पोर्ट्रेट फोटोग्राफर आलेक्स फर्नांडिस

कलाकार

Story: इजिदोर डांटस |
25th October 2020, 12:59 pm
पोर्ट्रेट फोटोग्राफर आलेक्स फर्नांडिस

आलेक्स फर्नांडिस हे प्रसिद्ध पोर्ट्रेट फोटोग्राफर. त्यांचा जन्म १७ जुलै १९६३ रोजी मुंबईत झाला. शिक्षण एल्फिन्स्टन महाविद्यालयात. शिक्षण पूर्ण करतानाच त्यांनी पोर्ट्रेट फोटोग्राफर म्हणून नाव कमावले. तत्पूर्वी त्यांना फॅशन फोटोग्राफर व्हायचे होते. कारण त्यात ग्लॅमर, लोकप्रियता आहे, असे त्यांना वाटत होते. १९८४ साली आलेक्स यांनी फॅशन फोटोग्राफी सुरू केली. सहायक फोटोग्राफर म्हणून जाहिराती, फॅशन क्षेत्रात त्यांनी खूप काम केले. 

कुवेटमधील बौशारी कलर फिल्म कंपनीच्या स्टुडिओत त्यांनी लायटींग पोर्ट्रेटचे काम शिकून घेतले. तसा त्यांना या कामाचा कंटाळा होता, पण स्टुडिओच्या एका वरिष्ठाने त्यांना हे काम सोडू नकोस, असा सल्ला दिला. तेथील कामासाठी आवश्यक असलेली अरबी भाषा आलेक्स यांनी शिकून घेतली. १९९० साली आखाती युद्ध संपल्यावर त्यांनी कोडॅक डिस्ट्रिब्युटर कंपनीत कामाला सुरुवात केली. या मालकाच्या निकॉन, सिनार, हास्सालब्लाद (Hassalblad),  नॉर्सटिसिन (Norstysn), मिनिलॅब्स आदी अनेक व्यापारी सेवा होत्या.

आलेक्स यांना पुढे स्वित्झरलँड येथे एका कार्यशाळेत भाग घेतला. ही कंपनी सिनार कॅमेऱ्याचे उत्पादन करते. ब्राॅनकलर, हास्सालब्लाद कॅमेरे वापरायला मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे आलेक्स म्हणतात. त्यांनी कंपनीसाठी अनेक कार्यशाळा घेतल्या. कोडॅकचे महाव्यवस्थापक अमल जागदिया यांनी त्यांच्या कार्याची स्तुती केली आहे. आता जाहिरातींच्या फोटोग्राफीत राम न राहिल्याने ते २००१ साली गोव्यात आले. २००४ त्यांनी पोर्ट्रेट आटेलियार स्थापन केली. आपली खास शैली त्यांनी तेथे वापरली. गोव्यात फोटो काढण्यासारखे बरेच काही आहे, असे त्यांचे मत. 

२००५ त्यांनी फोंताइन्हास येथे ३८ तियात्रिस्तांच्या फोटोंचे प्रदर्शन आयोजित केले. नंतर गोमंतकीय संगीतकारांवर  २००६ साली ३५ फोटोंचे खास प्रदर्शन भरविले. २००७ साली २७ गोमंतकीय कलाकारांवर अपरांता स्टुडिओत प्रदर्शन मांडले. जीटीडीसीने त्यांच्या पोर्ट्रेटसवर माहितीपत्रक तयार केले आहे. २००९ मध्ये त्यांनी कळंगुट येथे प्रदर्शन आयोजित केले आहे. नवी दिल्ली येथेही त्यांचे त्याच वर्षी तियात्र कलाकारांच्या फोटोंवर प्रदर्शन भरले होते. 

आलेक्स यांना रंगीत फोटोपेक्षा कृष्णधवल फोटोग्राफी आवडते. कुठला कॅमेरा वापरता, त्यापेक्षा कॅमेऱ्यामागे कोण आहे, त्याला महत्व आहे, असे ते म्हणतात. ते सध्या पणजी येथे राहतात. 

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)