,९१८ जणांना विषाणूची लागण झाली. २२ जून (मंगळवार) रोजी राज्यातील कोविडबळींनी तीन हजारांचा टप्पा ओलांडला. सोमवार आणि मंगळवारच्या चोवीस तासांत आणखी ११ जणांचा बळी गेला असून, नवे ३०३ रुग्ण सापडले आहेत.
३१ मार्च २०२१ पर्यंत करोनामुळे ८३० जणांचा बळी गेला होता. पण ५ एप्रिलनंतर करोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यभर धुमाकूळ घातल्याने बळींचा स्फोट होऊन अवघ्या ८३ दिवसांत २,१७८ जणांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे २२ जूनपर्यंत एकूण बळींचा आकडा ३,००८ झाला आहे. याशिवाय ३१ मार्चपर्यंत एकूण बाधितांची संख्या ५८,०३९ होती. २२ जूनपर्यंत त्यात तब्बल १,०६,९५७ जणांची भर पडल्याने हा आकडा १,६४,९५७ वर पोहोचला आहे. त्यांतील १,५९,०२९ जणांनी करोनावर यशस्वीरीत्या मातही केली आहे.
सोमवार आणि मंगळवारच्या २४ तासांत आणखी ४३८ जण करोनामुक्त झाले. २६ जणांना इस्पितळांतून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या २,९२० झाली आहे. या चोवीस तासांत आरोग्य खात्याला ४,३११ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यांतील केवळ ३०३ बाधित ठरले. त्यामुळे बाधित होण्याचा दर घटून ७.०२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. बरे होण्याचा दर ९६.४१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
नव्या ११ पैकी सात जणांचा गोमेकॉत, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ व मणिपाल इस्पिळात प्रत्येकी एकाचा, तर मदर केअर इस्पितळात दोघांचा मृत्यू झाला. मृतांत कुडतरी येथील ३४, शिरोडा येथील ५०, जुने गोवे येथील ४०, कुंभारजुवा येथील ५९ तसेच ७० वर्षीय अनोळखी पुरुष तसेच घोगळ येथील ६४, करंझाळे येथील ५३ व ८४ वर्षीय, पर्वरी येथील ७६, डिचोली येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
__
कणकवली भागात आढळला डेल्टा प्लसचा रुग्ण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविडचा नवीन स्ट्रेनचा (डेल्टा प्लस) रुग्ण कणकवली परबवाडी येथे सापडला आहे. बाधित सापडलेल्या भागात आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपाययोजना सुरू आहेत. कोविडबाधिताच्या संपर्कातील नागरिकांची शोधमोहीम सुरू आहे. इली, सारी आजारातील रुग्णांची व लक्षणांबाबत सर्वेक्षण सुरू आहे. लसीकरणही करण्यात येत आहे. भागातील नागरिकांनी नियमित हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे यांचे कठोर पालन करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा