Goan Varta News Ad

पणशीकर ते कोटकर

गोवाभर कंपनीची नाटके व्हायची, कारण उत्तम कोटकरांसारखे नाट्यमंडप उभे करून मनोरंजनाचे साधन निर्माण करणारे हात होते...गोवेकरांच्या नाट्यप्रेमाविषयीच्या आठवणींना उजाळा देणारा लेख...

Story: रंगमंच | शशिकांत पुनाजी |
21st June 2021, 06:54 Hrs
पणशीकर ते कोटकर

आमच्या ‘तो मी नव्हेच’ वर गेल्या चाळीस वर्षात सर्वाधिक प्रेम गोमंतकाने केलं. या कालावधीत गोव्यात आम्ही या नाटकाचे वीस दौरे केले. जवळजवळ अडीचशे प्रयोग फक्त गोमंतकात करण्याचा विक्रम केला. ज्या गावात हा प्रयोग होण्याच्या शक्यतेविषयी साशंकता होती, त्या गावातल्या गावकऱ्यांनाही कधी वाटले नव्हते अशा कायसुव, अस्नोडा, दिवाडी या लहानसहान गावात स्टेज व मांडव घालून प्रयोग केले. त्या प्रयोगांनाही गोमंतकीय रसिकांनी भरभरून दाद दिली. ‘तियात्र’  हा खास गोमंतकीय मुक्त नाट्यप्रकार बघणारे ख्रिश्चन प्रेक्षकही या नाटकानं मिळवला. दोन-तीन वर्षांपूर्वी या नाटकाचे निरोपाचे प्रयोग मी गोमंतकात केले तेच मुळी तीस-पस्तीस ठिकाणी! गोव्यात रसिकांच्या या प्रेमातून उतराई होण्यासाठी या नाटकाचा अकराशेवा प्रयोग आम्ही पणजी येथे प्रा. माधव मनोहर व दै. गोमंतकचे संपादक माधव गडकरी यांच्या उपस्थितीत साजरा केला. पेडण्याचे सुपूत्र व नाट्यजगतात ज्यांनी स्वत:चा ठसा उमटविला त्या प्रभाकरपंत पणशीकर यांनी आपल्या ‘तोच मी’ या आपल्या आत्मचरित्रात गोवेकराच्या नाट्यप्रेमाविषयी लिहिले आहे. वेदशास्त्रसंपन्न वासुदेवशास्त्री पणशीकर यांचे नातू, वडील वेदशास्त्रसंपन्न विष्णूशास्त्री पणशीकर. त्यांचा जन्म जरी महाराष्ट्रात झाला, तरी गोव्याबद्दल विशेषत: पेडण्याबद्दल आत्मियता असलेला हा महान नाट्यकलावंत. ‘पेडणेकरी’ स्वभाव नसानसात भिनलेला.

आज त्यांची आठवण येण्याचे कारण म्हणजे आमचे एक जुने जाणते उत्तम काशिराम कोटकर यांचं चटका लावून जाणारं निधन. प्रभाकर पणशीकरांचे पेडण्याचे निकटवर्तीय. पेडण्यात आल्यानंतर उत्तमाच्या 'प्रिया' हॉटेलवर पंताची ‘गजाली’ची मैफल रंगायची. उत्तम कोटकर यांनी गोवा मुक्तीनंतर पेडण्यात 'कोटकर नाट्य मंडप' उभारला. ‘मल्लाचा’ शेतात उभारलेल्या या मंडपात कंपनीची; विशेष करून नाट्यसंपदेची बहुतेक नाटके झाली. प्रभाकर पंताचा गोवा दौराच मुळी पेडणेचा प्रयोग ठरवूनच व्हायचा. नाट्यसंपदेचे ‘तो मी नव्हेच’ पेडण्यात कितीतरी वेळा कोटकरांच्या मंडपात झाले. पेडण्यातील अनेक जण ट्रिक सिन्स असलेले 'संगीत संत तुकाराम' या नाटकाची आजही आठवण करतात. 'अश्रूंची झाली फुले',' पुत्रकामेष्टी', 'इथे ओशाळला मृत्यू', 'बेईमान', 'जिथे गवतास भाले फुटतात ' अशी अनेक गाजलेली नाटके या कोटकर मंडपात सादर झाली. 'सौरभ ' अॅडचे मालक आमचे मित्र गुरुनाथ नाईक हेच त्याकाळात जाहिरात क्षेत्रातील महाराजा होते. त्यावेळी दै. गोमन्तक वर नाटकाची जाहिरात यायची. "तिकीटविक्री कोटकर यांच्या दुकानी चालू आहे... कालचा 'तो मी नव्हेच' हाऊसफुल्ल... आज रात्री १० वाजता 'कोटकर भगवती नाट्य मंडप',पेडणे " असे हे उत्तम कोटकर. वयाच्या ८६व्या वर्षातही त्यांच्या धडपडी सुरुच होत्या. त्याचे नाट्यप्रेम आणि साहित्यप्रेम गोव्यातील अनेकांना परिचित आहे. नाट्यकर्मी श्रीधर कामत बांबोळकर यांनी त्यांना पेडण्यात एकांकिका सादर करताना केलेल्या मदतीचा आवर्जून उल्लेख केला आहे.

