करोना मृत्यूंच्या आकडेवारीत लपवाछपवी!


11th June 2021, 12:41 am

करोना मृत्यूंच्या आकडेवारीत लपवाछपवी!

पाटणा : 

बिहारच्या आरोग्य विभागातील अप्पर मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. ७ जूनपर्यंत बिहारमध्ये मृतांचा आकडा ५४२४ असा जाहीर करण्यात आला होता. तो आकडा चुकीचा असल्याचा सांगत अप्पर मुख्य सचिवांनी हा आकडा ९,३७५ असल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या आकडेवारीनुसार मृतांचा आकडा ७३ टक्क्यांनी वाढला आहे. या स्पष्टीकरणानंतर विरोधकांनी बिहार सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

पटणा उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर १८ मे रोजी राज्य सरकारने करोनामुळे होणार्‍या मृतांच्या चौकशीसाठी दोन टीम तयार केल्या होत्या. या टीमने केलेल्या चौकशीत मृतांचा आकड्यात तफावत असल्याचे समोर आले आहे. नव्या आकडेवारीनंतर करोना मृतांच्या यादीत बिहार राज्य १२ व्या स्थानावर आले आहे. यापूर्वी बिहार १७ व्या स्थानावर होतं. आता आकडेवारीत तफावत आढळल्यानंतर सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

मृतांच्या आकड्यात वाढ झाल्यानंतर सरकारकडून काही तर्क मांडण्यात आले आहेत. करोनामुळे काही जणांचा मृत्यू होम आयसोलेशनमध्ये झाला आहे. तर काही जण करोनाची लागण झाल्यानंतर दुसर्‍या जिल्ह्यात गेले होते, तिथे त्यांचा मृत्यू झाला. काही जणांचा मृत्यू करोनातून बरे झाल्यानंतर झालं, असे स्पष्टीकरण आरोग्य विभागातील अप्पर मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी दिले आहे.

मागच्या वर्षीपासून देशात करोनाचा प्रकोप सुरु आहे. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसर्‍या लाटेतील चित्र विदारक होतं. बिहारमध्ये करोनाबाधितांचा आकडा ७ लाख १५ हजार १७९ इतका झाला आहे. यातील पाच लाखांहून अधिक लोकांना काही महिन्यांपूर्वी करोनाची लागण झाली आहे. करोनातून बरे झालेल्यांची आकडेवारी सरकारने मंगळवारी ७ लाख १ हजार २३४ इतकी जाहीर केली होती. त्यानंतर आता ही आकडेवारी ६ लाख ९८ हजार ३९७ इतकी करण्यात आली आहे. तर बिहारमध्ये मंगळवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.७० टक्के इतकं होतं. ते आता ९७.६५ टक्के करण्यात आले आहे. या आकडेवारीनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.

हेही वाचा