Goan Varta News Ad

सामाजिक योजनांसह कांद्याबाबत दिलासा

पत्रे मिळालेल्यांनाच कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश - रेशन दुकानांवर स्वस्त दराने कांदा उपलब्ध होणार

|
28th October 2020, 10:30 Hrs
सामाजिक योजनांसह कांद्याबाबत दिलासा

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : गृहआधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा (डीएसएसवाय) या दोन्ही योजनांच्या ज्या लाभार्थींना पत्रे मिळाली आहेत, त्यांनीच हयात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचे दाखले देण्याचा तसेच रेशन दुकानांवर कांदे उपलब्ध करून रेशनकार्ड धारकांना प्रत्येकी तीन किलो कांदे ३२ ते ३३ रुपये किलो दराने देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. या निर्णयांमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासंदर्भातील माहिती दिली. सरकारकडून ज्यांना पत्रे देण्यात आलेली आहेत, त्याच लाभार्थींनी हयात प्रमाणपत्र आणि उत्पन्न दाखले सादर करावेत. इतर लाभार्थींना ही कागदपत्रे देण्याची गरज नाही. त्यामुळे पत्रे न मिळालेल्या लाभार्थींनी पंचायत, मामलेदार कार्यालये किंवा आमदारांच्या घरांत गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. गृहआधारचे ७३ हजार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे १.३६ लाख असे दोन्ही योजनांचे राज्यात सुमारे २ लाख ९ हजार लाभार्थी आहेत. योजनांचा फेरआढावा घेण्यात आला,

त्यावेळी अनेकांचे उत्पन्न योजनेतील अटीपेक्षा जास्त आढळले. काहीजण सर्व्हेवेळी भेटले नाहीत, तर काहींनी बँक खात्यांतून पैसेही काढलेले नाहीत. अशा लाभार्थींना योजनेसाठी पुन्हा पात्र ठरविण्यासाठी हयात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचे दाखले सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यांना त्यासंदर्भातील पत्रेही पाठवली आहेत. ज्यांना अशी पत्रे मिळाली आहेत, त्यांनीच ही कागदपत्रे सादर करावी. इतर लाभार्थींनी कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

गृहआधार आणि डीएसएसवाय योजनांसाठी नव्याने हयात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचे दाखले सादर करण्यासाठी नागरिकांकडून पंचायत व मामलेदार कार्यालयांमध्ये गर्दी केली जात आहे. अनेकजण या दाखल्यांसाठी आमदारांच्या घरीही फेर्‍या मारत आहेत. त्यामुळे करोना नियंत्रणासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत आहे. त्याचा पुन्हा फटका बसू नये, यासाठीच सरकारने इतर लाभार्थींकडून कागदपत्रे न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशभरासह गोव्यातही कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. करोनामुळे बिकट आर्थिक परिस्थितीत सापडलेल्या जनतेला शंभर ते दीडशे रुपये प्रतिकिलो दराने कांदे विकत घेणे परवडेनासे झाले आहे. येत्या दहा दिवसांत रेशन दुकानांवर ३२ ते ३३ रुपये किलो दराने कांदे उपलब्ध करण्याचा आणि प्रत्येक रेशनकार्ड धारकांना तीन किलो कांदे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला काहीअंशी दिलासा मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

टप्प्याटप्प्याने अर्थसहाय्य देणार!

गृहआधार योजनेचे मे ते ऑक्टोबर या सहा महिन्यांचे अर्थसहाय्य प्रलंबित असून ते टप्प्याटप्प्याने देण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. दोन्ही योजनांसाठी सुमारे ४७ कोटी रुपयांचा खर्च येतो. यापुढे दोन-दोन महिन्यांनी दोन्हीही योजनांचे पैसे लाभार्थींच्या बँक खात्यांत जमा होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.