'नाट्यमंडप ते रविंद्रभवन' हा या सदरातील माझा लेख उत्तम कोटकरांनी वाचला. त्यांचे सुपुत्र प्रविण कोटकर यांनी लेखावर प्रतिक्रिया देताना, 'आमचेही बाबा नाट्यमंडप घालायचे' असे नमूद केले. त्यानंतर मी उत्तम कोटकरांना भेटणार होतो. त्यांच्या दुकानावर बसून कटींग चहा मागवून बोलणार होतो. नाट्यमंडप उभारणाऱ्यांचे अनुभव या सदरात लिहिणार होतो. पण ते होणे नव्हते. नाट्यमंडप उभारणे, त्यात सातशे- आठशे लोखंडी खुर्च्या मांडणे. लक्ष केंद्रीत करून त्या खुर्च्यांवर क्रमांक टाकणे. एखादी चूक झाली तर एकाच खुर्चीवर दोघे जण दावा सांगत, एखादा नंबर नसला तर पुन्हा गोंधळ, त्यानंतर बॅटरी घेऊन उभा रहाणारा डोअरकिपर, हाऊसफुल्ल झाला नाही तर पदरी तोटा.

असा हा सगळा नाट्यमंडपाचा पसारा सांभाळणे कठिण काम. डिचोलीत हे काम विष्णू कापडी करायचे. साखळीत जयदेव पांगम करायचे, माशेलात गुरव करायचे. त्यावेळी कला अकादमीत सध्या इडीसी हाऊस आहे ते एकमेव पणजीतील थिएटर व मडगावचे गोमंत विद्या निकेतन अशावेळी प्रभाकर पणशीकर म्हणतात तसे गोवाभर कंपनीची नाटके व्हायची. कारण उत्तम कोटकरांसारखे नाट्यमंडप उभे करून मनोरंजनाचे साधन निर्माण करणारे हात होते. गोव्याचे रसिक हे चोखंदळ. त्यांना नाटकातले बरे - वाईट लवकर कळते. मराठी रंगभूमीला १९६० ते १९८० च्या दशकात जे नाट्यकलाकार मिळाले त्यातले बहुतेक सर्व जन्माने वा वारसाने गोव्याचे होते. १९६०च्या काळात गोव्याच्या मो. ग. रांगणेकराचा मराठी नाट्यसृष्टीतला दबदबा केवढा होता? त्यांची 'नाट्यनिकेतन' ही संस्था त्याकाळी उंच शिखरावर होती. नाट्यनिकेतनच्या नाटकात काम मिळावे म्हणून कलाकार ताटकळत होते.

गोवा स्वातंत्र झाल्यानंतर मुंबईकडच्या नाट्य कंपनीचा एक गोवा दौरा असायचा. या एका दौऱ्यात किमान सहा -सात प्रयोग करणे व्यवहारिक होते. नाट्यगृह नसल्यामुळे अशी नाटके सादर करणे जिकीरीचे व्हायचे. याच गरजेतून तालुक्याच्या ठिकाणी झावळांचे नाट्यमंडप उभारून ठेवले जात होते. चुडताच्या झावळांनी उभारलेले हे ‘माटोव’ केवळ तिकीट काढून येणाऱ्यांसाठी लक्ष्मणरेषा होती. ज्याच्याकडे तिकीट काढण्याची ऐपत नव्हती, पण नाटकाची आवड असायची ते रसिक माटोवाच्या फटीतून नाटक पहायचे. म्हणून नाट्यमंडप उभारून स्वातंत्र्यानंतर ज्या लोकांनी नाट्यचळवळ उभी केली त्याची दखल घेणे सरकारचे कर्तव्य आहे. या लोकांनी ते व्यवसाय म्हणून जरूर केला असेल, पण तो केला नसता तर उत्कृष्ट दर्जेदार नाटके त्याकाळी गोवेकरांना पाहता आली नसती. आपले गोव्यातील अनेक नाट्यप्रेमी मुंबईत जाऊन कंपनीची नाटके पाहून यायचे . यावरून आपले नाट्यवेड किती प्रखर आहे व होते याची प्रचिती येत.