Goan Varta News Ad

साखळी बॅडमिंटन लीगला आजपासून सुरुवात

|
29th October 2020, 03:54 Hrs
साखळी बॅडमिंटन लीगला आजपासून सुरुवात

पणजी : साखळी बॅडमिंटन लीगच्या (एसबीएल) पहिल्या आवृत्तीमध्ये डिचोली व सत्तरी तालुक्यातील दिग्गज बॅडमिंटनपटू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेला ३० ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
साखळी शटलर आयोजित या लीगमध्ये एकूण ९ संघ खेळणार असून यात ८० पेक्षा अधक स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत आकर्षक चषकासोबत इतर अनेक बक्षिसे देण्यात यशणार आहेत.
बॅडमिंटनच्या २०२० सत्राला या स्पर्धेपासून अधिकृतरित्या सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा समारोप रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी मल्टिपर्पज स्टेडियम, साखळीच्या बॅडमिंटन कोर्टवर होणार आहे. गोवा बॅडमिंटन असोसिएशनचा सदस्य असलेल्या साखळी शटलर्सने अशा प्रकारच्या लीगचे आयोजन या दोन तालुक्यांमध्ये प्रथमच केले आहे.
सत्तरी आणि डिचोली तालुक्यांतील बॅडमिंटनपटूंना अतिशय रोमांचक स्वरुपात स्पर्धा करण्याची एक उत्तम संधी आहे. या तालुक्यांतील बरेच खेळाडू अलीकडच्या काळात चांगली कामगिरी करत आहेत आणि ही स्पर्धा त्यांना अतिशय व्यावसायिक गटात त्यांचे कौशल्य शोधण्यासाठी व्यासपीठ देणार आहे, असे गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष नरहर ठाकूर म्हणाले.
हंगाम सुरू करण्यासाठी साखळी बॅडमिंटन लीग एक उत्तम व्यासपीठ आहे. आयोजन क्लब साखळी शटलर्स हा आमच्या सर्वात तरुण सदस्यांपैकी एक आहे, परंतु सर्वात सक्रिय क्लब आहे. बॅडमिंटन लीग स्पर्धक खेळाडूंसाठी चांगली बातमी आहे ज्यांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल, असे गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव संदीप हेबळे यांनी सांगितले.
कर्ण धवस्कर, निलेश परब, सोहन नाईक, रुद्र फडते, आर्यन फातर्पेकर, प्रसाद आजगावकर, सिराज वाडकर, अभिषेक स्वामी, ओंकार फुलारी, नोमा सांकोळकर, मयुश्री आजगावकर आणि रूपम सांकोळकर हे या स्पर्धेत भाग घेणार आहेत. यापूर्वी, इंडियाज प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव झाला होता, जिथे नऊ संघांनी ८० पेक्षा अधिक खेळाडूंसाठी बोली लावली होती. या स्पर्धेत जीनियस फायटर्स, ला तारा स्मॅशर्स, पार्थिवी सुपरस्मॅशर्स, निन्जा स्ट्रायकर्स, ओव्हरलाक्ड ड्रॉपर्स, एजी थ्रॅशर्स, एमएलटी शटलर्स, चैतन्य स्मॅशर्स आणि क्रिस्टल बॅडमिनिटर्स, असे ९ संघ खेळणार आहेत.
तीन दिवस चालणारी ही लीग ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार असून उद्घाटन सामन्याला डिचोली मामलातदार सुलक्षणा सावंत व प्रविणजय पंडित यांची उपस्थिती असणार आहे. उपांत्य सामना १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला असून किताबी लढत याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता खेळवण्यात येणार आहे.
अंतिम सामन्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उपस्थिती असणार आहे. याचबरोबर गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष नरहर ठाकूर सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे.