Goan Varta News Ad

केशवतात्यांचा भावंडांवर एवढा जीव की...

कर्मनिष्ठांची मांदियाळी

Story: संजय ढवळीकर |
25th October 2020, 01:01 Hrs
केशवतात्यांचा भावंडांवर एवढा जीव की...

छपरात लटकलेला पंखा फिरत होता गरागरा आवाज करत, त्याखाली केशवतात्या बसले होते खांद्यावरील पंचाने घाम पुसत. नारळ पाडायचे काम असले की काम संपता संपता आताशा ते अगदी थकून जात. उन्हाळा असल्यामुळे हवेत उष्णता खूप होती. वाऱ्याची एखादी झुळूकही येत नव्हती. नुसता घाम आणि घाम. अंगावरील घाम पुसतानाच नवीन घामाच्या धारा वाहात खाली उतरत. पाडून झाले, आता नारळ कोणाला किती द्यायचे, त्याचे वाटे कसे घालायचे हे विचारचक्र केशवतात्यांच्या डोक्यात चालले होते!

‘‘धाकट्या बंड्याच्या घरी पंचवीस देऊ; दादाच्या घराकडे माणसं जास्त, ते खोबरं खातातही जास्त, त्यांना चाळीस तरी घालावे लागतील. बाकी आपल्या घरी दहाएक ठेवले तरी पुरे. रुक्मिणीच्या घरी वीस-पंचवीस पोहोचवावे लागतील. अरे हो, तिच्या नातवंडांना शहाळ्याचं पाणी आवडतं. शहाळी काढून घ्यायचीत अजून. उरलेले नारळ सोसायटीत नेऊन विकायला ठेवायचे. मीच नेऊन ठेवीन ते...’’

केशवतात्यांचे असेच असायचे. नारळ पाडले की एका पाड्यात दोनशे-अडीचशे नारळ मिळायचे. त्यातील निम्मे नारळ आपले दोन भाऊ, सर्वांत मोठी असलेली बहीण रुक्मिणी, त्यांची मुले यांच्यात वाटून टाकायचे. बाकी राहिलेले नारळ सोसायटीच्या दुकानात नेऊन ठेवले की आपोआप खपतात. पण, त्यातून उत्पन्न किती मिळेल याची त्यांना चिंता नसायची. नारळच असे नव्हे, तर कुळागरात आलेले कोणतेही उत्पन्न विक्री करण्यापेक्षा आपल्या भावा-बहिणींत वाटून टाकण्याची त्यांना भारी हौस.

‘‘अरे तात्या, माडांच्या मशागतीचा, बागेत काम करणाऱ्या मजुरांचा आणि पाडेल्याचा खर्च तरी भरून येऊदे. दर वेळी असा आमच्या घरी रतीब घालत राहतोस...’’ तात्यांना एकदा धाकटा बंड्या सांगायचा, तर पुढच्या वेळी दादा सुनवायचा. नारळ आणि कुळागारातील इतर उत्पन्न सोसायटीच्या दुकानात विकायला ठेवले तर त्यातून होणारी प्राप्ती तात्याच्याच घराला उपयोगाला यावी अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असायची. पण, ऐकेल तर तो तात्या कसला!

आंबे-फणसांचा हंगाम आला की तीनही घरांतील मुलांना म्हणून मोठाल्या पिशव्या भरून आंबे आणि फणस पाठवायचा. सोबत कधी तरी केळीच्या बोंड्या, तर कधी पिकलेल्या डझन डझन केळ्यांचे दोन चार फणे द्यायचा. नशीब, एकाही घरात कोणी सुपारी खात नसे, नाही तर सुपारीचा सुद्धा पुरवठा तात्या करेल अशी सगळीच भावंडे त्याची चेष्टा करायची. या चेष्टेत तात्याला काही वावगं वाटत नसे. कुळागर जरी आपण कसत असलो तरी ते सगळ्यांचे आहे, त्याचे उत्पन्न सगळ्या भावंडांना मिळाले पाहिजे असा त्याचा मनापासूनचा आग्रह असायचा.

केशवतात्या राहात असलेले त्यांचे मूळ घर तसे लहानच. कुळागारात वसलेले. मोठ्या भावाने - दादाने त्यांच्याच गावात वेगळे घर बांधून आपला संसार मांडला. धाकटा भाऊ - बंड्या लग्न झाल्यानंतर गावातीलच एका हाऊसिंग सोसायटीत फ्लॅट घेऊन राहू लागला. रुक्मिणी सर्वांत मोठी बहीण, तात्या वयाच्या विशीत प्रवेश करण्याआधीच तिचे लग्न झाले होते. रुक्मिणी तालुक्याच्या ठिकाणी - शहरात राहायची. तिच्या मुलांना कुळागाराची खूप आवड, म्हणून सुटी लागताच तात्या स्वत:हून रुक्मिणीच्या घरी जाऊन दोन्ही मुलांना आपल्या घरी घेऊन यायचा. चार-दोन दिवस ती मस्तपैकी मजा करत राहायची. कधी तरी रुक्मिणी त्यांना घेऊन परत जायची, किंवा तात्याच त्यांना त्यांच्या घरी सोडून यायचा.

कुळागर आणि भावंडे यांचेच करण्यात केशवतात्या त्याच्या तरुण वयापासून गुंतून गेला होता. कुळागारात काम करण्याची त्याला सुरुवातीपासून खूपच हौस. कुळागर वडिलांनी वसवले होते. पण मुलं लहान असतानाच वडील अचानक गेले तेव्हा तीनही मुलांना बागायती पिकवण्यावर लक्ष द्यावे लागले. दादा आणि बंड्याचे शिक्षणाकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून केशवतात्याने पुढे कुळागरात पूर्णपणे झोकून दिले. शिक्षण अर्धवट सोडले आणि नारळ, सुपारी, केळी हे पीक घेण्यावर लक्ष केंद्रित केले.

अंगात ताकद असताना कुळागराशिवाय दुसरा कसला विचार केला नाही. स्वत:च्या लग्नाचाही नाही! एकट्यानंच सारे काही निभावून नेलं. पण, आता गात्रं थकली. मजुरांवर विसंबून यापुढे घराचे व्यवहार चालतील काय? कुळागरातील मेहनतीपेक्षा या विचारानेच अलिकडे तात्यांना जास्त घाम यायचा.

(लेखक गोवन वार्ताचे संपादक आहेत.)