समाज पोखरणारे धार्मिक ध्रुवीकरण

खडे बोल

Story: दीपक लाड |
31st January 2021, 05:29 pm
समाज पोखरणारे धार्मिक ध्रुवीकरण

“आता घरात ध्रुवीकरण सुरू झालंय. आई म्हणाली- बाळा, भारतात हिंदू धोक्यात आहेत. मी म्हणालो, आई तसं नाहीये. भारतात बंगाल वाघ धोक्यात आहेत. त्यांची संख्या जेमतेम दीड हजाराच्या आसपास उरलीय. आपण शंभर कोटी हिंदू देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ऐंशी टक्के, तर आपण आपल्याच देशात धोक्यात कसे काय असणार? भारत सोडून हिंदूचा जगात दुसरा देश आहे तरी कोणता? आई म्हणाली, मला तसा मॅसेज आलाय. मी तो लांबलचक मॅसेज वाचला आणि मीच आईला म्हणालो, आई खरोखर भारतात हिंदू धोक्यात आहेत. मला रिस्क घ्यायची नाहीये. मी निघालो मुस्लिम व्हायला. मॅसेजमध्ये लिहिले होते की २०२९ नंतर देशाचा एकही पंतप्रधान हिंदू नसेल.”

ज्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने अवमानना खटला चालवायचे ठरवलेय त्या स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या दीड वर्षांपूर्वीच्या एका विनोदी कथनातला हा भाग आहे. 

देशात ध्रुवीकरण शिगेला पोहोचलेय. चपलांवर ‘ठाकूर’ असा शिक्का दिसला की भावना दुखवल्या म्हणून मुस्लिम विक्रेत्याला बदडलाच समजा. तो म्हणतो मी नाही त्या बनवत. घाऊक बाजारातून आणून विकतो. मुस्लिम फटाके विकणाऱ्याच्या दुकानात फटाक्यांच्या वेष्ठनावर गणेश दिसला की भावना दुखावल्या म्हणून त्याच्याशी हुज्जत घातली जाते. तो म्हणतो त्याने फटाके दक्षिणेतल्या शिवकाशीतून हिंदू व्यापाऱ्यांकडून मागवलेत. धार्मिक उन्मादाने तार्किक विचार करण्याची कुवत कुंठीत झाल्याने कोणी ऐकून घ्यायला तयार नसतो. हिंदुत्ववादी पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात हिंदुत्ववादी झालेली पोलिस यंत्रणा उजव्या गटांशी सहकार्य करते किंवा त्यांच्या कारनाम्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करते.

अल्लाह के नाम पे दे दो, म्हणण्याची आज भिकाऱ्याची हिंमत होत नाही. नाही तर कोणी हिंदू पाकिस्तानात जाऊन भीक मागण्याचा सल्ला द्यायचा. जय श्रीराम म्हणत भीक मागण्यात फायदा असला तरी मुस्लिमांसाठी रिस्की आहे. संशय आल्यास हिंदू लोक भिकाऱ्याकडे त्याचे आधार कार्ड मागतील. दिल्लीतल्या हिंदूबहूल वस्तीत मुस्लिम भाजीवाल्यांना मज्जाव आहे. हिंदू देवाचे फोटो हातगाड्यावर ठेवून भाजी विकणाऱ्या मुस्लिमाला पकडल्यावर आता हिंदू या बाबतीत अधिक सतर्क होत भाजीवाल्यांना आधार कार्ड दाखवायला लावत आहेत.  

आरोग्याला कितीही गुणकारी असले तरी केवळ उर्दू नावामुळे रूह आफजा, लुकमाने हयात, जिंदा तिलिस्मात सारख्या ब्रांडना आता हिंदू शिवत नाहीत.    

