दिव्यांगांसाठी ४ डिसेंबरपासून शिबिरे : मुख्यमंत्री

ठिकाणे निश्चित; दोन महिन्यांत आवश्यक साहित्य पुरवण्याची हमी


23rd November 2020, 11:09 pm
दिव्यांगांसाठी ४ डिसेंबरपासून शिबिरे : मुख्यमंत्री

फोटो : पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. (नारायण पिसुर्लेकर)

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : ‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’ योजनेअंतर्गत ४ डिसेंबरपासून राज्यातील बाराही तालुक्यांत दिव्यांग व्यक्तींसाठी शिबिरे आयोजित केली जातील. समाज कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने राज्यातील समाज कल्याण खाते शिबिरांचे आयोजन करेल. शिबिरांत डॉक्टरांसह जिल्हाधिकारी, मामलेदार तसेच इतर सरकारी अधिकारी उपस्थित राहतील. योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखले दिव्यांगांना दिले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

समाजकल्याण खात्याच्या कार्यालयात सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ४ डिसेंबरपासून सुरू होणार्‍या शिबिरांत दिव्यांगांची प्रथम तपासणी होईल. त्यांना आवश्यक साहित्याची नोंदणी करून घेण्यात येईल. त्यानंतर दीड ते दोन महिन्यांत पुन्हा त्याच ठिकाणी शिबिर घेऊन त्यांना आवश्यक साहित्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील एकही दिव्यांग व्यक्ती आवश्यक साहित्य व योजनेपासून वंचित राहणार नाही, याच उद्देशाने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारी योजना तसेच अजूनही आर्थिक लाभापासून वंचित असलेल्या दिव्यांग व्यक्तींना योजनेसाठी लागणार्‍या कागदपत्रांची जागेवरच पूर्तता करून देण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी तसेच मामलेदार पार पाडतील. त्यामुळे राज्यातील सर्वच पंचायती आणि पालिकांनी आपापल्या भागातील दिव्यांग व्यक्तींची यादी बनवावी, गरज पडल्यास त्यांना शिबिरस्थळी आणण्याची व्यवस्था करावी. शिबिराच्या ठिकाणी करोनासाठी लागू केलेल्या नियमावलीचे पालन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.

अशी होतील शिबिरे

- ४ डिसेंबर (बार्देश) : संजय स्कूल, पर्वरी

- ५ डिसेंबर (बार्देश) : पेडे (म्हापसा) स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स

- ६ डिसेंबर (पेडणे) : सरकारी महाविद्यालय, विर्नोडा-पेडणे

- ७ डिसेंबर (तिसवाडी) : कला व संस्कृती संचालनालय, पाटो-पणजी

- ८ डिसेंबर (डिचोली) : रवींद्र भवन, साखळी

- ९ डिसेंबर (वाळपई) : सामूदायिक आरोग्य केंद्र, वाळपई

- १० डिसेंबर (फोंडा/धारबांदोडा) : राजीव कला मंदिर, फोंडा

- ११ डिसेंबर (सांगे) : सांगे नगरपालिका सभागृह

- १२ डिसेंबर (सांगे) : सरकारी हायस्कूल, नेत्रावळी

- १३ डिसेंबर (केपे) : रवींद्र भवन, कुडचडे

- १४ डिसेंबर (केपे) : पंचायत सभागृह, खोला

- १५ डिसेंबर (काणकोण) : पंचायत सभागृह, काणकोण

- १६ व १७ डिसेंबर (सासष्टी) : रवींद्र भवन, मडगाव

- १८ डिसेंबर (मुरगाव) : रवींद्र भवन, वास्को

रोस्टरनुसारच पदांची भरती करा !

सरकारी खात्यांतील दिव्यांग व्यक्तींसाठीच्या जागा भरल्या जाव्यात, यासाठी रिक्त जागा रोस्टरनुसार भरण्याचे निर्देश यापूर्वीच आपण सर्वच खात्यांना दिले आहेत. यापुढे जी खाती रोस्टरनुसार पदे भरणार नाहीत, त्या खात्यांच्या प्रमुखांची चौकशी सुरू केली जाईल. शिवाय त्यांना शिक्षाही होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.