Goan Varta News Ad

पत्रांच्या दुनियेचा दूत!

अनुभूती

Story: सागर मच्छिंद्र डवरी, ९६३७० ७१४६४ |
10th January 2021, 01:09 Hrs
पत्रांच्या दुनियेचा दूत!

सध्या मी गोव्यात हरमलला नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. इथल्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून दोन वर्ष होत आहेत आता. नाताळचा सण गोव्यात खूप उत्साहात साजरा केला जातो. आठ- दहा दिवस सुट्टीही असते. याच नाताळच्या सुट्टीला आम्ही गावी आलो आणि संध्याकाळी मला एका अनोळख्या क्रमांकावरून कॉल आला. अनपेक्षित सगळं, चक्क हरमल पोस्ट ऑफिसच्या पोस्टमनकाकांचा कॉल..! माझं एक पुस्तकांचं पार्सल आलं होतं. ते आपल्याकडे पोहचलंय आणि मी ते उद्यापर्यंत तुम्हाला पोहोचवतो म्हणाले..... मी गावी आल्यामुळे ते पार्सल कॉलेजमध्ये ठेवा म्हणून सांगितले. थोडं इकडलं तिकडलं बोलणं झालं आणि आमचा कॉल संपला. पण, पोस्टमन काकांच्या अनपेक्षित कॉलमुळे मला एक प्रकारचा वेगळाच आनंद मिळून गेला. असं शब्दात नाही सांगता येणार, पण छान वाटलं.

माझी काही पत्रे, पुस्तके असं काही ना काही पोस्टाने येत राहते. कधी राखी येते तर कधी पुस्तके! या पोस्टमनकाकांना त्या सर्वांवर असलेला पत्ता खूप आवडतो. त्यांनी एकदा बोलूनही दाखवलं, रक्षाबंधनची राखी आली होती. तेव्हा ते म्हणाले, 'तुमच्या पार्सलवर जसा पत्ता असतो, तसा सध्या कुणी व्यवस्थितपणे देत नाही ओ.., मग खूप फिरावे लागते!' मग काका म्हणतात, 'कधी कधी आमच्याकडे रहातात पत्रे, लेट होतात मग. परंतु, तुमचे पत्र अगदी मला नेमक्या ठिकाणी घेऊन येतं.' येथून आमची ओळख झाली ती इथपर्यंत येऊन पोहचली की त्यांनी मला कॉल करुन माझ्या पार्सलविषयी माहिती दिली. त्यांच्याशी बोलून बरं वाटलं. 

पोस्टमन म्हटले की तो खाकी पेहाराव, डोक्यावर टोपी, सायकल, खाकी पिशवीत पत्रांचा गठ्ठा अस काहीसं चित्र डोळ्यांसमोर येते. गाडीपेक्षा सायकल बरी पडते, कारण खूप ठिकाणी थांबावे लागते. काही ठिकाणी गाडी जात नाही. त्यापेक्षा सायकल कुठंही नेता येते. उचलूनही नेता येते. अशा बऱ्याच सोपेपणामुळे सायकल पोस्टमन काकांची आवडती हे नक्की.

अगदी पूर्वीपासून पोस्टमन म्हणजे प्रत्येकाच्या सूख- दुःखाचा संदेश पाठवणारा आणि घेऊन येणारा दूत. कधी कुणाची पत्रे वाचून दाखवणे तर कुणाची पत्रे लिहून देणे. इतरांच्या पत्रातील मजकुराप्रमाणे पोस्टमनकाकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत राहतात. अशा प्रत्येक क्षणी हा माणूस त्या प्रत्येक कुटुंबाचा एक हिस्सा असतो. त्यांच्या सुखात हा माणूस हसतोही आणि दुःखात या माणसाच्या डोळ्यांत पाणी तरळून जाते.

माझ्या लहानपणीच्या आठवणी, मामा सैन्यात होता तेव्हा जम्मूवरून आंतरदेशीय पत्र यायचे. दारात पोस्टमनकाकांची सायकलची घंटी वाजायची आणि मी धावतच बाहेर जायचो. 'खूप लांबून मामाचं पत्र आलंय, हे घे!' म्हणत ते पत्र द्यायचे. मग पाणी प्यायचे आणि सायकल उचलून दिशा बदलायचे आणि घंटी वाजवत पत्र पोहोचवायला सायकल पुढं निघून जायची. संध्याकाळी पप्पा पत्र वाचून दाखवायचे, भारी वाटायचे. त्या शब्दांमध्ये मामा दिसायचा... अगदी त्याच्या वर्दी मधला, ऐटीत उभा असलेला! हे सगळं घडायचं ते पोस्टमन काकांमुळे..!

आता तशी पत्र येत नाहीत. टेलिफोन, मोबाईल, इंटरनेट, सोशल नेटवर्किंग साईट अशा बऱ्याच गोष्टी आल्या आणि पत्रातल्या शब्दांमधला जिव्हाळा हरवत गेला. या आजूबाजूच्या दुनियेत लोक कनेक्टेड आहेत, पण जोडलेली मात्र दिसत नाहीत. आता तर फक्त कार्यालयीन पत्रांसाठीच पोस्ट सुरू राहते. एखादे पत्र पुन्हा पुन्हा वाचण्यात मिळणारा आनंद तास- तासभर फोनवर बोलण्यात विरून गेला. नसलेले भावही आज स्मायलिझ पोस्ट करुन दुसऱ्यांवर थोपवले जातात. खोटे भाव दाखवण्यात सगळेच हरवून बसलेत.

सर्वांनीच एखादे पत्र आपल्या माणसांना लिहून बघावे. त्या मोजक्या शब्दात आभाळाएवढा आनंद सामावून जाईल. तो तुम्हालाही मिळेल आणि त्यांनाही. दारात सायकलची घंटी वाजेल आणि पोस्टमनकाका सांगतील मित्राचे, मैत्रिणीचे, कुण्या सग्यासोयऱ्याचे पत्र आलेय म्हणून. कारण आजकाल अशी पत्रं येणं कमी झालं आणि पोस्टमनकाकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलणंही कमी झालं. 

पोस्टमनकाकांच्या निमित्ताने असं बरंच काही आठवलं आणि सूचलंही... मग लिहिलं! म्हणून मीही आता जाणीवपूर्वक पत्र लिहिणार. तुम्हीही लिहा! तुमच्या सग्यासोयऱ्यांना आता एखादे पत्र पाठवून तुमची आठवण करून द्या. मग कदाचित तुम्हालाही एखादे पत्र येईल!

(लेखक प्राध्यापक आहेत.)