Goan Varta News Ad

करोना स्थिती दिवसागणिक गंभीरच!

सरकारसमोर संकट; इस्पितळे फुल्ल, डॉक्टर कमी, उपचारांअभावी अनेकांचा तडफडून मृत्यू

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th May 2021, 12:04 Hrs
करोना स्थिती दिवसागणिक गंभीरच!

पणजी : राज्यातील करोनाबाधित आणि मृतांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय अधिकारीही पूर्णपणे हतबल झाले आहेत. कोविड रुग्णांवर उपचार करणारी सर्वच सरकारी इस्पितळे फुल्ल झाली आहेत. खर्चाच्या भीतीने बाधित रुग्ण खासगी इस्पितळांत जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे सरकारी इस्पितळांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
मे महिन्याच्या मध्यावर करोनाची दुसरी लाट आणखी रौद्ररुप धारण करणार असल्याचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडे व्यक्त होत आहे. तसे झाल्यास गोव्यात आतापेक्षा भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते.
करोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारने काही दिवसांपासून निर्बंध लागू केले आहेत. पण बाधितांची संख्या दररोज अडीच हजारांवर जात असल्याने सरकारी निर्बंध अपुरे पडत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सरकारी इस्पितळांवर ताण येत असल्याने खासगी रुग्णालयांत कोविड उपचार दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेअंतर्गत (डीडीएसएसवाय) देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार खासगी इस्पितळांना दरही निश्चित करून दिला आहे. पण, काही खासगी इस्पितळे सरकारने निश्चित केलेले दर पाळत नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना केवळ लुबाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांचे नातेवाईक बाधितांना सरकारी इस्पितळांत दाखल करण्यास प्राधान्य देत आहेत, अशी माहिती गोमेकॉत उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाने गोवन वार्ताशी बोलताना दिली. अशा प्रकारांमुळे सरकारी इस्पितळांवर मोठ्या प्रमाणात ताण पडला आहेत. कोविड उपचार करणारे अनेक डॉक्टर, परिचारिका स्वत: बाधित होत आहेत. त्यातच रुग्णांची संख्या वाढतच असल्याने सेवेत असलेल्या डॉक्टरांवर ताण येऊन त्यांच्यातील अस्वस्थता वाढत आहे. ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर तसेच उपचारांसाठी आवश्यक इतर साधन-सुविधाही अपुऱ्या पडत असल्याने गोमेकॉसह इतर सरकारी इस्पितळांत रुग्णांचा तडफडून मृत्यू होत असल्याची माहिती काही रुग्णांच्या नातेवाईकांकडून मिळाली.
‘आयएमए’ सरकारवर नाराज
करोना प्रसाराची साखळी लवकरात लवकर तोडण्यासाठी राज्यात किमान १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा तसेच आवश्यता भासल्यास त्यात आणखी वाढ करण्याचा सल्ला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) गोवा विभागाने सरकारला दिला होता. पण सरकारने आहेत तेच निर्बंध पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेत सल्ला धुडकावून लावल्यामुळे ‘आयएमए’च्या डॉक्टरांतही निराशा पसरल्याची माहिती संघटनेच्या एका सदस्याने दिली.
गोमेकॉत २५० पेक्षा अधिक रुग्ण ऑक्सिजनवर
गोमेकॉत सध्या ७०९ करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यांतील २५० पेक्षा अधिक जण ऑक्सिजनवर असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. करोनाबाधित रुग्णांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार करण्याचे आणि राज्यातील मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत. ‘गार्ड’ संघटनेच्या सल्ल्यानुसार लवकरच कोविड इस्पितळांत डॉक्टर व इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही सोमवारी गोमेकॉची पाहणी करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.
करोनामुक्तीसाठी पंचायतींकडून लॉकडाऊन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वच पंचायतींना करोनामुक्त होण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक पंचायतींनी स्वयंस्फूर्तीने कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. नागवा-हडफडेनंतर पर्रा, वेर्ला-काणका, वेर्णा, कुठ्ठाळी आदी पंचायतींनी पुढील आठ ते दहा दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सांताक्रूझ पंचायतीनेही ५ मेपासून १० मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळच्या सत्रात चार-पाच तास सुरू ठेवून इतर संपूर्ण दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्री काब्राल यांच्यावर अँजिओप्लास्टी
मंत्री नीलेश काब्राल यांना बांबोळी येथील गोमेकॉत उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्र्यांनी सोमवारी गोमेकॉत काब्राल यांची भेट घेतली. काब्राल यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.