अंजुणे धरणात मुबलक पाणी

७९.१५ मीटर जलसाठा उपलब्ध; संपूर्ण उन्हाळ्यात चिंता नाही


22nd April 2021, 06:52 am
अंजुणे धरणात मुबलक पाणी

नगरगाव : सत्तरी तालुक्यातील अंजुणे धरणात सध्या ७९.१५ मीटर एवढा मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. उन्हाळा संपेपर्यंत पिण्यासाठी आणि शेतीसाठी इतका साठा पुरेसा असल्याने नागरिकांनी चिंता करण्याची गरज नाही, असा दिलासा धरण अधिकारी रामा गावस यांनी दिली.
अंजुणे धरणाचे पाणी लोकांना पिण्यासाठी तसेच शेती, बागायतींना सिंचनासाठी पुरविले जाते. त्यामुळे हे धरण वरदान ठरत आले आहे. सध्या अंजुणे धरणात मुबलक असा पाणी आहे. धरणाचे पाणी सत्तरी तालुक्यातील केरी, मोर्ले, सालेली, शिरोली, घोटेली, केरी केळावडे या गावांबरोबरच डिचोली तालुक्यालाही पुरवले जाते आहे. डिचोलीतील कुडचिरे, कुळण अशा अनेक गावांना धरणाचा फायदा होत आहे. बागायती, शेतीच्या सिंचनासाठी शिरोली, घोटेली, केळावडे, रावण, केरी, मोर्ले, मोर्ले वसाहत, पर्ये या भागांतून ते साखळी भागात कुडचिरे, कुळण गावांपर्यंत कॅनलच्या माध्यमातून सिंचनासाठी पुरवले जात जाते. तसेच जलवाहिनीद्वारे लोकांना पिण्यासाठी याच धरणातून पाणी पुरवले जाते आहे.
अंजुणे धरणाला ३५ वर्षे होऊन गेली आहेत. धरण बांधतेवेळी तेथील भागातील लोकांचे सत्तरीत अन्य ठिकाणी स्थलांतरित केले होते. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले व आकर्षक अशा डोंगर टेकड्यांनी वेढलेले अंजुणे धरण हे मुख्य पाण्याचे साधन आहे. केरीतून चोर्लामार्गे बेळागावला जाताना वाटेतच रस्त्यालगच अंजुणे धरणाचा आस्वाद घेता येतो. या धरणाच्या पाण्याचा वापर वायंगणी शेती, ऊसाची शेती, गावठी भाज्यांच्या उत्पादनासाठी बागायती पिकांसाठी केला जातो. चोवीस तास जलस्रोत खात्याचे कर्मचारी, अधिकारी धरणावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत. जलाशय विस्तार बराच मोठा असून सध्या पाण्याचा मोठा उपलब्ध असल्याने चिंता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन कॅनल्सच्या माध्यमातून धरणाच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तसेच केरी पोडोशे येथे जलशुद्धीकरण प्रकल्पालाही धरणातून पाणी पुरवले जात आहे. अंजुणे धरण राज्यातील मोठे धरण म्हणून परिचित आहे. विशेष करून सत्तरी तसेच शेजारील साखळी भागात वाळवंटी येथे पाण्याचा लाभ होतो आहे.

हेही वाचा