जन करा रे प्रसन्न

कॅलिडोस्कोप

Story: मनोहर दा. जोशी |
25th October 2020, 12:58 pm
जन करा रे प्रसन्न

    'पुणे तिथे काय उणे? पुणे हे विद्येचे माहेरघर आहे,' यासारखी पुण्याची ओळख आता जुनी झाली. पानशेत धरण फुटल्यानंतर बरंच पाणी वाहून गेलं. कसबा पेठ, सदाशिव पेठ या पेठांचा आता तसा आब राहिला नाही. पुणेरी पगडी आता फारतर लग्नसमारंभात दिसते. पुण्याची सुप्रसिद्ध सायकल क्वचित एखाद्या गल्ली बोळात दिसते. इरसाल पुणेरी पाट्या आता पूर्वीसारख्या दिसत नाहीत. पण, मुळा मुठेचं पाणी प्यायलेले अस्सल पुणेकर आपली वैशिष्ट्ये अजून टिकवून आहेत. विद्वत्ता, विक्षिप्तपणा, काहीतरी अचाट करून दाखविण्याची जिगर अजूनही दिसते. अशाच एक आजीबाई. वय वर्षे पंचाहत्तर. आजीबाई म्हणायचे ते केवळ वय आहे म्हणून. अन्यथा त्यांची क्षमता एखाद्या तरुणीलाही लाजवेल अशी आहे. २००५ मध्ये पहिल्यांदा सिंहगड चढल्या. वयाच्या ६२ व्या वर्षी ट्रेकिंगला सुरुवात केली. अन्नपूर्णा सर्किट, नंदादेवी बेस कॅम्प, इतकंच नव्हे तर आफ्रिकेतल्या सर्वांत उंच किलिमांजारू डोंगरासारख्या अनेक ठिकाणी या वयात ट्रेकिंग केले. याचबरोबर सायकलिंगचीही त्यांना आवड आहे. पुणे ते कन्याकुमारी, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, ओरिसातील लगून लेकला प्रदक्षिणा यासारखे अचाट उपक्रम केलेत. दरवर्षी सिंहगड तर आहेच. सिंहगडावर त्यांची मुलाखत घेतली तेव्हा शेवटी त्यांनी सांगितलेले एक वाक्य मला फार भावले. त्या म्हणाल्या, "माणसाने स्वतःसाठी जगावंच. पण, जगता जगता शक्य तितका आसपासच्या लोकांना आनंद देत जगावं." 

जगावं कसं हे अगदी साध्या सोप्या शब्दात त्यांनी सांगून टाकलं. आपण स्वतःसाठी प्राधान्याने जगतो. सुख समाधान मिळविण्याचा प्रयत्न करतो. तो करावाच पण हे करत असतानाच इतरांनाही त्यात सहभागी करून घेता आलं, त्यांनाही आनंदी करता आलं तर आपलं जगणं सार्थ झालं असं म्हणता येईल. दुसऱ्याला आनंद देणं फार अवघड आहे का? दुसऱ्याला आनंद द्यायचा म्हणजे फार काही करायला हवं असं नाही. किंवा त्याच्यासाठी फार पैसे खर्च करावे लागतात असंही नाही. अगदी साध्या साध्या गोष्टीतूनही आपण इतरांच्या मनावर आनंदाचा शिडकावा करू शकतो. यासाठी फार काही करावं लागतं असं नाही. मॉर्निंग वॉकला जात असताना अगदी परिचयातली नसली पण पाहण्यातली एखादी व्यक्ती दिसली आणि त्याला 'नमस्कार, गुड मॉर्निंग' असं काहीतरी म्हणून अभिवादन केलं तर ओळख नसली तरी त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची स्मितरेषा उमटते. रस्ता ओलांडण्यास धडपडणाऱ्या एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला आपलं काम थोडंसं बाजूला ठेवून रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत केली तर त्याच्या डोळ्यांत दिसणारे कृतज्ञतेचे भाव त्याच्याबरोबरच आपल्यालाही समाधान देऊन जातात. गाडीने घरी जात असताना आपल्या घराजवळची एखादी व्यक्ती जड सामान घेऊन चालत जात असेल आणि गाडी थांबवून त्याला गाडीत घेऊन त्याच्या घराजवळ सोडलं तर त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आपल्याला सहजपणे टिपता येतो. बसमध्ये उभ्या असलेल्या एखाद्या लेकुरवाळ्या महिलेला किंवा ज्येष्ठ नागरिकाला आपली सीट दिली तर त्याला केवढातरी दिलासा मिळतो. या अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत. यातून आपण फार काही देत असतो असं नाही. जाईच्या दोन चार कळ्याही वातावरण प्रसन्न करतात. अंधाऱ्या खोलीत पणतीचा उजेडही दिलासा देतो. आनंद हा कणाकणांनी वेचायचा असतो आणि तिळगुळाच्या हलव्यासारखा कणाकणांनी वाटायचा असतो. 

