Goan Varta News Ad

मडगावचे राजकारण आणि काँग्रेस

फातोर्ड्यात आवाज उठलाच आहे, त्यामुळे अन्यत्र तसे काही होणार नाही याची खात्री कोण देऊ शकेल? राज्य पातळीवर किती काँग्रेस नेते तथा कार्यकर्ते गोवा फॉरवर्डशी सहकार्य करायला तयार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Story: अग्रलेख |
13th April 2021, 01:11 Hrs
मडगावचे राजकारण आणि काँग्रेस

मडगाव पालिका निवडणुकीमुळे पुन्हा एकदा काँग्रेसमधील दुफळी अधिक रुंदावली आहे, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे. तेथील राजकीय घडामोडींचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होण्याची शक्यता वाढली आहे. यामागचे कारण समजून घेतले तर स्थिती अधिक स्पष्ट होते. दिगंबर कामत, रेजिनाल्ड लॉरेन्स हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मानले जातात. अन्य आमदारांसोबत काँग्रेस सोडून गेलेले तत्कालीन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यानंतर दक्षिण गोव्यात ज्या काही मोजक्या नेत्यांनी काँग्रेसशी निष्ठा कायम ठेवली आणि त्या पक्षाचे अस्तित्व टिकवले, त्यात कामत आणि रेजिनाल्ड हे नेते आहेत. आज हे नेते गोवा फॉरवर्डशी जागावाटप करून पालिका निवडणूक लढवत आहेत. विरोधकांची एकजूट असावी असे मानणारा एक गट काँग्रेसमध्ये आहे, त्यात या दोन नेत्यांचा समावेश होतो. मात्र त्याचवेळी गोवा फॉरवर्ड हा पक्ष केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) चा घटक आहे, त्यामुळे त्या पक्षापासून अंतर ठेवा असा आग्रह धरणारा दुसरा गट काँग्रेस पक्षात आहे. या गटाच्या म्हणण्यानुसार, गोवा फॉरवर्डने काँग्रेसला साथ न देता भाजपशी संधान साधून सत्तेत या पक्षाचे नेते सामील झाले. त्यामुळे तो भाजपचा सहकारी पक्ष ठरतो, असा युक्तिवाद केला जातो. दुसऱ्या गटाचे म्हणणे जनतेला अधिक पटणारे आहे. असे असेल तर मग भाजप विरोधात लढण्यासाठी एकत्रित येण्याचे जे प्रयत्न चालले आहेत, त्याचे काय? गोवा फॉरवर्ड एनडीएतून बाहेर पडण्याबाबत काहीही प्रतिक्रिया देत नाही, याचा अर्थ काय लावायचा असा प्रश्न या गटाला पडणे साहजिक आहे. अशा स्थितीत काँग्रेसने गोवा फॉरवर्डचे सहकार्य का घ्यावे या मुद्यावर काँग्रेसचे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत. अगदी फातोर्डा काँग्रेस गटाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत उघडपणे आवाज उठवला आहे. याच कारणास्तव कामत आणि रेजिनाल्ड यांनी घेतलेली भूमिका सर्वमान्य नाही, असेच दिसते आहे.
भाजपला सामोरे जायचे असेल तर विरोधकांनी एकत्र यायला हवे, असे मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या तरी या प्रयत्नांना मडगाव पालिका निवडणुकीत वरवर यश आल्याचे दिसते आहे, पण मग ज्यांचा आक्षेप आहे, त्यांना कसे समजावणार? त्यांना बाजूला ठेवून दोन्ही नेते पुढे गेले तर काँग्रेस पक्षात नवी फूट पडण्याची शक्यता वाढली आहे. तसे पाहाता, या पक्षात राहिलेल्या किती नेत्यांना पक्षाबद्दल कळकळ आहे, हा प्रश्न आहेच. त्यातही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना डावलून पुढे गेल्यास या पक्षाला कोण सावरू शकेल? फातोर्ड्यात आवाज उठलाच आहे, त्यामुळे अन्यत्र तसे काही होणार नाही याची खात्री कोण देऊ शकेल? राज्य पातळीवर किती काँग्रेस नेते तथा कार्यकर्ते गोवा फॉरवर्डशी सहकार्य करायला तयार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तशी काही चर्चा पक्ष पातळीवर झालेली ऐकीवात नाही. मग मडगावची युती ही केवळ त्या पालिकेपुरतीच मानायची का? तसे असेल तर याबाबतीत काँग्रेस कार्यकारिणीचे मत स्पष्ट व्हायला हवे. ट्रोजन डिमेलोसारख्या काँग्रेस नेत्यांनी गोवा फॉरवर्डला विरोध करण्यासाठी फातोर्डा गट काँग्रेससोबत पत्रकार परिषदेत उपस्थित राहून आपल्याच पक्षाच्या दोन आमदारांवर टीका केली. दोन्ही आमदार भविष्यात काँग्रेससोबत नसतील असा त्यांचा अंदाज आहे. एकाच पक्षातील नेते जर वेगवेगळी भूमिका घेत असतील, एकमेकांवर अविश्वास दाखवत असतील तर जनता काँग्रेसला का जवळ करील हा कळीचा मुद्दा आहे. याबाबत स्पष्टीकरण देणारा नेता सध्या तरी या पक्षात दिसत नाही. पक्ष संपविण्यासाठीच नेते एकमेकांवर आरोप तर करीत नाहीत ना, असे वाटण्याजोगी स्थिती काँग्रेस नेत्यांनी तयार केली आहे.
रवी नाईक, प्रतापसिंग राणे या माजी मुख्यमंत्र्यांची मुले भाजपमध्ये गेली आहेत. हे नेते पक्षासाठी काहीही न करता आपल्या मतदारसंघांपुरते मर्यादित राहिले आहे. रवी नाईक तर प्रदेशाध्यक्षांवर निष्क्रियतेचा आरोप करीत असल्याचे गेल्या महिन्यात जनतेने पाहिले. काँग्रेस पक्षात पाच आमदार एकत्र येऊ शकत नसतील, एकच भूमिका घेऊ शकत नसतील, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेश समिती सक्षम नसेल तर जनतेने तरी अशा पक्षावर आणि नेत्यांवर का म्हणून विश्वास ठेवावा? केंद्रीय पातळीवर शैथिल्य अशा प्रकारे या पक्षावर परिणाम करीत आहे. पक्षाचे प्रभारी कुठे आहेत, काय करतात याबद्दलही या पक्षाचे निष्ठावान मतदार संभ्रमात आहेत. विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची क्षमता या पक्षात शिल्लक आहे का, हाच खरा प्रश्न आहे.