Goan Varta News Ad

पक्षासाठी केडरबाहेरीलही हवेत

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे; शिस्त मोडल्यास कारवाईचा इशारा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd March 2021, 11:22 Hrs
पक्षासाठी केडरबाहेरीलही हवेत

मडगाव : पणजी महापालिकेसह सहा पालिकांची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. या निवडणुकीत कॅडरबाहेरील लोकांना स्थान दिले जात असल्याने पक्षाचे मूळ कार्यकर्ते नाराज होऊ शकतात. पण पक्ष वाढीसाठी ते गरजेचे असते. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढली जाईल. तरीही एखाद्याने पक्षाची शिस्त मोडल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिला.
दक्षिण गोवा भाजप कार्यालयात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तानावडे बोलत होते. महापालिका आणि पंचायत निवडणुकांमध्ये कॅडरबाहेरील लोकांना स्थान दिले जात असल्याने सध्या अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारले असता, केवळ कॅडरला सोबत घेऊन पक्षाचा विस्तार होऊ शकत नाही. कॅडरसोबत बाहेरून येणारेही तितकेच महत्त्वाचे आहेत. सर्वांना सोबत घेऊन कार्य केले जाईल, असे तानावडे यांनी स्पष्ट केले.
या निवडणुका पक्षीय पातळीवर होत नसल्याने काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, असे कार्यकर्त्यांना वाटू शकते. तसे बोलले म्हणून व्यक्ती वाईट असते, असेही नाही. पक्ष नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहे. ही नाराजी दूर होईल. काहींना तिकीट न मिळाल्याने तत्काळ प्रतिक्रिया येतात. मात्र, पुढील दोन दिवसांत हा प्रश्न सोडवला जाईल, असेही तानावडे म्हणाले. पणजी महापालिकेतील जुन्या व नव्या भाजप कार्यकर्त्यांतील वादाविषयी बोलताना तानावडे म्हणाले, काहीजण एखाद्या घटनेवर त्वरित प्रतिक्रिया देतात. भाजपमध्ये कुटुंबाप्रमाणे काम केले जाते. कुटुंबात काहीना काही वाद झाल्यास हा वाद पुढील काही दिवसांत सोडवला जाईल, असे तानावडे यांनी सांगितले.
मंत्री मॉविन गुदिन्हो व आमदार कार्लुस आल्मेदा यांनी मंत्री मिलिंद नाईक यांच्याविरोधात विधाने केली आहेत. पण, हाताची पाचही बोटे सारखी नसतात. एखादी गोष्ट मनासारखी न झाल्यास त्यातून वैयक्तिक प्रतिक्रिया येते. त्यात गंभीर काही नाही. पक्ष जेव्हा मोठा होत असतो, त्यावेळी अशा गोष्टी घडत असतात. त्या सगळ्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे नाही, असेही तानावडे म्हणाले.
नावेलीसाठी सत्यविजय नाईक
नावेली जिल्हा पंचायत निवडणुकासाठी भाजपचा उमेदवार म्हणून तेथील स्थानिक नेते सत्यविजय नाईक यांचे नाव निश्चित झाले आहे, अशी माहिती सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

भाजपने आम्हाला दुखावले : मिनीन
पणजी : पणजी महानगरपालिका (मनपा) निवडणुकीसाठी आपण उमेदवारी अर्ज सादर करणार नाही. पण आपले चार उमेदवार असतील.​ निवडणुकीत आपण भाजपसोबत नाही. पक्षाने दुखावल्यामुळेच आपण हा निर्णय घेतला असल्याचे भाजप नगरसेवक मिनीन डिक्रूज यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
आपण भाजप नगरसेवक आहे, पण गेल्या दीड वर्षांपासून पक्षाने आमची कधी बैठकही घेतली नाही. किंबहुना आम्हाला सदस्यही करून घेतले नाही. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पक्षातील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आपल्यासह अनेकांना पक्षाने दुखावले आहे. दुखावलेले इतर काही नेते घाबरून बोलत नाहीत. पण आपण कोणालाही घाबरत नाही. स्पष्टपणे बोलतो, असेही डिक्रूज यांनी नमूद केले.