एखाद्याचं मनापासून कौतुक करणं हा एखाद्याला आनंदी करण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे. आपण केलेल्या छोट्या मोठ्या कृतीची कुणीतरी नोंद घ्यावी, त्याची प्रशंसा करावी असे प्रत्येकाला मनापासून वाटत असते. नव्हे ती एक प्रकारची मानसिक गरज असते. अगदी दारात काढलेली रांगोळी पाहून "आरे वा! काय सुरेख रांगोळी काढली आहेस." असे म्हटले तर त्या गृहिणीला समाधान वाटते. "काकू, काल तुम्ही दिलेला ढोकळा मस्त झाला हं" असे शेजारच्या काकूंना सांगितले तर त्यांनाही ढोकळा केल्याचे आणि तो दिल्याचे सार्थक झाले असे वाटेल. एखाद्या स्त्रीने नवी साडी दाखवायला आणली तर "सेलमध्ये घेतलीत का?" असे खवचटपणे विचारण्याऐवजी "छान आहे हं साडी. तुम्हाला अगदी खुलून दिसेल", असे सांगितले तर त्या स्त्रीचा चेहरा समाधानाने फुलून येईल. पास झाल्याचे पेढे घेऊन आलेल्या मुलाला "किती टक्के मार्क पडले?" असे विचारून त्याच्या आनंदावर विरजण घालू नये. एखाद्या नवोदित लेखकाने कथा, कविता लिहिली तर कथेचे पोस्टमार्टेम करण्याऐवजी "छान लिहिलेय हं कथा तुम्ही," असे आवर्जून सांगावे. त्यामुळे त्याचा हुरूप वाढतो. कौतुक करण्यासाठी पैसे पडत नाहीत. त्याला लागतो तो मनाचा मोठेपणा. पण, तोही अनेकांकडे नसतो.  

काही व्यक्ती आपल्या कृतीतून आनंद वाटत असतात. माझ्या माहितीचे एक ज्येष्ठ गृहस्थ आहेत. त्यांच्या खिशात नेहमी चॉकलेट्स भरलेली असतात. पाच वर्षांच्या मुलापासून माझ्यासारखा सत्तरीतला (वयाने) गृहस्थ भेटला तरी खिशातले एक चॉकलेट काढून "हें तुमकां" असे म्हणून हातात ठेवतील. ते केवळ चॉकलेट नसते. ते त्यांनी दिलेले प्रेम असते. आणखी एक गृहस्थ आहेत. अपार्टमेंटमधले एक फ्लॅटधारक एवढाच त्यांचा अपार्टमेंट्सशी संबंध. पण, बेसमेंटमधल्या चारी बाजूच्या मोकळ्या जागेत त्यांनी झाडे लावली आहेत. ते स्वतः रोज त्याची काळजी घेतात. झाडावर फुललेल्या एकाही फुलाला त्यांनी कधी हात लावला नाही. पण, त्या बहरलेल्या फुलांचा आनंद मात्र सर्वांना मिळतो. स्वतःची बीएमडब्ल्यू असणारे एक उद्योगपती. संपन्नतेचा जराही गर्व नाही. माझ्यासारखा एखादा फाटका माणूस दिसला तरी, "काय जोशीसाहेब, ठीक चाललंय ना? " अशी अगदी प्रसन्न चेहऱ्याने आणि मनापासून चौकशी करतील. मनाचा हा दिलदारपणा स्वतःबरोबरच इतरांचाही आनंद द्विगुणित करतो. असाच दिलदारपणा सगळ्यांनीच दाखवला तर जग किती सुंदर होईल नाही?