‘सिंधुतीर्थ’ कार बाप-लेक

माणसाला मातीची ओढ असली तरच त्याच्या माणूस म्हणून जगण्याला अर्थ येतो. भाटकर काका व सेरा यांनी हेच तर केलं...

Story: माणसासम वागणे । स्नेहा सुतार |
21st June 2021, 07:06 pm
‘सिंधुतीर्थ’ कार  बाप-लेक

ये काम बोहोत मुश्किल है भाई ये नहीं गो पायेगा "

" ये काम अगर मैं नही कर सकता तो मेरे जीने का क्या मतलब?? "  

रस्त्याच्या बाजूला गॅरेजमध्ये काम करून ऑइलमध्ये लडबडलेला एक मेकॅनिक एका गृहस्थाशी बोलत होता. प्रल्हाद काकांच्या कानी त्यांचे संभाषण पडताच त्याचे हेच शब्द काकांच्या कानात कित्येक दिवस घुमत राहिले आणि इथूनच आकाराला आली 'सिंधुतीर्थ' ची कल्पना. प्रल्हाद भाटकर म्हणजेच सर्वांचे लाडके प्रल्हाद काका...मुळचे कोकणचे प्रल्हाद काका जन्मापासून मुंबईतच लहानाचे मोठे झाले. गावाकडेही तसं लहानपण गेलं, तरी गाव मात्र निमित्तानेच वाट्यास आलेला.गावाकडच्या आठवणी, गावाची ओढ मनात ठेवून कधीतरी सणासुदीला गावाकडे जाणारे प्रल्हाद काका, मुंबई कर्मभूमी मानत कित्येक वर्षे गावासाठी झुरत राहिले. नेहमी आतुरता असायची की कधी गावाला जातो आणि ते सगळं अनुभवतोय.

कधीतरी एकदा हातात कॅमेरा आल्यानंतर गावी जाऊन त्यांनी सहज म्हणून गावाकडील फोटो काढले व ते फोटो त्यांनी मुंबईला आल्यानंतर आपल्या मित्र-मैत्रिणींना इमेल केले. त्यांना ते खूप आवडले. व त्यानंतर त्यांचं हे फोटोग्राफीचं वेड वाढलं. गावाकडली प्रत्येक गोष्ट आठवण म्हणून कॅमेऱ्यात टिपणे व त्याचं मित्रमंडळींकडून कौतुक व्हावं हे नित्याचंच झालं . पण यातून झालं असं की प्रल्हादकाका याकडे आता बारकाईने बघू लागले. एखादं लहान मूल जसं कौतुकाने मित्र-मैत्रिणींना आपल्याकडील वस्तू दाखवतं, तसंच काकांच्या बाबतीत घडलं . कोकणातलं सौंदर्य, कोकणातली संस्कृती, इथलं लोकजीवन म्हणजे खजिनाच जणू. त्यातलं काय दाखवू आणि काय नको असं होऊ लागल्यावर मात्र काकांनी रितसर फोटोग्राफीचं तंत्र शिकून घेऊन फोटोग्राफी करायला सुरुवात केली. मात्र काढलेले फोटो किती दिवस आपल्या मित्र-मैत्रिणींना दाखवत बसायचं, यापलीकडे जाऊन काहीतरी केलं पाहिजे. जन्माला आलोय तर आपल्या मातीसाठी काहीतरी केलं पाहिजे हा चंग मनात बांधून त्यांनी आपल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले. पहिलाच अनुभव, त्यात आर्थिक बाजूचा ही विचार करता, हे करावे की करू नये असं होत असताना त्यांचे फोटोग्राफीतले गुरु म्हणाले, 'आपल्या हौसेसाठी खर्च झाला, तर त्याचं वाईट वाटून न घेता त्या गोष्टीचा फक्त आनंद घ्यावा" हाच मंत्र गाठीशी बांधून काकांनी २०१२-१३ साली आपलं पाहिलं १७० छायाचित्रांचं  प्रदर्शन 'सिंधुतीर्थ ' या नावाने आपल्याच कामाच्या ठिकाणी नवरात्रीच्या दिवसांतल्या ऑफिसामधल्या कार्यक्रमात भरवलं. जेवणाच्या वेळेस त्यांचे सहकारी, अधिकारी प्रदर्शन बघायला येऊन लागले. त्यांच्या सुंदर नजरेची, त्यांच्या टिप्पणाची, त्यांच्या प्रत्येक फ्रेमचं कौतुक होऊ लागलं. काहीतरी वेगळं करणं म्हणजे काय करणं? जे नाही आहे ते निर्माण करणं. हेच तर काकांनी केलं. मुंबईसारख्या घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या शहरात पोटापाण्यासाठी आलेल्या नोकरदार कोकणी माणसाला काकांनी कोकणचं दर्शन मुंबईतच घडवलं.' हे माझ्या गावातलं मंदिर, हे माझ्या घराशेजारची नदी, ही माझी शाळा…' असे कित्येक संदर्भ, खाणाखुणा त्या छायाचित्रात बघून लोकं डोळे भरुन कोकणदर्शन करू लागली. डोळे भरुन छायाचित्रं पाहू लागली. काकांनी ती छायाचित्रं टिपल्याने त्यांच्याशी येऊन कौतुकाने आपले संदर्भ त्या छायाचित्रांशी जोडून काकांची पाठ थोपटू लागली, त्यांच्याशी भावनिक नातं जोडू लागली. कित्येक माणसं काकांशी अशी जोडली गेली..

त्यानंतर आपल्या लेकीच्या म्हणजे सेराच्या साथीने काकांनी या प्रदर्शनाला पुस्तकरूप द्यायचं ठरवलं आणि त्यातून निर्मिती झाली ' सिंधुदुर्ग देशा ' या अप्रतिम, प्रत्येकाच्या संग्रही असावे अशा बाप लेकीच्या छायाचित्रांच्या अल्बमरूपी पुस्तकाची. बाप से बेटी सवाई - याप्रमाणे सेरा मुंबईत वाढलेली, आजच्या तरुण पिढीतली असूनसुद्धा गावाकडे जायचं म्हटलं की बाबांसोबत हिच्या पायालाही भिंगऱ्या लागतात. गावी आल्यानंतर मातीतल्या माणसांशी अगदी मिसळून जाणारी सेरा अज्जीबाईंपासून लहान मुलांमध्ये अगदी त्यांच्यातलीच एक होऊन वावरते. त्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपते.अगदी तिच्या बाबांच्याच नजरेतून.. त्याच कौतुकातून आणि त्याच मातीच्या प्रेमातून..

 मातीचं देणं असं धमान्यांतून वाहत असताना माणसाचं माणूसपण जिवंत ठेवायला अजुन काय हवं?नाही का?