आरोग्य यंत्रणेची हतबलता

चाचणी केलेल्यांपैकी पन्नास टक्के लोक कोविडबाधित होतात, याचाच अर्थ कोविडचा संसर्ग किती गतीने होत आहे, ते लक्षात येते.

Story: अग्रलेख |
06th May 2021, 01:05 am
आरोग्य यंत्रणेची हतबलता

राज्यातील कोविडची स्थिती इतक्यात नियंत्रणात येण्याची शक्यता नाही. लसीचा साठा नसताना केंद्र आणि नंतर राज्य सरकारने १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची केलेली घोषणा इतक्यात सत्यात येईल, असेही वाटत नाही. लसीकरण जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोविडचा धोका कमी होणार नाही. लसीकरण न झाल्यामुळे कोविडचे रुग्णही कमी होत नाहीत किंवा इतक्यात कमी होणारही नाहीत. गेल्या पाच दिवसांमध्येच कोविडमुळे २६१ मृत्यू समोर आले आहेत. त्यात एप्रिलमधील सुमारे १५ मृत्यू जोडले आहेत. ते वगळता इतर २४६ मृत्यू हे गेल्या पाच दिवसांत झाले आहेत. हे चित्र भयानक आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तर कोविडमुळे मृत्यू येणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. पाच दिवसांतली सरासरी पाहिली तर अर्ध्या तासाला एक माणूस मरतो आहे. १८ ते ४०पर्यंत वयाचे तरुण असोत किंवा वयस्कर! दोन्ही गटातील लोक मोठ्या प्रमाणात करोनाचे शिकार होत आहेत. राज्य सरकारने आपल्यापरीने राज्यात निर्बंध लागू केले आहेत. पंचायती, पालिकाही आपापल्या भागात लॉकडाऊन लागू करत आहेत. कोविडमुळे होणारे मृत्यू कसे थांबतील, कोविडवर कसे नियंत्रण येईल त्याचा अभ्यास करून त्वरित उपाय करण्यासाठी सरकारने पावले उचलावी लागतील. अन्यथा आजच्या पेक्षाही भयानक चित्र पुढे निर्माण होईल.
सरकारने लागू केलेले निर्बंध हेच राज्यासाठी पूरक असले तरीही पंचायती आणि पालिका पुढाकार घेऊन आपला परिसर सुरक्षित ठेवू पाहतात, ही बाब दखल घेण्यासारखी आहेच; पण कामावर जाऊ पाहणाऱ्यांना कोणी रोखू नये. आपल्या निर्बंधांमुळे कोणाची नोकरी जाणार नाही याचीही काळजी पालिका आणि पंचायतींनी घ्यायला हवी. सध्याच्या स्थितीत जीव महत्त्वाचा आहेच; त्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. पण, बेरोजगारीची समस्या अजून उग्र होणार नाही याचीही काळजी प्रत्येकाने घ्यावी लागेल. सरकारने लागू केलेल्या निर्बंधात सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंतच अत्यावश्यक सेवांची आस्थापने सुरू राहावीत, असे म्हटले आहे. पण, पालिका आणि पंचायतींमध्ये जे लॉकडाऊन लागू होत आहे, त्यात निर्बंध सरकारच्या आदेशापेक्षाही कडक होत आहेत. राज्यातील बहुतांश पंचायतींनी आतापर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ बहुतांश भाग लॉकडाऊनखाली आलेला असल्यामुळे राज्य सरकारने करोनाची साखळी रोखण्यासाठी अजूनही कडक निर्बंध लागू करता येतात का, त्यावर विचार करावा लागेल. कारण गोव्यात करोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. चाचणी केलेल्यांपैकी पन्नास टक्के लोक कोविडबाधित होतात याचाच अर्थ कोविडचा संसर्ग किती गतीने होत आहे, ते लक्षात येते. त्यातच आंध्र प्रदेशात सापडलेला कोविडचा नवा स्ट्रेन जर देशात पसरला तर अजूनही स्थिती भयानक होऊ शकते.
गोव्यात गेल्या ३५ दिवसांमध्ये ४६ हजार कोविड रुग्ण सापडले. गेल्या वर्षभरात ५८ हजार रुग्ण सापडले होते. वर्षभराचा विक्रम ह्या दीड दोन महिन्याच्या काळातच मोडला जाईल हे नक्की. १ एप्रिलला गोव्यातील आतापर्यंतच्या रुग्णांचा आकडा ५८,३०४ होता जो आता १ लाख ४ हजारपर्यंत पोहचला. मृतांचा आकडा ८३१ होता. मागील पस्तीस दिवसांतच ६१२ जणांचा मृत्यू झाला. मे महिन्यात तर गेल्या पाच दिवसांमध्येच २४६ मृत्यू आहेत. ह्या पाच दिवसांतला सरासरी दर पाहिला तर ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत राज्यात कोविडमुळे उद्भवलेली स्थिती काय असेल त्याचा फक्त अंदाज बांधावा. एका बाजूने ही दुर्दैवी वेळ गोव्यावर आलेली असताना सरकारची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे हतबल झाल्याचेच दिसते. सरकारी इस्पितळांमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे मृत्यू होत आहे. काहीवेळा घराकडून रुग्ण इस्पितळात आणताना वाटेत त्यांचा मृत्यू होत आहे. हेही प्रमाण मोठे आहे. त्यामुळे घरी असलेल्यांना देखरेखीखाली ठेवण्यातही आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली आहे. ऑक्सिजनचा स्तर कमी झाल्यानंतर रुग्णाला इस्पितळात आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत; पण गेले काही दिवस सरकारी नोंदीप्रमाणे अनेक रुग्णांचा इस्पितळात आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे समोर आले. घरी असलेल्या रुग्णांना उपचाराचे किट वेळेवर मिळत नाही, चाचण्यांचे अहवाल वेळेवेर येत नाहीत. सगळ्याच अंगाने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. त्यात सुधारणा होण्यापेक्षा दिवसेंदिवस आरोग्य यंत्रणेचा निष्क्रियपणाच समोर येतो हे दुर्दैव!