Goan Varta News Ad

माजी आमदार विनायक नाईक यांचे करोनामुळे निधन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th May 2021, 12:15 Hrs
माजी आमदार विनायक नाईक यांचे करोनामुळे निधन

म्हापसा : थिवीचे माजी आमदार विनायक नाईक (८०) यांचे सोमवारी करोना संक्रमणामुळे गोमेकॉत निधन झाले. करोनाचा संसर्ग झाल्यामुळे गेल्या आठवड्यात त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात विवाहित पुत्र, स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेवर शैक्षणिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. शैक्षणिक, साहित्यिक, सहकार क्षेत्रातील एक अनमोल हिरा आमच्यातून गेल्याची प्रतिक्रिया माजी उपसभापती शंभू बांदेकर यांनी व्यक्त केली आहे.
नाईक हे १९८९ मध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकीटावर थिवी मतदारसंघातून निवडून आले होते. शिक्षण क्षेत्र व स्थानिक स्वराज्य संस्था बळकट व्हाव्यात, यासाठी त्यांनी आयुष्यभर दिलेले योगदान प्रेरणादायी आणि स्मरणीय आहे. शिक्षक म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केले. समाजवादी विचारसरणीचे असल्याने त्यांनी स्व. बॅरिस्टर नाथ पै यांच्या स्मरणार्थ कळंगुट येथे हायस्कूल सुरू केले. पिर्णचे माजी सरपंच, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे माजी अध्यक्ष, पिर्ण विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष, कोलवाळ येथील डॉ. आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, कळंगुटच्या विद्यानिकेतन हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक, नाथ पै स्मृती शैक्षणिक संस्थेचे सचिव, कोलवाळच्या महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अशा विविध भूमिकांत त्यांनी समाजकार्य केले.
साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कित्येक वर्षे काम पाहिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारांनी ते भारलेले होते. यामुळेच त्यांनी कोलवाळ येथे महात्मा ज्योतीबा फुले हायस्कूल तसेच डॉ. आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालय सुरू केले. मराठी साहित्य संमेलने घडवून आणण्यासाठी ते प्रयत्नरत होते.

मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

माजी आमदार विनायक नाईक यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्हटले आहे. आमदार जोशुआ डिसोझा यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
- गोमंतकातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान तसेच शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ट्विटद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
- आम्ही मराठी आंदोलनात बरोबरीने काम केले. विनायक नाईक कट्टर मराठीवादी होते. मराठी भाषा हा त्यांचा श्वास होता. शैक्षणिक श्रेत्रात त्यांनी प्रचंड काम केले आहे, असे मगोपचे ज्येष्ठ नेते भाई मोये यांनी म्हटले आहे.
- माजी आमदार विनायक नाईक यांच्या निधनाने मला खूप दुःख झाल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी व्यक्त केली. मराठी भाषा आणि संस्कृतीचे कट्टर नायक होते, असे त्यांनी म्हटले आहे.
- शिक्षण क्षेत्रातील आणि समाज सेवेतील नाईक यांचे योगदान खूप मोठे आहे. पुस्तकप्रेमी म्हणून ते प्रसिद्ध होते. मराठी भाषेसाठी त्यांचे कार्य सर्वश्रूत आहे, असे केंद्रीय राज्यरक्षा मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे.