कॅसिनोंतील तीसपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना करोना

काँग्रेसचा दावा; बंद करण्याची मागणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
22nd November 2020, 12:37 am
कॅसिनोंतील तीसपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना करोना

पणजी : मांडवीतील एका कॅसिनो जहाजाच्या ३० पेक्षा अ​धिक कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. हे कर्मचारी गोमंतकीय आहेत, असा दावा युवा काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान, आणखी एका कॅसिनोत चार ते पाच कर्मचाऱ्यांना करोना झाल्याचीही मा​हिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे कॅसिनोंवरून विरोधकांचा पुन्हा हल्लाबोल सुरू होण्याची शक्यता आहे.
करोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी मार्चपासून बंद असलेले कॅसिनो आणखी काही महिने बंद ठेवा. कॅसिनो जहाजांची क्षमता दोन ते तीन हजार इतकी आहे. त्यात देशातील सर्वच भागांतील पर्यटकांनी कॅसिनोंत येण्यासही सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत कॅसिनोंद्वारे करोनाचा पुन्हा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे तत्काळ कॅसिनो सुरू करू नयेत, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही केली होती. पण सरकारने आमची मागणी मान्य न केल्यामुळेच कॅसिनोतील तीसपेक्षा अधिक कर्मचारी करोना बाधित झाले असून, त्यांच्यामुळे करोनाचा आणखी फैलाव होण्याचा धोका वाढला आहे, अशी भीती म्हार्दोळकर यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारला केवळ पैसा हवा आहे. त्यासाठी सरकार गोमंतकीयांच्या आयुष्याशी खेळत आहे. कॅसिनो सुरू केल्यामुळे नियंत्रणात आलेला करोना आता पुन्हा गोमंतकीयांच्या घराघरांत पोहोचण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सरकार स्वत:ला करोनाबाबत खरोखरच गंभीर समजत असेल, तर कॅसिनोतील कर्मचाऱ्यांना झालेल्या करोनाची दखल घेऊन तत्काळ मांडवीतील कॅसिनो बंद करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.


सरकारकडून करोनाला आमंत्रण
करोनाची दुसरी लाट आल्याने जगभरातील विविध देश पुन्हा सतर्क झाले आहेत. काही देशांनी लॉकडाऊनची तयारीही सुरू केली आहे. अशा परिस्थितीत गोवा हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असल्याने सरकारने सजग राहणे गरजेचे होते. पण गोवा सरकार मात्र करोनाला जाणीवपूर्वक आमंत्रण देत आहे. त्याचा फार मोठा फटका भविष्यात गोमंतकीय जनतेला बसू शकतो, असेही वरद म्हार्दाेळकर यांनी नमूद केले.

हेही वाचा