एक सहल अशीही....

जगरहाटी

Story: शेफाली वैद्य |
22nd November 2020, 05:33 pm
एक सहल अशीही....

कोरेगांव पार्क, पुणे. उंच झाडांमधून झिरपणारे मऊ उन्हाचे कवडसे पांघरलेले रुंद रस्ते, आलिशान इमारती, जिभेचे सगळे चोचले पुरवणारी देशी-विदेशी रेस्टाॅरंट्स, महागडया वस्तू विकणारी दुकाने इत्यादी खानदानी श्रीमंतीचे दागिने अंगाखांद्यावर मिरवणारी पुण्यातली एक उच्चभ्रू वस्ती. त्याच कोरेगांव पार्कमधल्या उंच इमारतींच्या पाठीला पाठ लावून कष्टकरी लोकांची एक छोटीशी वस्ती अंग चोरून उभी आहे. त्या वस्तीचं नाव आहे दरवडे मळा. इथे राहणाऱ्या बहुतेक सगळ्या बायका आजूबाजूच्या इमारतींमध्ये घरकाम करतात. काहीजणी घरगुती पोळ्या, जेवणाचे डबे वगैरे बनवतात तर त्यांचे नवरे ड्रायव्हर, वॉचमन, छोट्या कारखान्यांमधून कामगार वगैरे असली कामं करतात. सगळ्या जणींची घरं पक्की आहेत, प्रत्येक घरात टीव्ही वगैरे आहे, पण महिनाभर खपावं तरच पूर्ण पगार हाती पडतो, त्यामुळे चार पैसे शिल्लक टाकून कुठे फिरायला जावं, जरा चैन करावी असा विचार करणाऱ्या एकूण कमीच. 

दरवडे मळा या वस्तीत विजय शिवले नावाचा तरुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भक्कम पाठिंब्यावर 'सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प', नावाची संस्था चालवतो. संस्थेतर्फे वस्तीत बरेच विकास प्रकल्प चालतात. शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी वस्तीत सुराज्यतर्फे अभ्यासिका चालवली जाते. इथल्या बायकांसाठी बचत गट चालवला जातो. त्यांना व्यवसायासाठी, घर बांधणीसाठी कर्ज वगैरे लागलं तर सुराज्य बँकेतर्फे या बायकांना कर्ज मिळवून देते. इथल्या मुलांसाठी संस्थेतर्फे विविध शैक्षणिक उपक्रम चालतात. विजय शिवले आधी 'वर्ल्ड व्हिजन' या ख्रिस्ती मिशनरी संस्थेतर्फे या वस्तीत अभ्यासिका चालवायचे, पण त्यांना हळूहळू जाणवत गेलं की वर्ल्ड व्हिजनला समाजकार्यापेक्षा ख्रिस्ती धर्मप्रसारात जास्त रस आहे. खुद्द शिवलेंवर देखील धर्म बदलण्यासाठी वर्ल्ड व्हिजनच्या लोकांनी विविध प्रकारे दबाव आणायला सुरुवात केली तेव्हा शिवलेंनी संस्था सोडली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्याने स्वतःची संस्था सुरु केली. वस्तीतल्या बायकांचा विजयसरांवर खूप विश्वास आहे, कारण त्यांचं कार्य आणि त्यातलं सातत्य त्या बायकांनी जवळून बघितलेलं आहे. 

बचत गटातल्या बायकांसाठी संस्था अधूनमधून सहली आयोजित करते, व्यक्तीविकासासाठी शिबिरं घेतली जातात, जिथे वेगवेगळ्या विषयातले लोक येऊन या बायकांची सेशन्स घेतात, पण पुण्याच्या आसपास सगळं काम चालतं. महाराष्ट्राबाहेर कुठेतरी सुट्टीसाठी जायचं हा विचार कुणाच्या डोक्यात आधी कधी आला नव्हता. एक दिवस बचत गटाच्या मीटिंगमध्ये सहज बोलता बोलता काही जणी विजयसरांना म्हणाल्या, 'अहो सर, आम्हाला सहलीला म्हणून एक दिवस कधी विमानतळावर घेऊन जा ना. आम्हाला बघायचंय विमानतळ आतून कसा दिसतो ते'. ते वाक्य ऐकून विजय आणि त्याच्या सहकाऱ्यांना वाटलं की नुसता विमानतळच का, या बायका विमानातून प्रवास करायचा अनुभव का नाही घेऊ शकणार? त्या एका विचारातून गोव्याला काही दिवस सुट्टीसाठी जायची कल्पना निघाली. 

बचत गटातल्या महिलांपुढे ही कल्पना मांडताच उदंड प्रतिसाद मिळाला. बायका स्वतःच्याच पैशांनी प्रवास करणार होत्या त्यामुळे जाताना विमानाने जायचं आणि परत येताना रेल्वेने यायचं असा बेत ठरला. जवळ-जवळ चोवीस जणींनी नाव नोंदवलं. बहुतेक सगळ्या बायका घरकाम करणाऱ्या, मुलं-बाळं, संसार असलेल्या. त्यामुळे तीन-चार दिवसांपेक्षा जास्त खाडे करणं कुणालाच शक्य नव्हतं. शेवटी तीन दिवसांच्या सहलीचा बेत पक्का झाला. सहा महिने आधी आरक्षण केल्यामुळे विमानाची तिकीटं त्यातल्या त्यात स्वस्तात मिळाली, पण तिकिटं मुंबई विमानतळावरून होती, त्यामुळे मुंबईपर्यंतचा बस प्रवास वगैरे सगळी व्यवस्था करायची होती. बायकांचा उत्साह अमाप होता. ज्या दिवशी विमानाची तिकिटं बुक झाली त्या दिवशी तर सगळ्याजणी मनाने उडत कधीच गोव्याला पोचल्या होत्या! 

आता प्रश्न होता गोव्यातल्या वास्तव्याचा. मला जेव्हा या सहलीबद्दल कळलं तेव्हा मी गोव्यातल्या माझ्या आतेभावाला सांगून म्हार्दोळच्या मंदिरातल्या खोल्यांमध्ये सगळ्या जणींची राहायची व्यवस्था केली. ट्रिप निघायच्या आधी संस्थेतर्फे दोन-तीन मेळावे भरवले गेले. प्रवासात कागदपत्रे कुठली घ्यायची इथपासून ते किती किलो सामान बरोबर घेता येतं, गोव्यात जाऊन काय काय बघायचं इत्यादी सर्व विषयांवर बायकांना मार्गदर्शन केलं गेलं. विमानातून प्रवास करायची सगळ्याच जणींची ही पहिलीच खेप होती त्यामुळे सगळ्याच जणी खूप आनंदात होत्या आणि काहीशा घाबरलेल्या देखील. सहलीबरोबर मार्गदर्शक म्हणून स्वतः शिवले सर, त्यांची बायको आणि संस्थेत स्वयंसेविका म्हणून काम करणारी बागेश्री मंटळकर हे तिघे देखील जाणार होते. या तिघांनीही सहलीला जाणाऱ्या बायकांना धीर दिला, त्यांचं समुपदेशन केलं,  

त्यांच्या सगळ्या प्रश्नांची नीट उत्तरे दिली. 'खरं सांगू, विमानातून जायचं म्हणून खूप आनंद झाला होता, पण तेव्हढीच भीती पण वाटत होती. मी विमानतळाजवळच्या एका बिल्डींगमध्ये काम करायचे तेव्हा रोज डोक्यावरून विमानं उडताना बघायची, पण कधी वाटलं नव्हतं की मी स्वतः पण विमानातून जाईन’, सहलीला गेलेल्या नर्मदाबाई व्हटकर सांगत होत्या. 'विमानात बसले आणि विमानाने आकाशात झेप घेतली तेव्हा पोटात आकाशपाळण्यात बसल्यावर येतो तसा गोळाच आला एकदम. तो सुखद अनुभव घेत घेत आम्ही हां हां म्हणता गोव्याला पोचलो सुद्धा'. 

गोव्याच्या सहलीवरून परत पुण्याला आल्यानंतर या बायकांचा एक स्नेहमेळावा संस्थेने घेतला होता. त्याला मी हजर होते. सगळ्या जणी आपापले अनुभव सांगायला खूपच उत्सुक होत्या. चेहरे आनंदाने निथळत होते नुसते एकेकीचे. 'कशी झाली सहल?' मी विचारलं. झालं, सगळ्या जणी भरभरून बोलायला लागल्या.  

'एक खूप चांगली गोष्ट सांगू का शेफाली', बागेश्री म्हणाली, 'जेव्हा सहलीचं या महिलांनी घरी सांगितलं ना, तेव्हा त्यांना घरून खूप पाठिंबा मिळाला. कुणाच्याही घरच्यांनी विरोध केला नाही, उलट बऱ्याच जणींचे नवरे म्हणाले, तू निश्चिंत जाऊन ये, घरचं मी बघतो'. 

'हो ना, मी माझ्या भावाच्या घरी रहाते, आता तर कायबी काम पण करत नाही, घरीच असते. पण माझा भाऊ, भावजय दोघंबी म्हणाले, 'आपा, हमारे वास्ते भोत काम किया तुमने, अबी तुम जाके सब देखके आना, त्यांनीच पैसे बी भरले माझे,' भरलेल्या कंठाने पन्नाशीची सलमा सय्यद म्हणाली. 'माझं बी असंच बघा, माझ्या सुनेने पयले पैसे भरले व्हते, पर तिचं जाणं क्यान्सल झालं. ती मला म्हणाली, अम्मा, तुमी जावा. विमानाने फिरून येवा', मुळची तामिळ-भाषिक पण आता अस्खलित मराठी बोलणारी फिलोमेना मावशी म्हणाली.  

'माझ्या तर पोरींनी मला त्यांच्या जीन्स दिल्या, त्यांचे कुर्ते घालायला दिले, म्हणाल्या, 'मम्मी इतके दिवस घर सोडून तू कुठं पण नाय गेली, साडी सोडून दुसरे कपडे पण नाय घातलेस कधी. आता आमचे कपडे घाल, मजा कर', अभिमानाने ओथंबणाऱ्या स्वरात सुलोचना जाधव म्हणाल्या. 

'आमचा गोवा कसा वाटला मग?' मी माझं गोयंकारपण दाखवत प्रश्न विचारला. 

'किती सुंदर आहे गोवा आणि किती स्वच्छ आहेत तिथली देवळं. तीन दिवस आम्ही होतो तिथे, पण एक भिकारी नाही दिसला आम्हाला. देवळाजवळ कुणी एक कपटा इथे तिथे टाकलेला नव्हता. खूप छान वाटलं ते बघून.' (पूर्वार्ध)

(लेखिका साहित्यिक आहेत.)