Goan Varta News Ad

सरकारवर आरोप करणार्‍या पक्षांचा भाजपतर्फे निषेध

समविचारी लोकांनी निर्माण केलेला पक्ष : मांद्रेकर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th October 2020, 11:54 Hrs

म्हापसा : राष्ट्रीय व स्थानिक पक्षांनी गेल्या काही दिवसांपासून सरकारसह मुख्यमंत्री, भाजपा प्रदेशाध्यक्ष व भाजपवर टीकेची झोड उठवून अर्थहीन आरोप केले जात आहेत. सरकारला नाहक बदनाम करणार्‍या या पक्षांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत, असे भाजपचे राज्य कार्यकारिणी सचिव गोरख मांद्रेकर यांनी सांगितले.
पक्षाच्या येथील उत्तर गोवा जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मांद्रेकर बोलत होते. यावेळी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष महानंद अस्नोडकर, महिला मोर्चा उपाध्यक्ष डिलायला लोबो, सपना मापारी, राजसिंह राणे, दीक्षा कांदोळकर, कार्तिक कुडणेकर, यशवंत गवंडळकर व इतर उपस्थित होते.
भाजप हा मूळ जनसंघाच्या ध्येय धोरणातून समविचारी लोकांनी निर्माण केलेला पक्ष आहे. गेली ४० वर्षे हा पक्ष देशात कार्यरत असून अनेक राज्यांत पक्षाची सत्ता आहे. देशहित, जनहित, विकास, सुशासन यांसारखी तत्त्वे समोर ठेवून आम्ही कार्य करीत आहोत. स्वार्थासाठी हा पक्ष निर्माण झालेला नाही, असे मांद्रेकर म्हणाले.
भाजपात बहुजन समाजाला वाव नाही, बहुजन समाजाची या पक्षात कदर केली जात नाही. अशा प्रकारचे खोटे आरोप विरोधी पक्ष करीत आहेत. प्रत्यक्षात भाजपात राष्ट्रीय पातळीवर ७० टक्के खासदार बहुजन समाजातील आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे बहुजन समाजातीलच असून अनूसूचित जाती-जमाती व ओबीसीतील नेते पक्षात मानाच्या हुद्यांवर आहेत. बहुजन समाजाचा दर्जा वाढावा, या समाजाचा उत्कर्ष व्हावा यासाठी वेगवेगळ्या योजना सरकारने राबविल्या आहेत, असा दावा मांद्रेकर यांनी केली.
प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे विद्यार्थी दशेपासून सामाजिक कार्य व पक्ष कार्य करीत आहेत. उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी पक्ष सोडला नाही. मंत्री मायकल लोबो, विश्वजीत राणे यांच्यासह सर्वच मंत्री उत्कृष्ट कार्य करीत आहेत, असे मांद्रेकर यांनी सांगितले. यावेळी सपना मापारी व महानंद अस्नोडकर यांनी पक्षाच्या कार्याचा उल्लेख करून गेल्या काही दिवसांत लोकोपयोगी घोषणा केल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
गोव्याला आत्मनिर्भर किंवा स्वंयपूर्ण गोवा करायचा आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी गेल्या दोन-चार दिवसांत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. भाजपाची विचारसरणी ज्यांना पटत नाही, त्यांनी खुशाल पक्ष सोडावा. आजपर्यंत आपल्या स्वार्थासाठी काही लोक पक्ष सोडून गेले आहेत. _ गोरख मांद्रेकर, भाजप राज्य कार्यकारिणी सचिव