रिंगमध्ये परतण्यासाठी बॉक्सर विजेंदर सिंग सज्ज


03rd March 2021, 10:55 pm

पणजी : भारताला २००८ मध्ये ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक मिळवून देणारा बॉक्सर विजेंदर सिंग रिंगमध्ये परतण्यासाठी सज्ज झाला आहे. विजेंदरने काही दिवसांपूर्वीच आपण कमबॅक करत असल्याची माहिती दिली होती. त्याचा हा सामना त्याच्या चाहत्यांसाठी खास असणार आहे. विजेंदर येत्या १९ मार्च रोजी गोव्यात एका कॅसिनो जहाजाच्या डेकवर सामना खेळणार आहे. यामुळे हा सामना त्याच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. दरम्यान विजेंदर या रिंगमध्ये कोणासोबत दोन हात करणार, हे अद्याप ठरलेले नाही.
व्यावसायिक बॉक्सर असलेल्या विजेंदरचा हा एकूण १३ वा तर भारतातील ५ वा सामना असणार आहे. विजेंदरने नोव्हेंबर २०१९ मध्ये पूर्व राष्ट्रमंडळ चॅम्पियन राहिलेल्या चार्ल्स अदामुचा दुबईत पराभव करून सलग १२ वा विजय साजरा केला होता. त्यानंतर विजेंदर बॉक्सिंगपासून दूर होता.
दरम्यान, या सामन्याचे आयोजन हे जहाजाच्या डेकवर करण्यात आले आहे. गोव्यातील पणजीमधील मांडवी नदीच्या किनाऱ्यावर हे जहाज आहे. हा सामना नेहमीच्या सामन्यांपेक्षा हटके असणार आहे. त्यामुळे विजेंदरच्या चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. हा सामना जहाजाच्या डेकवर होत असल्याने मी खेळण्यासाठी फार उत्सुक आहे, अशी उत्सफूर्त प्रतिक्रिया विजेंदरने दिली. याआधी अशा प्रकारे कधी सामना झाला नव्हता. त्यामुळे मी रिंगमध्ये परतण्यासाठी सज्ज आहे. मी या सामन्यासाठी जोरदार सराव करतोय, असेही विजेंदर म्हणाला. त्यामुळे विजेंदरकडून त्याच्या समर्थकांना मोठ्या अपेक्षा असणार आहेत.
गोव्यात खेळण्यासाठी उत्सुक
मी गोव्यात खेळण्यासाठी फार उत्सुक आहे. गोव्यातील जनता ही क्रीडाप्रेमी आहे. गोव्यात फुटबॉलची पण फार क्रेझ आहे. त्यासोबतच अनेकांना बॉक्सिंगचेही वेड आहे. गोव्यात खेळाडूंना सन्मानजनक वागणूक दिली जाते, असेही विजेंदरने स्पष्ट केले.
फोटो : विजेंदर