Goan Varta News Ad

ट्रायगोवाची चार शहरांतून १०० किमी सायकल राईड

|
02nd November 2020, 11:40 Hrs

पणजी :पणजीतील ट्रायगोवा फाउंडेशन यांच्यातर्फे ‘ट्रायगोवा मल्टी - सिटी सेंच्युरी राईड’ ची दुसरी आवृत्ती रविवारी दि. ८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सायकल राईडची एक विशेष बाब म्हणजे १०० किमीच्या अंतरातील कोणत्याही शहरांत म्हणजेच पणजी, मडगाव, वास्को किंवा फोंडा ते सायकल राईड करू शकतात.
या सायकल राईडला सकाळी ६.३० वाजता सुरू होणार असून ही राईड त्यांनी ७.३० तासांत पूर्ण करायची आहे. ट्रायगोवा फाउंडेशनचे संस्थापक राजेश मल्होत्रा म्हणाले की, सर्व सायकपटू ही १०० किमीची राईड गोव्यातील चार प्रमुख शहरातून एकाचवेळी सुरू करून मार्गावर एकमेकांना क्रॉस करतील. पणजी आणि वास्कोचे रायडर घड्याळाच्या दिशेने तर फोंडा आणि मडगावचे रायडर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतील. सायकलपटू हायड्रेट राहावेत यासाठी प्रत्येक शहरातील मार्गांवर नाश्ता, स्नॅक्स, आईस्क्रीम आणि ज्युसची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
----बॉक्स----
ते पुढे म्हणाले की यामध्ये नोंदणी करण्यासाठी सहभागी व्यक्तींचे किमान वय १५ असावे तसेच १८ वर्षाखालील सहभागी व्यक्तींसोबत पालकांनी राईड करणे आवश्यक आहे. मल्होत्रा ​​म्हणाले की ही ‘सेल्फ सपोर्टर्ड’ राईड असणार असून या मार्गावर कोणतीही यांत्रिक मदत दिली जाणार नाही.
आयोजकांकडून मार्गावर कोणताही पिकअप पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार नाही आणि सहभागींनी मध्यभागी राईड सोडण्याचे ठरविल्यास त्यांची स्वतःच्या परतण्याची सोय स्वतः करावी लागेल. तसेच, सायकलस्वारांना आग्रह करतो की त्यांनी सुरुवातीस, समाप्त आणि सर्व कंट्रोल पॉइंटवर सुरक्षित अंतर ठेवून मास्क घालावे लागतील आणि लाईन लावावी लागेल. ठरविलेल्या सर्व कोविड -१९ बाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केलेच पाहिजे, असे मल्होत्रा ​​म्हणाले.
सायकलस्वारांनी tri goa randonneurs @ gmail.com येथे मेल करू शकतात. नोंदणी प्रक्रिया ६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. अधिक माहितीसाठी राजेश मल्होत्रा (७७२०८८२२२८) यांच्याची संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.