पंतप्रधान देशात दौरे करत असलेल्या भागांतला सांस्कृतिक पेहराव, पगड्या परिधान करत असले तरी मुस्लिम कार्यक्रमात ‘त्यांची’ टोपी घालणे त्यांना मान्य नाही. हिंदूंच्या भावना दुखावल्या जाण्याची चिंता असते. आपापल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य संविधानाने देशाच्या नागरिकांना दिलेय. मात्र, धर्मनिरपेक्ष देशाच्या पंतप्रधानांनी सार्वजनिक जागेत जाहीरपणे हवन, पूजा-अर्चा करणे योग्य नव्हे. देशाच्या राष्ट्रपतींनी मंदिर बांधायला पाच लाखांची देणगी दिली असे म्हणण्याऐवजी रामनाथ कोविंदजीनी ती दिली म्हणणे योग्य ठरते. अन्यथा देशाचे राष्ट्रपती या नात्याने मशिद बांधणीसाठीही पाच लाखांची देणगी त्यांनी देणे बाध्य ठरते. राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांना पुनर्संचयित सोमनाथ मंदिरात पूजा-पाठांत सहभागी न होण्याचा सल्ला पंडित नेहरूंनी दिला होता तो याच कारणास्तव. आदित्यनाथ योगी म्हणतात, मशिद पायाभरणी कार्यक्रमात त्यांना सहभागी होणे शक्य नाही. केवळ हिंदूंचे मुख्यमंत्री अशा प्रकारची तरतूद आपल्या संविधानात नाही. संविधानिक पद सांभाळायचे असेल तर धर्मपीठाचे महंतपण सोडावे लागेल ही अट त्यांना पक्षाने आधी घालायला हवी होती. पण, सत्तेसाठी हपापलेल्या पक्षांना जिंकणारे उमेदवार हवे असतात. मग योगी, भोगी, चोर, गुंड, खूनी, बलात्कारी कोणीही चालतो.  

न्यायप्रणालीत हिंदुत्वाचा शिरकाव हे आपल्या लोकशाही प्रणालीसाठी कदापी चांगले संकेत नाहीत. मुनव्वर फारूकी या काॅमेडियनला इंदुरात त्याने कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वीच तिथल्या आमदार पुत्राच्या केवळ सांगण्यावरून पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरूद्ध पुरावे नसल्याची बाब पोलिस जाहीरपणे कबुल करतात. तो भविष्यात  हिंदुंच्या भावना दुखावेल या संशयाने ताब्यात घेऊन ‘दोन समाजांत तेढ वाढवणे’ हे कलम प्रामुख्याने लावत त्याला तुरूंगात टाकलेय. कनिष्ठ न्यायालयाने त्याचा जामिनासाठीचा अर्ज दोनदा फेटाळला. उच्च न्यायालयात कारवाईच्या दरम्यान न्यायाधीश रोहित आर्य त्याला विचारत होते. “तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांचा अयोग्य फायदा मुळात घेताच कशासाठी? तुमची मानसिकता अशी चुकीची कशी काय? धंद्यासाठी तुम्ही का म्हणून असले उद्योग करता?” कायद्याची पुस्तके पालथी घालत असताना, कायद्याचा कीस पाडत असताना विदूषक आणि विनोद काय असतो, या ज्ञानाला न्यायाधीश मुकलेले दिसले. बिरबल, तेनाली रामाबद्दल ते अनभिज्ञ दिसले.   

ज्यावेळी वकिलांनी न्यायाधीशांच्या नजरेस आणले की मुनव्वरने हिंदु दैवते राम-सीतेची पूर्वी थट्टा केली होती, तेव्हा न्यायाधीश रोहित आर्य आवेशात येत म्हणाले होते- ‘असल्या लोकानां’ सोडता कामा नये. अपेक्षेनुसार मुनव्वरला त्यांनी जामीन नाकारला. हा काही खून- बलात्काराचा गुन्हा नव्हता. आरोपीची मुक्तता झाल्यावर आपले वजन वापरून पुरावे मिटवणार किंवा परदेशात पळून जाणार याची शक्यता नव्हती. असल्या बाबतीत जामीन देणे हा नियम ठरतो आणि तुरूंगवास अपवाद. 

विरोधाभास असा की हा प्रकार भारत संविधानिक गणराज्य बनला त्याच्या ७२ व्या वर्धापन दिन साजरीकरणाच्या आसपास घडला. रोहित आर्यनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचूड यांचा तो अर्णबला जामीन देणारा क्रांतिकारक निर्णय वाचला नसेल असे होणे नाही– “ मी आज जर का या खटल्यात दखल दिली नाही, तर आपण सगळे विनाशाच्या वाटेवर जाणार आहोत. जर माझ्याबद्दल बोलायचं झाले तर मी मला न आवडणारा चॅनल बघणार नाही. तुमची विचारसरणी वेगळी असू शकते, पण संविधानिक न्यायालयांनी व्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण करायला हवे.” आत्महत्येस उद्युक्त केले असल्याच्या गंभीर आरोपाखाली गजाआड असलेल्या अर्णब गोस्वामीला जामीन मिळवून देणारा निवाडा देत धडपडताना चंद्रचूड यांनी संविधानदत्त व्यक्तिस्वातंत्र्याची महती गायली होती. मुनव्वरवर लावलेला ‘भविष्यात विनोद करणार’ हा आरोप अर्णबच्या आत्महत्येस चिथावणी देणे या आरोपाहून गंभीर वाटणे हा न्यायाधीशाने न्यायप्रणालीवर केलेला विनोद ठरतो. चंद्रचूडांच्या धर्तीवर, त्याचे विनोद आवडत नसल्यास ते ऐकू नका असा सल्ला मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी का बरे दिला नाही?

