दोन तृतियांश आमदारांचे पक्षांतर घटनेनुसार वैधच

मगोपच्या अपात्रता याचिकेवर सभापतींचा निवाडा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd April 2021, 12:36 am
दोन तृतियांश आमदारांचे पक्षांतर घटनेनुसार वैधच

पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तीन आमदारांपैकी दोघांच्या गटाने पक्षांतर केले. ते अन्य पक्षात विलीन झाले. हे विलिनीकरण घटनेच्या परिशिष्ट दहानुसार वैधच आहे, असा निवाडा देत सभापती राजेश पाटणेकर यांनी आमदार सुदिन ढवळीकर यांची अपात्रता याचिका फेटाळली आहे. हा निवाडा २० फेब्रुवारी रोजी देण्यात आला होता. त्याची प्रत गुरुवारी याचिकादार ढवळीकर यांना प्राप्त झाली आहे. एकूण ८५ पानी या निकालपत्रात दोन आमदारांचे पक्षांतर वैध ठरवण्यात आले आहे.
मगोपचे आमदार मनाेहर आजगावकर आणि दीपक प्रभू पाऊस्कर यांनी २०१९ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. हा प्रवेश अवैध असल्याचा दावा करत आमदार ढवळीकर यांनी त्याचवेळी अपात्रता याचिका दाखल केली होती. ही अपात्रता याचिका २० एप्रिल रोजी सभापती पाटणेकर यांनी फेटाळून लावत पक्षांतर वैध असल्याचे स्पष्ट केले आहे.
घटनेच्या परिशिष्ट दहामधील चौथ्या परिच्छेदातील क्रमांक २ च्या नियमानुसार विधिमंडळ गटातील दोन तृतियांश आमदारांनी पक्षांतर केल्यास ते वैध ठरते. एक तृतियांश आमदार मूळ पक्षात राहिल्याने मूळ पक्ष तसाच उरतो. मूळ पक्षाचे विलिनीकरण व्हायलाच हवे, असे बंधन नाही. यामुळे याचिकेत प्रतिवादी असलेल्या दोन्ही आमदारांचे पक्षांतर वैध ठरते. ते अपात्र ठरत नाहीत, असे सभापतींनी निकालपत्रात नमूद केले आहे. याचिकादार किंवा प्रतिवादींनी दहाव्या परिशिष्टातील विलिनीकरणाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या एखाद्या निवाड्याचा कोणताही दाखला दिलेला नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या (गजराज सिंग विरुद्ध स्टेट ट्रान्सपोर्ट अलिलिट ट्रिब्युनल) व गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या (इम्तेलाब संंघटन विरुद्ध सभापती) निवाड्यांंचा संंदर्भ सभापतींनी घेतला आहे, असा उल्लेख निकालपत्रात करण्यात आला आहे.
निवाड्याला देणार खंडपीठात आव्हान!
सभापतींनी आमची अपात्रता याचिका फेटाळून लावली आहे. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले जाईल, असे आमदार सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे. सभापतींनी घटनेतील दहाव्या परिशिष्टाचा जो अर्थ लावला आहे, तो चुकीचा आहे. न्याय मिळवण्यासाठी खंडपीठात जाणे गरजेचे आहे, असे ढवळीकर यांचे वकील कार्लुस फेरेरा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा