Goan Varta News Ad

कार्व्हालोंना ओबीसी दाखला उपजिल्हाधिकार्‍यांनी नाकारला

पालिका निवडणूक कार्व्हालो यांना लढवता येणार नसल्याचे स्पष्ट

|
09th April 2021, 12:16 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : बार्देशचे उपजिल्हाधिकारी कपिल फडते यांनी माजी नगरसेवक फ्रेन्की उर्फ फ्रान्सिस्को कार्व्हालो यांचा ओबीसी दाखल्यासाठीचा अर्ज फेटाळला. त्यामुळे पालिका निवडणूक कार्व्हालो यांना लढवता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबतचा आदेश उपजिल्हाधिकारी फडते यांनी गुरुवारी जारी केला. प्रभाग सात हा ओबीसी राखीव झाल्याने या प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी फ्रेन्की कार्व्हालो यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात ओबीसी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. या अर्जास तारक आरोलकर व भानुदास गडेकर यांनी हरकत घेतली होती. त्याआधारे उपजिल्हाधिकाऱ्यांनी पुरावे व तलाठींच्या अहवालानुसार कार्व्हालो यांचा अर्ज फेटाळून ओबीसी दाखला नाकारणारा आदेश दिला आहे.
फ्रेन्की कार्व्हालो यांनी पालिकेकडे नाव बदलण्यासाठी अर्ज केला होता. यात फ्रान्सिस थॉमस कार्व्हालो ऐवजी फ्रान्सिस्को थॉमस कार्व्हालो असा बदल करावा, असे त्यांनी म्हटले होते. पण अर्जदाराच्या जन्म दाखल्यात वडिलांच्या नावाचा उल्लेख नव्हता, असे पालिकेने म्हटले होते. ख्रिश्चन कुटुंबाने त्यांना दत्तक किंवा ख्रिश्चन कुटुंबाचे नाव त्यांनी स्वीकारले आहे, हे ते सिद्ध होत नाही. कुटुंबियाच्या कुठल्याच सदस्याला ओबीसी प्रमाणपत्र दिलेले नाही. उत्तर गोवा पारंपरिक मच्छीमार संघटनचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे या संघटनेचे समाज प्रमाणपत्र ग्राह्य धरता येणार नाही, असे उपजिल्हाधिकार्‍यांनी आदेशात नमूद केले आहे.