धार्मिक अथवा इतर कसल्याही भावना दुखवणे हा विनोदी कलाकारांचा उद्देश नसतो. धर्म, समाजाशी निगडीत काही वृत्तींवर कटाक्ष करून, हशा पिकवून त्यातून काही कमाई झाली तर झाली, एवढाच त्यामागचा सिमित उद्देश असतो.  

तरूणांत अमित शर्मा, अमित टंडन, गौरव गुप्ता, राहूल सुब्रमण्यम आणि तरूणींत ऐश्वर्या मोहनराज, रमया रामप्रिया, सेजल भट, अदिती मित्तल, अलका रॉय, सायनी राज बऱ्यातले विनोद करतात. प्रेगा न्यूज, मासिक पाळी, पहिला संभोग, डेटींग, चुंबन, ब्रेसियर शॉपिंग या विषयांवर तरूणीही बिनधास्तपणे विनोदी कथन करताना दिसतात. उरूज अशफाक ही मुस्लिम तरूणी स्वधर्मियांची खेचते. याच तबक्यातला मुनव्वर फारूकी हा एक. 

२००२ च्या गुजरात दंग्यात त्याचे जुनागढ गावातले घर जाळले गेले होते. कुटुंबाने मुंबईच्या डोंगरी भागात स्थलांतर केल्यावर त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. तरीही तो जुनागढ, मुस्लिम आणि डोंगरी वसाहतीवर विनोद करत असतो. 

एक नमुना- जुनागढमध्ये नवाबाचे वंशज रहातात. सगळे एक नंबरचे आळशी आणि झोपाळू. आपले कामधंदे बंद करून रोज दुपारी न चुकता झोपणारे. कदाचित त्यामुळे घरात पोरांची संख्या जास्त असावी. राज्यात दंगे भडकले तरी येथे कोणीही मेला नाही, यालाही कारण त्यांचा आळस असावा. दंगे भडकल्यावर राज्यात कर्फ्यू लागल्याने सगळे घराच्या चार भिंतीत दिवसभर कोंडून होते. मुस्लिमांच्या कुटुंबांत आठ-आठ पोरे आणि कॅरम बोर्ड एक. त्यामुळे चार पोरांची नेहमीची रडारड असायची. बाप क्रिकेट बॅट आनी स्टंप घेऊन गेले म्हणून काही पोरे रडायची. 

दुसरा नमुना- आमच्या धर्मात मुल्ला बनण्यासाठी बऱ्याच दिव्यातून जावे लागते. पण, मोदींच्या काळांत ते सोपे झालेय. मोदी– शाहच्या विरोधांत एक ट्वीट केला की सगळे त्यांचे कार्यकर्ते काही सेकंदात तुम्हाला मुल्ला म्हणून संबोधायला सुरुवात करतात. 

धार्मिक भावना खरोखर दुखावल्या जातात त्या दळभद्री राजकारण्यांच्या कृतीतून. जय श्रीरामाच्या गजरात सहारनपूरमध्ये राम मंदिराच्या परिसरात असलेली मुतारी तोडणे किंवा त्या नामाच्या उद्घोषात हिंसा, जाळपोळ करत उच्छाद मांडणे मुळात आपल्या दैवताचा उपमर्द केल्यासारखे नाही का होत? नेताजींची १२५ वी जयंती साजरी करताना श्रीरामांचा जयजयकार करणे नेताजींचा अपमान मानावा की श्रीरामांचा? या सगळ्या कारणांमुळे माझ्या धार्मिक भावना दुखवल्या गेल्यात अशी तक्रार पोलिसांत केल्यास ते उलट विचारतील- कसं शक्य आहे? ज्यांच्या विरूद्ध तुम्ही तक्रार दाखल करायला निघालात त्यांच्याकडे तर खुद्द श्रीरामांचा पेटंट आहे. भावना कधी, कशा आणि किती प्रमाणात दुखावल्या गेल्या हे ठरवणारे ते आहेत. तुम्ही ठरवणारे कोण? ध्रुवीकरणामुळे मने कलुषित होत दुभंगलेल्या समाजामुळे देशाचा आर्थिक विकास खुंटतो.   

“देशाला आज एकतेची गरज आहे, एकसारखे दिसणाऱ्यांची नव्हे,” हे अपर्णा सेनचे वक्तव्य मार्मिक वाटावे.

(लेखक विविध विषयांचे व्यासंगी आहेत.)