Goan Varta News Ad

राज्यपालांंच्या अभिभाषणाने आजपासून अधिवेशन सुरू

सरकारला कोंडीत पकडण्याची विरोधकांची व्यूहरचना

|
24th January 2021, 11:48 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : राज्यपाल भगतसिंंग कोश्यारी यांच्या अभिभाषणाने विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. लोकायुक्त कायदा दुरुस्ती, रेल्वे दुपदरीकरण, तमनार वीज प्रकल्प, आयआयटी प्रकल्प आदी विषयांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची व्यूहरचना विरोधकांनी आखली आहे.
राज्यपाल भगतसिंंग कोश्यारी हे सोमवारी प्रथमच विधानसभेत अभिभाषण करतील. त्यांनी गोव्याच्या राज्यपालपदाचा ताबा स्वीकारल्यानंतर प्रथमच अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फक्त राज्यपालांंचे अभिभाषणच होईल. मंंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी आहे. प्रत्यक्ष कामकाज फक्त तीन दिवस सुरू राहील. विविध प्रश्नांवरून सरकारला घेरण्याचे विरोधकांंचे प्रयत्न रहातील. तरीही वेळेच्या मर्यादेमुळे ते कितपत यशस्वी होतात याबाबत साशंकता आहे. अधिवेशनात तारांंकित आणि अतारांंकित मिळून ७५१ प्रश्न आले आहेत. अधिवेशनाचा कालावधी कमी आहे. त्यामुळे दिवसाला ५ लक्षवेधी सूचना घेण्याची मागणी विरोधी पक्ष नेते दिगंंबर कामत यांनी केली होती. ती अमान्य करण्यात आली. प्रतिदिन ३ लक्षवेधी सूचना घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत झाला आहे. जुलै महिन्यात एक दिवसाचे अधिवेशन झाले होते. त्यानंतर ४ दिवसांचे हे हिवाळी अधिवेशन होत आहे.
मागील अधिवेशनात काँग्रेस, मगो आणि गोवा फॉरवर्ड हे विरोधी पक्ष एकत्र आले होते. या अधिवेशनाआधी विरोधी आमदारांची बैठक झालेली नाही. तरीही विरोधक एकत्र येऊन सरकारचा गैरकारभार चव्हाट्यावर आणतील.
_ आमदार विजय सरदेसाई, अध्यक्ष, गोवा फॉरवर्ड