Goan Varta News Ad

करोना लसीचे दोन बॉक्स राज्यात दाखल

शनिवारपासून आठ केंद्रांत लसीकरण; मुख्यमंत्र्यांची माहिती

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
14th January 2021, 12:22 Hrs
करोना लसीचे दोन बॉक्स राज्यात दाखल

पणजी : अपेक्षेनुसार बुधवारी पहाटे गोव्यात करोना लसींचे दोन बॉक्स विमानाने दाखल झाले. राज्याला पहिल्या टप्प्यात २३,५०० डोस मिळाले आहेत. येत्या शनिवारपासून राज्यातील आठ केंद्रांत करोना लसीकरण सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
शनिवार, १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना करोना लस देण्यात येणार आहे. ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांना वेळापत्रकानुसार लस देण्यात येईल. इतर नागरिकांनी लसीबाबत गडबड करू नये. वेळापत्रक तयार करून आरोग्य खात्यामार्फत सर्वांनाच लस दिली जाईल. बुधवारी पहाटे दहा डोसचा एक बॉक्स असे २,३०० बॉक्स राज्यात दाखल झाले आहेत. टप्प्याटप्प्याने राज्यात लस दाखल होईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.
दरम्यान, करोना लसीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांची तीन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली आहे. राज्यातील पाच सरकारी आणि तीन खासगी अशा आठ इस्पितळांत लसीकरण केले जाणार असून, भारतात तयार केलेल्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी गोव्यातील नागरिकांना देण्यात येणार आहेत. आरोग्य कर्मचारी, विविध प्रकारचे आजार असलेल्या व्यक्ती, ५० वर्षांवरील व्यक्ती आणि त्यानंतर इतर नागरिक अशा चार टप्प्यांत करोना लस देण्यात येणार आहे.
लस अनिवार्य नाही
पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी करोना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यानुसार आरोग्य खाते लसीकरणाचे नियोजन करीत असल्याची माहिती खात्याकडून देण्यात आली. करोना लस अनिवार्य नाही. लसीसाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राज्यात लसीकरण होईल, असेही खात्याने स्पष्ट केले आहे.
कोव्हॅक्सिनलाही मान्यता
पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटननंतर आता हैदराबादमधील भारत बायोटेकने आपली कोव्हॅक्सिन लसीची पहिली बॅच पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी देशातील विविध शहरांमध्ये पाठवली आहे. केंद्राने त्यांना मान्यता दिली आहे. भारत बायोटेकने दोन डोसची कोव्हॅक्सिन लस बुधवारी देशभरातील ११ शहरांमध्ये पाठवली. मात्र, एकूण किती डोस भारत बायोटेकने पाठवले आहेत, हे अद्याप कळू शकलेले नाही.